जीनिव्हा : कोरोना विषाणूचा नवा प्रकार असलेल्या ‘ओमिक्रॉन’मुळे जगभरात निर्माण झालेला संसर्गाचा ‘अत्यंत मोठा’ धोका निर्माण झाला असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने आज दिला. मात्र, ‘ओमिक्रॉन’बाबत अद्याप अभ्यास सुरु असून हा विषाणू अधिक संसर्गजन्य आहे का किंवा इतर कोरोना प्रकारांच्या तुलनेत अधिक परिणाम करणारा आहे का, याची आताच निश्चित माहिती सांगता येणार नाही, असेही या संघटनेने आज स्पष्ट केले आहे.
‘ओमिक्रॉन’मुळे संसर्गाची आणखी एक लाट निर्माण झाल्यास, त्याचे परिणाम गंभीर असू शकतात, असे जागतिक आरोग्य संघटनेने आज सांगितले. या विषाणूमुळे अद्याप कोणाचा मृत्यू झाल्याची मात्र नोंद झालेली नाही, असेही या संघटनेने सांगितले. दक्षिण आफ्रिकेत सर्वप्रथम आढळलेल्या ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग अनेक देशांत झाला असल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. अनेक देशांनी विदेशी प्रवाशांसाठी आपल्या सीमा बंद केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेसह आफ्रिकेतील आठ देशांवर प्रवास निर्बंधही लागू केले आहेत. कोरोनाच्या सर्वांत चिंता करण्याजोग्या प्रकारांमध्ये डेल्टा बरोबरच आता ओमिक्रॉनचाही आरोग्य संघटनेने समावेश केला आहे. मात्र, तरीही हा नवा प्रकार धोकादायक असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही. तसेच, या विषाणूची बाधा झाल्यास दिसून येणारी लक्षणे फार वेगळी असल्याचेही दिसून आलेले नाही, असे आरोग्य संघटनेने स्पष्ट केले. ओमिक्रॉनबाबत सविस्तर माहिती मिळण्यास आणखी काही दिवस अभ्यास करावा लागेल, असेही सांगण्यात आले.
दक्षिण आफ्रिकेत गेल्या काही दिवसांत रुग्णालयांत भरती होणाऱ्या संसर्गग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र, यातील किती रुग्णांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाला आहे, ते स्पष्ट झालेले नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले.
न्यूझीलंडमध्ये निर्बंध शिथिल होणार
वेलिंग्टन : ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग वाढत असतानाही न्यूझीलंड सरकार ऑकलंड आणि इतर काही शहरांमध्ये लागू असलेले निर्बंध शिथील करण्यावर ठाम आहे. गेल्या अनेक महिन्यांच्या कडक निर्बंधांनंतर आम्ही नियम कमी करत आहोत. आताही नागरिकांच्या आरोग्याची पुरेशी काळजी घेऊनही निर्बंध शिथिल करण्याच्या पुढील टप्प्यात आम्ही प्रवेश करत आहोत, असे देशाच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी सांगितले.
‘ओमिक्रॉन’चा संसर्ग
पोर्तुगाल : एका क्लबच्या फुटबॉल संघाच्या पथकातील १३ जणांना संसर्ग
ब्रिटन : स्कॉटलंडमधील सहा जणांसह ब्रिटनमधील एकूण नऊ जणांना संसर्ग
नेदरलँड : एक बाधित आढळल्याने लॉकडाऊन जाहीर.
इस्राईल आणि जपान : विदेशी नागरिकांसाठी सीमा बंद
"जगभरातल लस वाटपात असमानता असल्याचा परिणाम म्हणून कोरोनाचे नवीन प्रकार निर्माण होत आहेत. ही असमानता जितका अधिक काळ असेल, तितका विषाणूचे नवे प्रकार निर्माण होण्याचे आणि त्यापासून धोका वाढण्याचे प्रकार घडत राहतील."
- टेड्रोस अधनोम घेब्रेयेसूस, सरचिटणीस, डब्लूएचओ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.