‘ॲमेझॉन’चे संस्थापक व माजी ‘सीईओ’ जेफ बेझोस यांनी मंगळवारी न्यू शेफर्ड कुपीत बसून अवकाश सफर केली.
वॉशिंग्टन- ‘ॲमेझॉन’चे संस्थापक व माजी ‘सीईओ’ जेफ बेझोस यांनी मंगळवारी न्यू शेफर्ड कुपीत बसून अवकाश सफर केली. गेल्या आठवड्यात अब्जाधीश उद्योगपती रिचर्ड ब्रॅन्सन (वय ७०) यांनी पाच सहकाऱ्यांसह ‘व्हीव्हीएस युनिटी’ या विमानातून अवकाशात उड्डाण करत अवकाश पर्यटन क्षेत्राची दारे किलकिली केली होती, ती बेझोस यांच्या उड्डाणानंतर ती आणखी उघडली आहेत.
बेझोस यांच्याबरोबर त्यांचे भाऊ मार्क बेझोस, ‘नासा’च्या माजी महिला अंतराळवीर वॅली फंक (वय ८२) आणि वैमानिक ऑलिव्हर डेमेन (वय १८) यांनी अंतराळाचा अनुभव घेतला. बेझोस यांच्या ‘ब्लू ओरिजिन’ या कंपनीच्या माध्यमातून ही अवकाश पर्यटन मोहीम आखली होती. ‘न्यू शेफर्ड’ कुपीतून या पर्यटकांनी शून्य गुरुत्वाकर्षणाचा अनुभव घेतला. बेझोस यांचे हे उड्डाण संपूर्णपणे स्वयंचलित होते. या अवकाश सहलीसाठी २० जुलै ही तारीख निश्चित करण्यामागेही एक विशेष कारण होते. ५२ वर्षांपूर्वी अपोलो ११ हे अवकाश यान याच दिवशी चंद्रावर उतरले होते. या ऐतिहासिक दिवसाची आठवण यानिमित्ताने जागविण्यात आली.
भारतीय प्रमाणवेळेनुसार आज सायंकाळी साडेसहा वाजता वेस्ट टेक्सास येथील तळावरुन ‘न्यू शेफर्ड’ कुपीसह रॉकेटने उड्डाण केले. उड्डाणानानंतर पृथ्वीपासून ११० किलोमीटर उंचावर गेले. याआधीच कुपीपासून रॉकेट वेगळे झाले. अवकाश सीमेवर जाऊन कुपी पॅरेशूटच्या मदतीने जमिनीवर सुरक्षितपणे उतरली. कुपीचा दरवाजा उघडल्यानंतर सर्वप्रथम जेफ बेझोस बाहेर आले व तेथे उपस्थित ‘ब्लू ओरिजिन’चे कर्मचारी व इतरांनी एकच जल्लोष केला. जमिनीवरून जमिनीवरचा हा सर्व प्रवास केवळ ११ मिनिटांत झाला. ८२ वर्षांच्या माजी महिला अंतराळवीर व नेदरलँडचा १८ वर्षांच्या वैमानिक समावेश हे या अंतराळ प्रवासाचे वैशिष्ट्य ठरले.
‘न्यू शेफर्ड’ कुपी
- १९६१मधील अंतराळवीर एलन शेफर्ड यांच्या नावावरून रॉकेट व कुपीचे नाव ‘न्यू शेफर्ड’ असे ठेवले
- एलन शेफर्ड हे अंतराळात पोचणारे अमेरिकेचे पहिले नागरिक होते.
- कुपी संपूर्णपणे स्वयंचलित असल्याने सारथ्यासाठी वैमानिकाची गरज नव्हती
- कुपीचे नियंत्रण जमिनीवरील मुख्य नियंत्रण कक्षातून करण्यात आले
- उड्डाणानंतर कोणतीही आज्ञा अथवा सूचना न देता कुपीचे कार्य पार पडले
- कुपीची क्षमता सहा अंतराळ प्रवाशांची
उड्डाणानंतर...
- आवाजाच्या तीनपट वेगाने म्हणजेच एक हजार २९ मीटर प्रति सेकंद वेगाने ‘न्यू शेफर्ड’ रॉकेटची अवकाशाकडे झेप
- रॉकेट वेग ताशी तीन हजार ७०४ किलोमीटर वेगाने अवकाशात पोचले
- यानंतर एका मिनिटाने रॉकेट कुपीपासून वेगळे झाले
- अवकाशात गुरुत्वाकर्षण नसलेल्या उंचीपर्यंत कुपी पोचल्यावर अंतराळ प्रवाशांनी शून्य गुरुत्वाकर्षणाचा अनुभव घेतला
जमिनीवर उतरताना..
- अंतराळात पोचण्याच्या नऊ मिनिटांनंतर कुपीचा परतीचा प्रवास सुरू
- कुपीचा वेग कमी करण्यासाठी पॅरेशूट उघडण्यात आली
- पॅरेशूटनंतर वेग २६ किलोमीटर प्रतितासावरून १.६ किलोमीटर झाला
- अशा कमी वेगाने कुपी जमिनीवर उतरली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.