वॉशिंग्टन : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे कौतुक करणे व ‘अमेरिका फर्स्ट’ ही लोकप्रिय घोषणा कशी योग्य होती, असा दावा करणे अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भोवण्याची शक्यता आहे.
अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ट्रम्प यांनी पुतीन हे ‘स्मार्ट’ असल्याचे म्हटले होते. गेल्या आठवड्यात रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतरही ट्रम्प यांनी त्यांचे समर्थन करीत त्यांच्याबद्दल कौतुकोद्गार काढले होते. तत्कालीन उपाध्यक्ष माईक पेन्स यांनी ट्रम्प यांच्या या भूमिकेपासून अलिप्त राहणे पसंत केले. माजी परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनीही पुतीन यांची प्रशंसा करण्याचे थांबविले होते. पुतीन यांची बाजू घेतल्याने पॉम्पिओ यांना टीकेला सामोरे जावे लागले होते.
दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर अमेरिकेने स्वीकारलेल्या परराष्ट्र धोरणांना आव्हान देण्यास ट्रम्प यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारापासूनच सुरुवात केली होती. संरक्षण आणि सैन्यदलाबाबत अनेक देशांचे सहकार्य असलेल्या उत्तर अटलांटिक करार संघटनेवरही (नाटो) त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. ‘नाटो’ची साथ सोडून जागतिक पातळीवर स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यावर त्यांनी भर दिला होता. यातून ‘अमेरिका फर्स्ट’ धोरण आखण्यात आले. ‘नाटो’सारख्या संघटनांमुळे अमेरिकेला काही वेळा त्यांच्या जनतेच्या हिताशी तडजोड करावी लागलेली आहे आणि हिंसाचाराचा मार्ग स्वीकारावा लागला आहे, असा दावा ते करीत असत. या भूमिकेमुळे ट्रम्प यांना जनतेचा पाठिंबाही मिळाला होता.
बायडेन यांच्याकडून पराभूत झालेले ट्रम्प आता पुन्हा अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याच्या तयारीत असताना पुतीनधार्जिणी भूमिकेवरून अडचणीत येण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या जागतिक पातळीवरील भागीदारांना ट्रम्प कमी लेखत होते, त्यांनी एकत्रितपणे रशियाविरोधात कठोर पावले उचलली आहेत. रशियाला आर्थिक पातळीवर कोंडीत पकडण्यासाठी निर्बंध लादले आहेत. ज्या ‘नाटो’चे अस्तित्व ट्रम्प यांनी नाकारले, त्याच संघटनेने रशियाचे आक्रमण उलथवून लावण्यासाठी शक्ती पणाला लावली आहे.
अमेरिका फर्स्ट’कडून दिशाभूल
ट्रम्प यांचे ‘अमेरिका फर्स्ट’सारखी नीती सध्याच्या युद्धाच्या काळात निष्प्रभ ठरते. अमेरिकी नागरिकांच्या रोजच्या आव्हानांकडे लक्ष वेधत, त्यांच्यासाठी विविध योजनांचे आश्वासन दाखविणे हे राजकीयदृष्ट्या योग्य ठरत असले तरी जागतिक प्रश्नांकडे दुर्लक्ष करून अमेरिकेला चालणार नाही, असे मत माजी राजनैतिक अधिकारी व कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशनचे अध्यक्ष रिचर्ड यांनी व्यक्त केले. ‘अमेरिका फर्स्ट’चे धोरण हे संकुचित असून जगाची दिशाभूल करणारे आहे. जगात कुठेही काही घडले तरी त्याचे परिणाम अमेरिकेवर होतो, असेही ते म्हणाले.
कमला हॅरिस यांचा पोलंड, रुमानिया दौरा
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस या पुढील आठवड्यात पोलंड व रुमानियाला भेट देणार आहेत.त्यांच्या या दौऱ्यातून ‘नाटो’ संघटना व अमेरिकेची एकता आणि सामर्थ्य दर्शविणे साध्य होणार आहे. तसेच रशियाने लादलेल्या या युद्धात ‘नाटो’च्या पूर्वेकडील सहकाऱ्यांना पाठबळ देण्यात येणार आहे. युक्रेनच्या जनतेला पाठिंबा देण्यासाठी प्रयत्न करणे हेही या दौऱ्याचे उद्दिष्ट आहे, असे व्हाइट हाउसच्या माध्यम सचिव सब्रिनासिंह म्हणाल्या. हॅरिस ९ ते ११ मार्च या कालावधीत वॉर्सा, बुखारेस्ट व रुमानियाला भेट देणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.