हंगेरी, पोलंड, रोमानियासह अनेक देशांमार्गे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
कऱ्हाड (सातारा) : युक्रेनमधील आमच्या होस्टेलच्या परिसरातील काही ठिकाणी बॉम्बचा वर्षाव सुरू झाल्यामुळे आम्हाला बंकरमध्ये बसवले आहे. तीन ते चार हजार विद्यार्थी सध्या आमच्या बंकरमध्ये वास्तव्यास आहेत. दोन-तीन दिवस पुरेल एवढेच अन्न आहे. अजून किती दिवस आम्हाला येथे बसवतील हे सांगता येत नाही. अनेक ठिकाणची वीज, नेटवर्कही गेले आहे. त्यामुळे आम्हाला काळजी वाटतेय... सरकारने (Maharastra Government) लवकर काहीतरी करून आमची सुटका करावी... अशी आर्त साद युक्रेन येथे अडकलेल्या कऱ्हाड (जि. सातारा) येथील प्रतीक्षा अरबुणे या एमबीबीएसच्या विद्यार्थिनीने (MBBS Student) दैनिक ‘सकाळ’शी बोलताना सरकारला घातली आहे.
रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे (Russia Ukraine War) शिक्षणासाठी युक्रेनमध्ये असणारे देशातील अनेक विद्यार्थी तेथे अडकले आहेत. युद्धामुळे तेथील विमान सेवा रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, याचा सर्वाधिक फटका युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थांना बसला आहे. विमान सेवा बंद असल्यामुळे जवळपास १८ हजारहून अधिक भारतीय नागरिक, विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. हंगेरी, पोलंड, रोमानियासह अनेक देशांमार्गे युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, तेथे हल्ले सुरू झाल्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना बंकरमध्ये बसवण्यात आले आहे. त्याबाबत माहिती देताना प्रतीक्षा अरबुणे म्हणाली, ‘‘मी युक्रेनमध्ये एमबीबीएसच्या पाचव्या वर्षाला आहे. आम्ही ज्या परिसरात राहतो. त्या होस्टेलच्या परिसरातील काही ठिकाणी बॉम्बचा वर्षाव सुरू झाल्यामुळे आम्हाला बंकरमध्ये वास्तव्यासाठी आणण्यात आले आहे.
देशातील तीन ते चार हजार विद्यार्थी आमच्या बंकरमध्ये वास्तव्यास आहेत. आम्हाला बंकरमध्येही बॉम्बचे आवाज ऐकू येत आहेत. होस्टेलच्या कमांडटनी आमची खाण्याची व्यवस्था केली आहे. अजून किती दिवस आम्हाला येथे बसावे लागेल सांगता येत नाही. त्यातच दोन-तीन दिवस पुरेल एवढेच अन्न सध्या शिल्लक आहे, असे सांगितले जात आहे. युद्धामुळे अनेक ठिकाणची वीज, नेटवर्कही गेले आहे. आम्हाला कधी येथून बाहेर पडायला मिळेल सांगता येत नाही. आम्हाला खूपच काळजी वाटू लागली आहे. त्यामुळे सरकारने लवकर काहीतरी करून आम्हाला भारतात (India Government) न्यावे.’’ दरम्यान, युक्रेनवरून आजच कऱ्हाडला परतलेला विरवडे येथील आशिष वीर म्हणाला, ‘‘युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थिती असलेल्या भागात सध्या वीज बंद आहे. नेटवर्क बंद आहे. त्यामुळे संपर्कच होत नाही. आम्ही राहत होतो. तेथून काही अंतरावर बॉम्बस्फोट सुरू होते. आम्हालाही बॉम्बस्फोट सुरू झाल्यावर बंकरमध्ये बसण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्रामुळे सुदैवाने मला विमान मिळून मी भारतात परतलो आहे.’’
सातारा जिल्ह्यातील शिक्षणासाठी युक्रेनमध्ये गेलेले विद्यार्थी मायदेशी आणण्यासाठी खासदार श्रीनिवास पाटील (Shrinivas Patil) यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनीही त्यांच्याकडे मुले घरी परतण्यासाठी पाठपुरावा करण्याची विनंती केली आहे. त्यांनी स्वतः परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहून, त्यांच्याशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधून सातारा जिल्ह्यातील अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठीची कार्यवाही सुरू केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.