ब्रुसेल्स - युक्रेनवर आक्रमण केल्याची शिक्षा म्हणून रशियाकडून या वर्षीच्या अखेरपर्यंत तेलाची आयात टप्प्याटप्प्यांत बंद करण्याचा निर्णय युरोपीय देशांनी घेतला आहे. या विषयांवर अनेक वेळा झालेल्या चर्चेनंतर आज अखेर हा निर्णय घेण्यात आला. हंगेरीचा विरोध कायम असल्याने ही आयात पूर्णपणे बंद होणार नाही.
बेल्जियमची राजधानी असलेल्या ब्रुसेल्स येथे युरोपीय महासंघाच्या (ईयू) सर्व २७ सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत रशियावर निर्बंधांचा सहावा टप्पा जाहीर करण्यात आला. त्यातच रशियाकडून तेलाची आयात बंद करण्याचे ठरविण्यात आले. रशियाकडून युरोपला समुद्रमार्गे आणि जमिनीखालील पाइपलाइनद्वारे तेलइंधनाचा पुरवठा होतो. यापैकी दोन तृतियांश आयात समुद्रमार्गेच होते. ही आयात २०२२ अखेरपर्यंत बंद केली जाणार आहे. याशिवाय, पाइपलाइनद्वारे होणारा तेलपुरवठाही बंद करण्याचा निर्णय पोलंड आणि जर्मनीने घेतला असल्याने त्याचा मोठा फटका रशियाच्या अर्थव्यवस्थेला बसण्याचा अंदाज आहे. युरोपीय देशांच्या या निर्णयामुळे रशियाच्या ९० टक्के तेलनिर्यातीला फटका बसणार आहे. त्याचा परिणाम म्हणून रशियाला युक्रेनमध्ये हल्ले करण्यासाठी आवश्यक असलेला अर्थपुरवठाही कमी होणार आहे.
युरोपला होणाऱ्या तेलाच्या आयातीपैकी २७ टक्के आणि नैसर्गिक वायूपैकी ४० टक्के पुरवठा रशियाकडून होतो. या व्यापारातून रशियाला दरवर्षी ४०० अब्ज डॉलर मिळतात. सध्या तरी रशियाकडून येणाऱ्या वायू पुरवठ्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. मात्र, रशियातून जर्मनीला नवी गॅस पाइपलाइन टाकण्याचा प्रस्ताव सध्या गुंडाळण्यात आला आहे.
दरम्यान, रशियाच्या सैनिकांनी केलेल्या युद्धगुन्ह्यांचा तपास करण्यासाठी एकत्रित काम करणाऱ्या देशांची आज हेग येथे बैठक झाली. रशियाच्या सैन्याकडून युक्रेनच्या दोन्बास भागात तोफगोळ्यांचा आणि क्षेपणास्त्रांचा मारा सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. रशियाने निवासी भागांवर केलेल्या हल्ल्यांमध्ये हजारो सामान्य युक्रेनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. १६ मार्चला त्यांनी एका इमारतीवर केलेल्या हल्ल्यात सुमारे ६०० जणांचा मृत्यू झाला होता. आतापर्यंत रशियाविरोधात २७३ युद्धगुन्ह्यांची नोंद झाली असून आठ हजारांहून अधिक प्रकरणांचा तपास सुरु आहे.
‘इयू’चे रशियावर निर्बंध
समुद्रमार्गाने होणारा तेलपुरवठा बंद करणार
रशियाकडून पाइपलाइनद्वारे होणारा तेलपुरवठा पोलंड आणि जर्मनी बंद करणार
स्विफ्ट बँकिंग प्रणालीतून रशियाच्या सर्वांत मोठ्या बँकेला वगळणार
रशिया सरकारच्या आणखी तीन वाहिन्यांवर बंदी
युक्रेनमधील युद्धगुन्ह्यांना कारणीभूत असणाऱ्या व्यक्तींवर निर्बंध
युद्धाच्या आघाडीवर
निवासी इमारतींवर तोफगोळ्यांचा मारा केल्याबद्दल रशियाचे दोन सैनिक युद्धगुन्हेगार सिद्ध
पूर्वेकडील सिव्हिरोदोन्तेस्क शहरावरील नियंत्रणासाठी तुंबळ युद्ध सुरु, शेकडो घरे पडली
मारिउपोलच्या बंदरातील युक्रेनच्या काही जहाजांचे रशियासमर्थक बंडखोर ‘राष्ट्रीयीकरण’ करणार
अन्नधान्य निर्यातीसाठी युक्रेनमधून ‘ॲग्री कॉरिडॉर’ सुरु करण्याची तुर्कस्तानची मागणी
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.