वॉशिंग्टन : ‘‘दहशतवाद आणि कट्टरतेचा धोका संपूर्ण जगासमोर आहे. दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे. पुरस्कृत दहशतवादाविरुद्ध लढताना कोणत्याही किंतू-परंतुला स्थान नाही,’’ अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नाव न घेता हल्लाबोल केला.
पंतप्रधान मोदी यांनी भारतीय प्रमाणवेळेनुसार शुक्रवारी पहाटे अमेरिकी काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला संबोधित केले. यावेळी काँग्रेस सदस्य, सिनेटर उपस्थित होते. तसेच अनेक भारतीय अमेरिकी नागरिक गॅलरीतून मोदींचे भाषण ऐकत होते.
‘९/११ च्या हल्ल्याच्या दोन दशकानंतर आणि २६/११च्या दहशतवादी हल्ल्याच्या दशकभरानंतरही कट्टरतावाद आणि दहशतवादाचा संपूर्ण जगाला असलेला धोका कायम आहे,’’ असे सांगून मोदी म्हणाले, ‘‘या विचारधारा नवनवीन ओळख आणि रूपे घेत राहतात, पण त्यांचा हेतू एकच असतो.
दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे आणि त्याच्याशी लढा देताना किंतू-परंतुला स्थान नाही. दहशतवादाचा पुरस्कार करणाऱ्या आणि तो फोफावण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व शक्तींवर आपण मात केली पाहिजे.’’
चीनवर टीका
चीनच्या आक्रमक वर्तनाचा संदर्भ घेऊन मोदी म्हणाले, ‘‘विवादांचे शांततापूर्ण निराकरण आणि सार्वभौमत्व व प्रादेशिक स्वायत्तता यावर आधारित संयुक्त राष्ट्रांच्या तत्त्वांचा आदर संपूर्ण जागतिक व्यवस्था करते. जबरदस्ती व संघर्षाच्या काळ्या ढगांची छाया भारत- प्रशांत विभागात पडत आहे. स्थिरता ही चिंता आहे.’’
मोदी म्हणाले, ‘‘सुरक्षित समुद्रांनी जोडलेले, आंतरराष्ट्रीय कायद्याने परिभाषित केलेले, वर्चस्वापासून मुक्त आणि आसियानच्या केंद्रस्थानी असलेले मुक्त व सर्वसमावेशक भारत- प्रशांत क्षेत्र असावे असा आमचा दृष्टिकोन आहे.’’
‘‘राष्ट्र लहान असो वा मोठे, ते मुक्त आणि निर्भयपणे निर्णय घेतात, जेथे कर्जाच्या ओझ्याने प्रगती गुदमरलेली नाही, जिथे सर्व राष्ट्रांच्या समृद्धतेचे स्वप्न पाहिजे जाते, अशा क्षेत्राच्या निर्मितीचे उद्दिष्ट आहे. शांतता व समृद्धीच्या आधारावरील क्षेत्र तयार करण्याचा आमचा दृष्टिकोन आहे’’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
१. अमेरिकी काँग्रेसला संबोधित करणे हा सन्मान. मला हा सन्मान दोनदा मिळालाय.
२. एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि याचाच दुसरा अर्थ म्हणजे अमेरिका- भारत सहकार्य
३. गेले शतक संपताना संरक्षण सहकार्याची चर्चाही नव्हती. आता अमेरिका आमच्या सर्वांत महत्त्वाच्या संरक्षण भागीदारांपैकी एक.
४. दोन्ही देशांसाठी लोकशाही हे पवित्र व सामाईक मूल्य
५. समानता आणि सन्मानाची भावना लोकशाहीमुळे विकसित होते
६. भारत देश लोकशाहीची जननी
७. विचार आणि अभिव्यक्तीला बळ देणारी संस्कृती म्हणजे लोकशाही
८. भारताने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. तो केवळ लोकशाहीचा नव्हे तर देशातील विविधतेचा उत्सव होता
९. भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता लवकरच होईल.
१०. गेल्यावर्षी जगभरात झालेल्या डिजिटल पेमेंटपैकी ४६ टक्के भारतातून झाले.
सर्व समस्यांवर चर्चा : क्वात्रा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यात गुरुवारी झालेल्या भेटीवेळी त्यांनी जागतिक समुदायासमोर सध्या असलेल्या जवळपास सर्व प्रमुख समस्यांबाबत चर्चा केली आणि या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी एकमेकांना सहकार्य करण्याबाबत भूमिका मांडली, अशी माहिती परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्याबरोबरच दहशतवादाचाही सामना करण्यासाठी एकत्र येण्याबाबतही मोदी-बायडेन यांच्यात चर्चा झाल्याचे क्वात्रा यांनी सांगितले. चर्चा झालेल्या मुद्द्यांवर अंमलबजावणी करण्यासाठी यापुढे प्रयत्न केले जाणार आहेत. मोदी आणि बायडेन यांच्यातील चर्चेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा सर्वच क्षेत्रांमध्ये वापर करण्याबाबतही प्रामुख्याने चर्चा झाल्याचेही क्वात्रा यांनी पत्रकारांना सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.