अमेरिका : ``हिंद प्रशान्त महासागर क्षेत्रातील समस्या सोडविण्याच्या दृष्टीने क्वाड (डायलॉग) गट कळीची भूमिका बजावत असून, भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया व जपान या सदस्य राष्ट्रांच्या 11 फेब्रवारी 2022 रोजी झालेल्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीकडे पाहावे लागेल,’’ असे मत हवाईतील प्रसिद्ध `ईस्ट वेस्ट सेन्टर’च्या अध्यक्ष सूझन व्हारेस लुम यांनी `सकाळ’ बरोबर बोलताना व्यक्त केले.
श्रीमती व्हारेस लुम या `इस्ट वेस्ट सेन्टर’च्या साठ वर्षांच्या इतिहासात अध्यक्षपदी नेमणूक झालेल्या हवाई वंशाच्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. अमेरिकन लष्करातील त्या माजी टू स्टार जनरल आहेत.
होनोलुलु येथील त्यांच्या कार्यालयात 15 फेब्रुवारी रोजी भेट घेता त्यांनी `इस्ट वेस्ट सेन्टर’चे महत्व विषद करीत येत्या भविष्यात हिंद-प्रशान्त महासागर क्षेत्राला अनन्य साधारण महत्व येणार असल्याचे सांगितले. ``या क्षेत्रात 34 राष्ट्रे, 14 काल विभाग (टाईम झोन्स), हजारो भाषा, अऩेक संस्कृती आहेत. इतिहासकालापासून त्यांचे सागरी संबंध आहेत. जगापुढे आज कोविड 19 चे संकटाचे आव्हान उभे आहे. या साथीने सहकार्यांच्या संधिही उपलब्ध करून दिल्या आहेत. तथापि, सागरी महामार्गांचा मुक्त वापर, दहशतवाद, मानवी व अन्य घातक पदार्थांची तस्करी, मासेमारी व खनिज संपत्तीच्या उत्खननाच्या समस्या, समुद्रातील दावे प्रतिदावे सोडविण्याच्या दृष्टीने व महासागरी मार्गाने खुला व्यापार होण्याच्या दृष्टीने `क्वाड’ या व्यूहात्मक चतुष्कोनातर्फे चाललेल्या प्रयत्नांकडे पाहावे लागेल.’’
``ज्या दिवशी (11 फेब्रुवारी) रोजी `क्वाड’ची बैठक झाली, त्याच दिवशी केंद्राच्या संचालक मंडळाची बैठक झाली. भारतातील प्रसिद्ध उद्योगपती टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा संचालक मंडळाचे सदस्य आहेत. बैठकीत पुढील दहा वर्षाच्या वाटचालीचा आराखडा तयार करण्यात आला. या कालावधीत `इस्ट वेस्ट सेन्टर’ला वैचारिक दृष्टीने अधिक समृद्ध करून जटील समस्या सोडविण्यासाठी काय करावयास हवे, याचे मार्गदर्शन जागतिक नेतृत्वाला करण्यात येईल,’’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
``करोनाने जगाला एका एकत्र आणले,’’ असे एका प्रश्नाच्या उत्तरात सांगून त्या म्हणाल्या, की त्यावर उपाय शोधण्याचे प्रयत्न सर्वत्र चालू आहेत. ``आमच्या केंद्रातील साथींचे तज्ञ डॉ. टीम ब्राऊन यांचेही संशोधन सुरू आहे. त्यांचे निष्कर्ष त्यांनी आरोग्य संस्थांना उपलब्ध करून दिले आहेत.’’
सेन्टरच्या वाटचालीविषयी विचारता, व्हारेस लुम म्हणाल्या, ``दुसरे महायुद्ध व कोरियन युद्ध याच्या काळात केंद्राच्या स्थापनेचा विचार सुरू झाला. दोन वेगवेगळ्या संस्कृतींचा हा संघर्ष होता. त्यावेळी सिनेटर लिंडन जॉन्सन ( जे पुढे अमेरिकेचे अध्यक्ष झाले) त्यांनी `पश्चिम व पूर्वेचे जागतिक संवाद व वैचारिक देवाणघेवाणीचे एक केंद्र हवे,’ या उद्देशाने प्रस्ताव मांडला. 1960 मध्ये केंद्राची स्थापना झाली. त्यानंतर गेल्या साठ वर्षात अनेक युवक, संशोधक, तज्ञ, विचारवंत यांनी केंद्राचा लाभ घेतला असून, तब्बल तीन हजार भारतीय विद्यार्थ्यांनी आजवर केंद्रातून शिक्षण घेतले आहे. त्याचप्रमाणे, गेल्या काही वर्षात 44 भारतीय विद्यार्थ्यांनी निरनिराळ्या परिसंवादात भाग घेतला. भारतातील 7 पदवीधर आज केंद्रात अध्ययन करीत आहेत.’’
