Saudi Arabia : सौदी अरेबियामध्ये ७० वर्षांमध्ये पहिल्यांदाच दारुचं दुकान सुरु होतंय; 'हे' आहे कारण...

अनेक प्रतिगामी कायद्यांचे कसोशीने पालन करणाऱ्या सौदी अरेबियामध्ये सध्या सामाजिक बदलाचे वारे वाहत असून येथे प्रथमच मद्यविक्रीचे दुकान सुरू करण्यात येत आहे. या दुकानात फारच निवडक लोकांना प्रवेश मिळणार आहे.
Saudi Arabia
Saudi Arabia esakal
Updated on

रियाध : अनेक प्रतिगामी कायद्यांचे कसोशीने पालन करणाऱ्या सौदी अरेबियामध्ये सध्या सामाजिक बदलाचे वारे वाहत असून येथे प्रथमच मद्यविक्रीचे दुकान सुरू करण्यात आले आहे. मागील ७० वर्षांत प्रथमच सरकारने अशा प्रकारच्या दुकानाला परवानगी दिली आहे. अर्थात, या दुकानात फारच निवडक लोकांना प्रवेश मिळणार आहे.

सौदी अरेबियाचे युवराज महंमद बिन सलमान यांनी या देशाला पर्यटन आणि व्यापाराचे केंद्र बनविण्याचे ठरविले आहे. अर्थव्यवस्था केवळ कच्च्या तेलाच्या निर्यातीवरच अवलंबून राहू नये, असे त्यांचे मत आहे. त्यामुळेच त्यांनी काही कठोर नियम बदलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आतापर्यंत पूर्णपणे बंदी असलेल्या मद्यविक्रीच्या दुकानाला राजधानी रियाधमध्ये परवानगी देण्यात आली आहे.

Saudi Arabia
IND vs ENG 1st Test Day 1 : यशस्वी जयस्वालची फटकेबाजी; पहिल्या दिवसावर भारताची छाप

सध्या एकच दुकान उघडण्यात आले असून येथे केवळ इतर देशांच्या आणि मुस्लिम नसलेल्या राजदूतांनाच प्रवेश दिला जाणार आहे. कोणत्याही मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर जसे मद्यविक्रीचे दुकान असते, तसेच हे दुकान आहे. या दुकानात सध्या निवडक प्रकारचेच मद्य विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे.

मद्यखरेदीसाठी येणाऱ्या राजदूताला स्वत: दुकानात यावे लागणार आहे. वाहनचालकाला किंवा इतर कोणाला पाठवून स्वत:साठी मद्य मागविता येणार नाही. दुकानात त्यांना आपले ओळखपत्र दाखवून आणि मोबाईल फोन जमा करूनच प्रवेश करता येणार आहे. मद्यखरेदीवरही मर्यादा घालून देण्यात आली आहे. यापूर्वी राजदूतांना विशेष परवानगी घेऊन मद्य आयात करावे लागत होते.

Saudi Arabia
Rahul Gandhi : भारत न्याय यात्रेत राहुल गांधींच्या 'डुप्लिकेट'चा वापर; आसामच्या मुख्यमंत्र्यांचे गंभीर आरोप

उदार धोरणाकडे वाटचाल

सौदी अरेबियामध्ये १९५० च्या दशकापासून मद्यबंदी आहे. सौदीचे संस्थापक-सत्ताधीश अब्दुल अझीझ यांचे पुत्र मिशारी यांनी मद्याच्या नशेत एका ब्रिटिश राजनैतिक अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर राजे अझीझ यांनी संपूर्ण देशात मद्यबंदी जाहीर केली होती. इराणमध्ये १९७९ मध्ये क्रांती झाल्यानंतर आणि मक्केतील मशिदीवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर सौदी अरेबिया हा देश अधिक कट्टर असलेल्या वहाबी पंथाकडे झुकला.

त्यामुळे महिलांवर कठोर बंधनांसह अनेक नियम लागू झाले. सध्याचे राजे सलमान आणि युवराज सलमान यांनी उदार धोरण स्वीकारत चित्रपटगृहे सुरू केली, महिलांना वाहन परवाना दिला, संगीत महोत्सव आयोजित केले. ५०० अब्ज डॉलर खर्च करून ‘निओम’ नावाचे भविष्यकालीन शहर निर्माण करण्याचा सौदी अरेबियाचा प्रयत्न आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.