2024 US elections : ट्रम्प यांना पराभूत करणे हाच उद्देश;कमला हॅरिस यांचे प्रतिपादन,बायडेन यांच्या माघारीनंतर उमेदवारीची आशा

‘‘ज्यो बायडेन यांनी मला पाठिंबा देणे ही फार मोठी गोष्ट आहे. यापुढे डेमोक्रॅटिक पक्षाकडून अध्यक्षपदासाठी उमेदवारी ‘कमावणे’ आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना निवडणुकीत पराभूत करण्यासाठी संपूर्ण देशाला एकजूट करणे, हे माझे प्रमुख ध्येय आहे,’’
2024 US elections
2024 US electionssakal
Updated on

वॉशिंग्टन : ‘‘ज्यो बायडेन यांनी मला पाठिंबा देणे ही फार मोठी गोष्ट आहे. यापुढे डेमोक्रॅटिक पक्षाकडून अध्यक्षपदासाठी उमेदवारी ‘कमावणे’ आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना निवडणुकीत पराभूत करण्यासाठी संपूर्ण देशाला एकजूट करणे, हे माझे प्रमुख ध्येय आहे,’’ असे अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांनी आज जाहीर केले. बायडेन यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेत हॅरिस यांच्या नावाला पाठिंबा जाहीर केला आहे. हॅरिस या निवडून आल्यास त्या देशाच्या पहिल्या महिला, तसेच आशियाई वंशाच्या पहिल्या अध्यक्षा ठरतील.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरील जाहीर चर्चेतील अत्यंत सुमार कामगिरीनंतर अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्यासाठी दबाव वाढलेल्या बायडेन यांनी रविवारी अखेर प्रकृतीच्या कारणास्तव माघार घेत कमला हॅरिस यांना पाठिंबा जाहीर केला. मागील काही दिवसांपासून याबाबतचा अंदाज अनेक माध्यमांमधूनही व्यक्त केला जात होता. त्यावर शिक्कामोर्तब झाले. बायडेन यांनी पाठिंबा दिल्याने हॅरिस यांना उमेदवारी मिळणे जवळपास निश्‍चित असले तरी, डेमोक्रॅटिक पक्षाने याबाबत अधिकृतरीत्या निर्णय जाहीर केलेला नाही.

आगामी काही दिवसांत एक पारदर्शक प्रक्रिया राबवत ट्रम्प यांना पराभूत करण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराची निवड केली जाईल, असे पक्षाचे अध्यक्ष जेमी हॅरिसन यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, पक्षातील एकूण हालचाली पाहता हॅरिस याच उमेदवार असतील, असा राजकीय विश्र्लेषकांचा अंदाज आहे. बायडेन यांनी पाठिंबा जाहीर केल्यानंतर कमला हॅरिस यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. ‘‘बायडेन यांनी आतापर्यंत केलेल्या नेतृत्वाबद्दल अमेरिकी जनतेच्या वतीने मी त्यांचे आभार मानते. मी मागील काही महिन्यांत देशभरात फिरून लोकांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. अध्यक्षाबाबतच्या त्यांच्या अपेक्षा मला माहिती आहेत. त्यामुळेच ट्रम्प यांना पराभूत करण्यासाठी सर्व पक्षाला आणि देशाला एकजूट करण्यासाठी मी प्रयत्न करेन. आपण एकत्रित लढू आणि निवडणूक जिंकू.’’

पुढची रणनीती कशी असणार?

कमला हॅरिस यांना उमेदवारी मिळविण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या डेलिगेट्‌सकडून पाठिंबा मिळवावा लागणार आहे. उमेदवारीसाठी १,९७६ डेलिगेट्‌सचा पाठिंबा आवश्‍यक असताना बायडेन यांना ३,८९६ जणांचा पाठिंबा मिळाला होता. पक्षाची पुढील महिन्यात १९ तारखेला शिकागो येथे परिषद होणार आहे. यावेळेपर्यंत हॅरिस यांना पक्षांतर्गत पाठिंबा मिळवावा लागणार आहे. विविध राज्यांमधील पक्षांच्या प्रमुखांनीही हॅरिस यांना समर्थन दिले. बराक ओबामा आणि नॅन्सी पेलोसी या नेत्यांनी मात्र पाठिंबा जाहीर केलेला नाही.

ज्यो बायडेन यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याने राजकारणातील त्यांच्या सक्रीयतेचे अखेरचे पाचच महिने शिल्लक राहिल्याचे निश्‍चित आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातील नेत्यांनी बायडेन यांनी अध्यक्ष म्हणून आतापर्यंत दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहेत. अत्यंत आव्हानात्मक जागतिक परिस्थितीत बायडेन यांनी नेतृत्व करताना अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले आहे. याशिवाय, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जपान, युक्रेन, इस्राईल, न्यूझीलंड, पोलंड आणि इतर अनेक देशांच्या प्रमुखांनी बायडेन यांच्या व्यक्तिमत्त्वाचे कौतुक केले आहे.

इतर घडामोडी

  • अमेरिकेतील भारतीयांचे हॅरिस यांना समर्थन

  • डेमोक्रॅटिक पक्षाने आपल्या प्रचार मोहिमेचे ‘एक्स’वरील अकाऊंटचे ‘बायडेनएचक्यू’ हे नाव बदलत ‘कमलाएचक्यू’ असे केले

  • कमला हॅरिस यांची पाठिंब्यासाठी पक्षाच्या नेत्यांना फोनाफोनी

  • आशियाई नेत्यांकडून पाठिंबा जाहीर

उमेदवारीच्या शर्यतीतील अन्य नावे

जे. बी. प्रिट्झकर : हे इलिनॉईस प्रांताचे गव्हर्नर असून अमेरिकेत सध्या अधिकारपदावर असलेल्यांपैकी सर्वांत श्रीमंत नेते आहेत. गव्हर्नरपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्या पक्षाच्या उमेदवाराला पराभूत करून ते सलग दुसऱ्यांदा या पदावर आले होते.

ग्रेशेन व्हिटमर : मिशिगनच्या गव्हर्नर. २०१८ नंतर त्यांचे डेमोक्रॅटिक पक्षातील वजन वेगाने वाढले आहे.

गॅविन न्यूसम : कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर. राज्याच्या राजकारणावर पूर्ण पकड.

जोश शापिरो : पेनसिल्वानियाचे गव्हर्नर. ट्रम्प यांची लाट असतानाही निवडून येण्यात यशस्वी झाले होते.

रॉय कूपर : उत्तर कॅरोलिनाचे गव्हर्नर. राज्य पातळीवरील सहा निवडणुका जिंकण्याचा अनुभव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.