प्रश्‍नांचा एकट्याने सामना करणे अमेरिकेलाही अशक्य : जयशंकर

विविध प्रकारच्या समस्यांना नव्या पद्धतीने आणि सहकार्याने प्रतिसाद देण्यासाठी ‘क्वाड’ गटाची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
परराष्ट्र मंत्री जयशंकर
परराष्ट्र मंत्री जयशंकर Sakal
Updated on

म्युनिच : युरोपातील नाटो संघटनेप्रमाणेच आशियामध्ये भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांच्या क्वाड गटाचे स्वरुप असल्याचा चुकीचा प्रचार केला जात असल्याचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज स्पष्ट केले. तसेच, जगभरातील सर्वच ठिकाणच्या आणि विविध प्रकारच्या समस्यांना नव्या पद्धतीने आणि सहकार्याने प्रतिसाद देण्यासाठी ‘क्वाड’ गटाची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (Global News)

जर्मनीतील म्युनिच येथे सुरु असलेल्या सुरक्षा परिषदेत जयशंकर यांनी भारताची भूमिका मांडली. ‘समान उद्देश, समान मूल्य असलेल्या आणि हिंद-प्रशांत क्षेत्राच्या चार टोकांना वसलेल्या चार देशांचा मिळून क्वाड गट बनला आहे. सध्या जगासमोर असलेल्या सर्वच प्रश्‍नांना एकट्याने सामना करण्याची अमेरिकेसह कोणत्याही देशाची क्षमता नाही. ‘नाटो’प्रमाणे आम्ही एकमेकांशी करारानेही बांधले गेलेलो नाही, आमचे संयुक्त कार्यालयही नाही. हा गट ‘नाटो’ आहे असे भासवू पाहणाऱ्यांच्या प्रचाराला कोणी कृपया सत्य मानू नये,’ असे जयशंकर यांनी स्पष्ट केले.

पूर्व लडाखमधील तणावामुळे चीनवर दबाव आणण्यासाठी क्वाडचा वापर केला जात असल्याबाबत होणाऱ्या चर्चेला उत्तर देताना जयशंकर यांनी, हा गट २०१७ मध्ये स्थापन झाला आहे, २०२० मध्ये घडलेल्या घटनांनंतर नाही, असे निदर्शनास आणून दिले.

रिकाम्या विमानतळांकडे आधी पाहा : जयशंकर

म्युनिच : पायाभूत सेवा प्रकल्पांसाठी कर्जाची मागणी करणाऱ्या देशांनी रिकामी विमानतळे आणि बंदरांबाबत चिंता करावी, असे परखड मत परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री ए. के. अब्दुल मोमेन यांच्याशी बोलताना व्यक्त केले.

चीनकडून इतर देशांना ज्याप्रमाणे कर्जपुरवठा होतो, तसा कर्जपुरवठा ‘क्वाड’ गटाकडून होणे शक्य आहे का, असे मोमेन यांनी जयशंकर यांना विचारले होते. त्यावर बोलताना जयशंकर म्हणाले की, ‘अनेक देश सध्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. यात आशियातील देशांचाही समावेश आहे. या देशांमध्ये व्यावसायिकदृष्ट्या निरुपयोगी ठरलेले अनेक प्रकल्प आपण पाहू शकतो. विमानतळांवर विमानेच येत नाहीत, बंदरांकडे जहाजे फिरकत नाहीत.’ चीनकडून कर्ज घेऊन बंदरांचा विकास करणारा श्रीलंका आता हे कर्ज फेडण्यासाठी झगडत असल्याचा संदर्भ जयशंकर यांच्या या बोलण्याला होता. काल (ता. १९) एका चर्चासत्रात बोलताना जयशंकर यांनी, भारत आणि चीन संबंध सध्या कठीण काळातून जात असल्याचे म्हटले होते. सीमेवरील परिस्थितीवर भारत-चीन संबंध अवलंबून असल्याचेही ते म्हणाले होते.

जयशंकर म्हणाले...

  • जागतिक पातळीवर क्वाड आणि भारताचे काम मोठे

  • क्वाड गटाच्या सदस्यांमध्ये उत्तम समन्वय

  • भारत आणि अग्नेय आशियातील देशांमधील विश्‍वास वाढत आहे

  • तंत्रज्ञान आणि इतर वस्तूंची पुरवठा साखळी मजबूत करण्यावर भारताचा भर

क्वाड गटातील सदस्य देशांचे एकमेकांबरोबरील संबंध गेल्या वीस वर्षांत दृढ झाले आहेत. क्वाड गटाला स्वत:चे एक मूल्य आहे. सहकार्याने काम करूनच जगाला अधिक चांगले बनवता येईल, या जाणिवेतून आम्ही एकत्र आलो आहोत.

- एस. जयशंकर, परराष्ट्र मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.