Pakistan ex prime minister imran khan in atak jail
इस्लामाबाद ः पाकिस्तानचे माजी पंतप्रधान यांची रवानगी अटक येथील तुरुंगात करण्यात आली आहे. इस्लामाबाद येथील न्यायालयाने त्यांना रावळपिंडी येथील अडियाला तुरुंगात ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव खान यांना अटक येथील तुरुंगात ठेवण्यात आले आहे, असा दावा करण्यात येत आहे. तोशाखाना प्रकरणात दोषी आढळल्यानंतर त्यांना शनिवारी लाहोर येथून अटक करण्यात आली.
न्यायालयाने अडियाला तुरुंग प्रशासनाला खान यांचा ताबा घेण्याचा आदेश दिले होते. मात्र स्थानिक माध्यमांच्या दाव्यानुसार खान यांच्या खटल्याचा निकाल लागल्यानंतर अगदी थोड्याच वेळात लाहोर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्याचप्रमाणे खान यांची वैद्यकीय तपासणी देखील न करता त्यांना थेट अटक येथील तुरुंगात पाठविण्यात आले. खान यांना न्यायालयाचा निकाल जाहीर झाल्यानंतर लाहोर पोलिसांनी तत्काळ अटक केल्याने खान यांचे सहकारी आणि पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांनी चिंता व्यक्त केली आहे. पोलिसांना न्यायालयाचा निकाल आधीच कळविण्यात आला होता का, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
शरीफही होते अटकमध्येच
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे सरकार परवेझ मुशर्रफ यांनी पाडल्यानंतर, शरीफ यांना देखील याच तुरुंगात ठेवण्यात आले होते.
अटक की अपहरण?
इम्रान खान यांना अटक करण्यात आल्यानंतर, त्यांना भेटू दिले जात नसल्याचा आरोप खान यांच्या वकिलांनी केला आहे. पाकिस्तान तेहरिके इन्साफ पक्षाचे नेते आणि पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी शनिवारी अटक करण्यात आल्यानंतर काही महत्त्वाच्या कागदपत्रांवर त्यांनी स्वाक्षरी घेण्यासाठी त्यांच्या वकिलांचे पथक पोलिस ठाण्यात गेले असता त्यांना खान यांना भेट नाकारण्यात आली. यावरून संतापलेल्या वकिलांनी आणि इम्रान समर्थकांनी, इम्रान यांना अटक करण्यात आली आहे की त्यांचे अपहरण केले आहे असा संतप्त सवाल विचारला आहे.
माजी पंतप्रधानांना अटकेची ‘पाक’ परंपरा
मागील काही महिन्यांतील पाकिस्तानमधील घडामोडी पाहता इम्रान यांना अटक होणे ही आश्चर्याची आणि धक्कादायक घटना नाही. शिवाय, पाकिस्तानचा इतिहास पाहिला तर माजी पंतप्रधानांना अटक होण्याची तर परंपराच असल्याचे दिसून येते. पाकिस्तानच्या या ‘परंपरे’चा हा आढावा.
इम्रान खान : इम्रान यांची सत्ता २०२२ मध्ये गेल्यानंतर त्यांच्यावर भ्रष्टाचार, देशद्रोह यांसह दोनशेहून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. यावर्षी नऊ मे रोजी सर्वप्रथम आणि नंतर पाच ऑगस्टला दुसऱ्यांदा त्यांना अटक झाली.
हुसेन शाहिद सुऱ्हावर्दी : तत्कालिन पूर्व पाकिस्तानचे नेते असलेले सुऱ्हावर्दी हे पाकिस्तानचे पाचवे (१९५६-५७) आणि अटक झालेले पहिले माजी पंतप्रधान होते. देशविरोधी कारवाया केल्याचा आरोप ठेवून त्यांना जानेवारी १९६२ मध्ये अटक करण्यात आली होती. तत्कालिन लष्करप्रमुख जनरल अयुब खान यांना पाठिंबा देण्यास नकार दिल्यानेच त्यांना अटक झाल्याचे मानले जाते.
झुल्फिकार अली भुट्टो : हे पाकिस्तानचे नववे पंतप्रधान (१९७३-१९७७) होते. आपल्या राजकीय विरोधकांची हत्या केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवून त्यांना अटक झाली आणि ४ एप्रिल १९७९ रोजी त्यांना फाशीही देण्यात आली.
नवाज शरीफ : पाकिस्तानचे तीन वेळेस पंतप्रधान म्हणून काम केलेल्या शरीफ यांना १९९९ मध्ये अटक झाली होती. जनरल परवेझ मुशर्रफ यांनी सत्ता ताब्यात घेतल्यानंतर ही कारवाई झाली होती. नंतर जुलै २०१८ मध्येही भ्रष्टाचाराचा गुन्हा सिद्ध होऊन त्यांना १० वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
बेनझीर भुट्टो : पाकिस्तानच्या पहिल्या आणि एकमेव महिला पंतप्रधान म्हणून बेनझीर यांनी दोन वेळेस (१९८८ ते १९९० व १९९३ ते १९९६) जबाबदारी सांभाळली. त्यांना विविध कारणांनी अनेकवेळा अटक झाली होती. हुकूमशहा झिया उल हक यांच्यावर टीका केल्याबद्दल ऑगस्ट १९८६ मध्ये त्यांना पहिल्यांदा अटक झाली होती. नंतर एप्रिल १९९९ मध्येही भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याबद्दल त्यांना पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती.
शाहिद खकान अब्बासी : एक वर्षांहून कमी काळ (२०१७) पंतप्रधानपदावर राहिलेल्या अब्बासी यांना द्रवरुपनैसर्गिक वायू गैरव्यवहार प्रकरणी जुलै २०१९ मध्ये अटक झाली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.