``केंद्राच्या पत्रकारीता विभागात अनेक देशातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी एका मुस्लिम विद्यार्थ्याने ज्यूंच्या सॅनॅगॉग (मंदिराला) भेट देऊन तेथील कायदेपंडिताची भेट घेतली. त्यानंतर ज्यूंविषय़ीच्या त्याच्या विचारात बरेच परिवर्तन झाल्याचेही उदाहरण मी सांगू शकते.’’
``गेली अऩेक वर्षे भारत व फिजीतून आलेल्या भारतीय वंशाच्या लोकांनी अमेरिकेच्या अनेक क्षेत्रात उत्तम कार्य केले असून, अमेरिकेला समृद्ध केले आहे. समानता, पारदर्शकता, वैचारिक देवाण घेवाण, व्यक्ती स्वातंत्र्य या मूल्यांचे दोन्ही राष्ट्रांनी जतन केले आहे.’’
`इस्ट वेस्ट सेन्टर’च्या भारतात पाच शाखा आहेत. केद्राने आयोजित वेगवेगळ्या कार्यक्रमात नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर आदींची भाषणे झाली आहेत.
``हवाईला व्यूहात्मक महत्व आहे’’, असे सांगून त्या म्हणाल्या ``हिंद-प्रशांत महासागरातील भौगोलिक दृष्ट्या हवाई हे मोक्याचे ठिकाण आहे. दुसऱ्या महायुद्धात जपानने येथील पर्ल हार्बरवर हल्ला केला होता. त्यामुळे अमेरिकेच्या व प्रशान्त महासागराच्या संरक्षणाच्या दृष्टीने हवाईचा विकास झाला. येथे एच.एस.स्मिथ नाविक तळ प्रशान्त महासागरातील एकमेव व सर्वात मोठा तळ असून त्यातून दोन लाख एंशी हजार नौसैनिक, अधिकारी, काम करीत आहेत.’’
केंद्रातील अध्ययनाचा सामंजस्य निर्माण करण्यासाठी कसा लाभ होतो, याचे उदाहरण देताना त्या म्हणाल्या, की सुरूवातीच्या काळात दक्षिण कोरियाच्या एक महिला विधायक येथे आल्या होत्या. केंद्रातील वास्तव्य व अध्ययनानंतर त्यांच्या विचारात अमुलाग्र बदल झाला. मायदेशी परतल्यावर त्यांनी महिलांना कौटुंबिक संपत्तीत वाटा मिळविण्याचा हक्क दिला. त्यासाठी कायद्यात दुरूस्ती केली. तेथील पुरूष व महिलांच्या कौटुंबिक अधिकारांच्या समानतेच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल होते.
``रशिया विरूद्ध युक्रेन; अमेरिका विरूद्ध चीन; रशिया, भारत विरूद्ध चीन व पाकिस्तान एरणीवर आलेल्या समस्या संर्घर्षाएवजी शिष्टाईच्या मार्गाने सोडविण्यात आल्या पाहिजे,’’ असे मत त्या व्यक्त करतात. ``केवळ समस्यांचा विचार न करता व ते अधिक तीव्र न करता त्यातून कसा मार्ग काढता येईल, याचा विचार व्हावयास हवा.’’
चीनने दक्षिण चीन समुदावर केलेल्या दाव्या विषयी विचारता, त्या म्हणाल्या, की मी चीन विषयक तज्ञ नाही. तथापि, महासागर असो, अवकाश असो, सायबर स्पेस असो की भूमी, यांचा वापर करण्याविषयी जागतिक संकेत, कायदे व नियमांचा सर्व राष्ट्रांनी आदर करावयास हवा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.