Russia and North Korea : हल्ला झाल्यास मदतीला धावून जाणार; पुतीन-किम जोंग यांच्यात व्यूहात्मक करार

‘दोघांपैकी कोणावरही इतर देशाांनी हल्ला केल्यास मित्रदेशाला पूर्ण मदत केली जाईल,’ असा अत्यंत महत्त्वाचा करार आज रशिया आणि उत्तर कोरिया या देशांदरम्यान झाला.
vladimir putin and kim jong un
vladimir putin and kim jong unsakal
Updated on

सोल - ‘दोघांपैकी कोणावरही इतर देशाांनी हल्ला केल्यास मित्रदेशाला पूर्ण मदत केली जाईल,’ असा अत्यंत महत्त्वाचा करार आज रशिया आणि उत्तर कोरिया या देशांदरम्यान झाला. या दोन्ही देशांना पाश्‍चिमात्य देशांकडून हल्ला होण्याचा धोका असल्याने त्यांनी हा व्यूहात्मक करार केला आहे.

रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन हे २४ वर्षांनंतर उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी आज उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांची भेट घेत त्यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. युक्रेनबरोबर दोन वर्षांहून अधिक काळापासून युद्ध सुरू असल्याने रशियाला शस्त्रांची कमतरता भासत आहे. त्यामुळे उत्तर कोरियाकडून शस्त्रखरेदी करत त्याबदल्यात या देशाला तंत्रज्ञान पुरविले जाईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

हे तंत्रज्ञान अण्वस्त्र कार्यक्रमाला उपयुक्त असेल, असे समजते. काही महिन्यांपूर्वी किम जोंग यांनी रशियाचा दौरा केल्यानंतर आज पुतीन यांनी उत्तर कोरियाला भेट दिली. यावेळी दोन्ही देशांनी एकमेकांच्या मदतीसाठी धावून जाण्याचा निर्णय घेतला. या करारानुसार नेमकी कशाप्रकारची मदत केली जाईल, हे जाहीर करण्यात आलेले नाही.

करार झाल्यानंतर दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत सुरक्षेच्या मुद्द्यावर विशेष भर दिला गेला, असे निवेदनात म्हटले आहे. तसेच, आजच्या कराराअंतर्गत उत्तर कोरियाबरोबर लष्करी-तंत्रज्ञान सहकार्य वाढविण्याचे सूतोवाचही पुतीन यांनी यावेळी केले.

तर, हा करार शांतता आणि संरक्षणासाठी असल्याचे किम जोंग यांनी स्पष्ट केले आहे. बहुकेंद्री जगाची निर्मिती करण्यासाठी हा करार उपयुक्त ठरेल, असेही ते म्हणाले. पाश्‍चिमात्यांच्या, विशेषत: अमेरिकेच्या वर्चस्वाला या दोन्ही देशांचा विरोध आहे. रशिया आणि उत्तर कोरिया यांच्यात यावेळी आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, विज्ञान या क्षेत्रांशी संबंधित करारही झाले.

दोन्ही देश अडचणीत

आंतरराष्ट्रीय समुदायाच्या कोणत्याही इशाऱ्याला भीक न घालता उत्तर कोरिया त्यांचा अणुकार्यक्रम राबवत आहे. त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड निर्बंध आहेत. तर, युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियावरही अनेक देशांनी आणि गटांनी निर्बंध लागू केले आहेत.

युक्रेनमधील युद्धासाठी रशियाला शस्त्रांस्त्राचा पुरवठा करत असल्याबद्दल अमेरिकेकडून उत्तर कोरियावर टीका होत आहे. तसेच, त्याबदल्यात अणुकार्यक्रम राबविण्यासाठी या देशाला रशियाकडून मदत मिळत असल्याचाही आरोप होत आहे. त्यामुळेच रशिया आणि उत्तर कोरिया एकमेकांच्या अधिक जवळ आल्याचे मानले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.