पुरुलिया : प. बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यातील जारगो या दुर्गम खेड्यातील प्रशालेत दहावीत शिकणाऱ्या सीमा महातो या आदिवासी विद्यार्थिनीला आता संध्याकाळी किंवा रात्रीही एकटीने फिरण्याची भीती वाटत नाही. स्वसंरक्षणाचे धडे मिळाल्यामुळे तिचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे.
छेड काढणाऱ्यांचा कसा सामना करायचा, हेही तिला माहीत झाले आहे. अर्थात, सीमा जारगो गावातील अशी एकमेव विद्यार्थिनी नाही. जिल्ह्यातील तिच्यासारख्या अनेक मुलींना मार्शल आर्ट, कराटे, तायक्वांदोच्या माध्यमातून स्वसंरक्षणाचे धडे दिले जात आहेत.
कोलकत्यापासून सुमारे ३०० किमीवर असलेल्या या शाळेत विद्यार्थिनींच्या स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमासाठी स्थानिक प्रशासनासह ‘युनिसेफ’कडूनही निधी दिला जात आहे. ‘युनिसेफ’च्या शिष्टमंडळाच्या भेटीदरम्यान या विद्यार्थिनींनी तायक्वांदोची प्रात्यक्षिकेही करून दाखविली. सीमा यासंदर्भात बोलताना म्हणाली, की आमच्या शाळेतील मार्शल आर्ट शिक्षकांनी एखाद्या व्यक्तीने हल्ला केल्यावर स्वत:चे संरक्षण कसे करायचे, हे शिकविले.
मी तायक्वांदोही शिकले असल्याने लाथ मारून वीटही फोडू शकते. यापूर्वी संध्याकाळ झाल्यानंतर घराबाहेर पाठविण्यासाठी माझे पालक नाखूष होते. मात्र, आता त्यांची मानसिकता बदलली आहे.
मी तायक्वांदो शिकल्याने व तसेच कुणी हल्ला केल्यास स्वत:चे रक्षण कसे करायचे, हे माहीत असल्याने मला एकटीने संध्याकाळी घराबाहेर जाण्याची भीती वाटत नाही. एकटीने मित्रमैत्रिणी किंवा नातेवाइकांच्या घरी जाणे ही आता समस्याच राहीली नाही, असेही तिने नमूद केले.
याच प्रशालेतील ११ वीची विद्यार्थिनी शकुंतला महातोचा अनुभवही असाच आहे. या दोघींबरोबरच बंगाली माध्यमातील शाळेत शिकणाऱ्या त्यांच्या इतर मैत्रिणीही मार्शल आर्ट, तायक्वांदो शिकत आहेत. तसेच विविध मैदानी खेळांचा आनंदही लुटत आहेत. पुरुलिया जिल्ह्यातील इतर प्रशालांतील विद्यार्थिनींनाही स्वसंरक्षणाचे धडे दिले जात आहेत.
मार्शल आर्टच्या प्रशिक्षणामुळे विद्यार्थिनींची भीती कमी होत आहे. यापूर्वी संध्याकाळनंतर घराबाहेर जाताना पालक व कुटुंबीय नेहमीच माझ्यासोबत असत. मात्र, आता स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण मिळाल्यानंतर मी खासगी शिकवणीला किंवा मैत्रिणीच्या घरी एकटीने जाऊ शकते.
- शकुंतला महातो, विद्यार्थिनी
स्वसंरक्षणाच्या प्रशिक्षणामुळे विद्यार्थिनीचा आत्मविश्वास वाढत आहे. इयत्ता आठवी आणि बारावीच्या विद्यार्थिनींना हे प्रशिक्षण दिले जात आहे. परंतु बहुतेक प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनी नववी आणि दहावीमधील आहेत. त्यांना तायक्वांदो, कराटे, मार्शल आर्ट आदींचे प्रशिक्षण दिले जात आहे.
- मोहम्मद मोहिउद्दिन, युनिसेफचे प.बंगाल प्रमुख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.