किव्ह : संघर्ष थांबविण्यासाठी युक्रेन आणि रशिया यांनी एकमेकांशी चर्चा करणे आवश्यक आहे, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केले. दोन्ही देशांनी आणि युद्धाशी संबंधित सर्वांनीच वास्तववादी भूमिका स्वीकारत तोडगा काढण्याची आणि त्याद्वारे शांतता निर्माण करण्याची गरज असल्याचेही मोदी म्हणाले.
युक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान मोदींनी युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट घेतली. १९९१ मध्ये स्वतंत्र देश म्हणून युक्रेनची निर्मिती झाल्यानंतर या देशाला भेट देणारे मोदी हे भारताचे पहिलेच पंतप्रधान आहेत. युद्धस्थितीमुळे विमान प्रवास सुरक्षित नसल्याने मोदी हे पोलंडहून १० तासांचा रेल्वेप्रवास करत युक्रेनची राजधानी किव्ह येथे दाखल झाले. झेलेन्स्की यांनी त्यांचे स्वागत केले. रशियात जाऊन अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांची भेट घेणाऱ्या मोदी यांच्या या दौऱ्याकडे सर्व जगाचे लक्ष होते.