अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये मंगळवारी झालेल्या दोन बॉम्बस्फोट आणि गोळीबारात 25 जण ठार झाले आहेत.
काबूल : अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी असलेल्या काबूलमध्ये (Kabul) मंगळवारी झालेल्या दोन बॉम्बस्फोट आणि गोळीबारात 25 जण ठार झाले आहेत. काबूलमधील सर्वात मोठ्या लष्करी रुग्णालयात (Military Hospital) बंदूकधाऱ्यांच्या एका गटानं हल्ला केला आणि अंदाधुंद गोळीबार केला, असं सांगण्यात येतंय. हल्लेखोर नंतर तालिबानी सैनिकांशी झालेल्या चकमकीत ठार झाले. यादरम्यान तालिबानचा टॉप कमांडर मौलवी हमदुल्ला मुखलिसही (Maulvi Hamdullah Mukhlis) मारला गेल्याचं समजतंय. याला एएफपी न्यूज एजन्सीनंही (AFP News Agency) दुजारा दिलाय. तो तालिबानच्या काबूल मिलिटरी कॉर्प्सचा प्रमुख होता.
तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी सांगितलं, की 400 खाटांच्या सरदार मोहम्मद दाऊद खान रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर हा स्फोट झाला. यानंतर इस्लामिक स्टेटच्या बंदुकधारी गटानं हल्ला केला. ज्यात सर्वजण 15 मिनिटांत मारले गेले. त्यानंतर तालिबानच्या स्पेशल फोर्स कमांडो टीमला हेलिकॉप्टरनं हॉस्पिटलच्या आवारात सोडण्यात आलं. यामुळं हल्लेखोरांना रुग्णालयाच्या आवारात प्रवेश करण्यापासून रोखलं गेलं आणि सर्वांना गेटवर गोळ्या घालून ठार मारलं, असं त्यांनी सांगितलं.
आतापर्यंत 25 ठार, 50 जखमी
तालिबानच्या एका सुरक्षा अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं, की या हल्ल्यात 25 लोक ठार झाले असून 50 हून अधिक जखमी झाले आहेत. परंतु, अधिकृत जीवितहानी झाल्याची पुष्टी झालेली नाही. काबुल मिलिटरी कॉर्प्सचे प्रमुख मौलवी हमदुल्ला मुखलिस हे मृतांमध्ये सामील असल्याचंही तालिबानच्या अधिकाऱ्यानं सांगितलंय.
मौलवी हमदुल्ला मुखलिस कोण होता?
मौलवी हमदुल्ला मुखलिस हा तालिबानचा टॉप कमांडर होता. काबूलच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर होती. तो काबूल मिलिटरी कॉर्प्सचा प्रमुखही होता. मौलवी हमदुल्ला मुखलिस यानं तालिबान आणि हक्कानी नेटवर्कमधील समन्वयासाठी काम केलंय. तालिबाननं काबूलवर ताबा मिळवल्यानंतर, त्याच्या सुरक्षेची जबाबदारी हक्कानी नेटवर्कच्या अनस हक्कानीवर सोपवण्यात आली. नंतर राजधानीच्या सुरक्षेची जबाबदारी मौलवी हमदुल्ला मुखलिस याच्याकडे सोपवली गेली. 14 ऑगस्ट रोजी काबूलमध्ये तालिबानच्या प्रवेशानंतर मौलवी हमदुल्ला मुखलिस हे राष्ट्रपती भवनात प्रवेश करणारे पहिले होते. त्याचा हा फोटो जगभरातील माध्यमांनी प्रसिद्धही केला होता. मुखलिसनं कतारच्या मीडिया अल जझीराला मुलाखतही दिली होती. ज्यात त्यानं तालिबानच्या ताकदीचं कौतुक केलं होतं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.