Fight with Corona : पाकमधील हिंदू-ख्रिश्चनांना शाहिद आफ्रिदीचा मदतीचा हात!

Shahid-Afridi-Foundation
Shahid-Afridi-Foundation
Updated on

कराची : कोरोना व्हायरच्या फैलावामुळे जगभरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. जवळपास सर्वच देशांमध्ये लॉकडाऊन घोषित केल्यामुळे कष्टकरी, मजूर आणि गरिबांचे खूप हाल होत आहेत. अडचणीच्या काळात जगभरातील अनेक दानशूर व्यक्ती याकामी पुढे आल्या आहेत. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी आपल्यापरीने शक्य तेवढी मदत करत आहे. 

शाहिदने गेल्या काही दिवसांपासून त्याच्या परिसरातील गरीब आणि गरजू लोकांना अन्न आणि इतर आरोग्यविषयक गोष्टींचे वाटप केले आहे. शाहिद आफ्रिदी फाउंडेशन या संस्थेअंतर्गत गेल्या अनेक दिवसांपासून तो हे दान करत आहे. आतापर्यंत शाहिदने फाउंडेशनमार्फत २ हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. 

'डोनेट करो ना' या नावाने शाहिद ही मोहिम राबवत आहे. गेल्या आठवड्यात शाहिदने तांदूळ वाटपाची मोहिम राबवली होती. आज त्याने कराचीमधील हिंदू आणि ख्रिश्चन वस्त्यांमधील गरजूंना अन्न आणि इतर आवश्यक वस्तूंचे वाटप केले. याबाबतचे ट्विट करत आफ्रिदीने सदर माहिती दिली. तसेच त्याने काही फोटोही शेअर केले आहेत. ट्विटमध्ये शाहिदने म्हटले आहे की, ''शाहिद आफ्रिदी फाउंडेशनतर्फे कराचीमधील अल्पसंख्यांक हिंदू आणि ख्रिश्चन कुटुंबीयांना रेशन पुरविण्यात आले.''

दरम्यान, टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि युवराज सिंग यांनी आफ्रिदीच्या या कामाचे कौतुक केले असून त्याला पाठिंबा दर्शविला आहे. हरभजनने म्हटले आहे की, 'शाहिद आणि त्याचं फाउंडेशन खूप चांगलं काम करत आहेत. तो जे काम करत आहे, त्यात आपण हातभार लावूया आणि शक्य तितकी मदत करूया.'

तसेच युवराजनेही शाहिदचे कौतुक करताना म्हटले आहे की, 'हा अडचणीचा काळ आहे. ज्या लोकांकडे काही नाही, अशा लोकांची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे. चला या कामी योगदार देऊया. मी स्वत: शाहिद आणि त्याच्या फाउंडेशनच्या समाजकार्याला सपोर्ट करतो. तुम्ही त्याचा या कार्यात मदत करा.'

गेल्या काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमधील हिंदू व्यक्तींना अन्नधान्य मिळत नसल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. याचीच दखल घेत शाहिद आणि फाउंडेशनने पाकमधील हिंदू आणि ख्रिश्चन व्यक्तींपर्यंत मदत केली. आणि 'हिंदू-मुस्लीम-सीख-ईसाइ, हम सब है भाई-भाई' हे प्रत्यक्षात आपल्या कार्याद्वारे दाखवून दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.