Medical Education : वैद्यकीय शिक्षणासाठी भारतीय विद्यार्थ्यांचा उझबेकिस्तानकडे कल

उझबेकिस्तानमधील ९३ वर्षे जुन्या समरकंद वैद्यकीय विद्यापीठात अशा भारतीय विद्यार्थ्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.
Medical Education
Medical Educationsakal
Updated on

समरकंद (उझबेकिस्तान) - युक्रेन व रशियादरम्यान दीर्घकाळापासून सुरू असलेल्या युद्धामुळे येथे वैद्यकीय शाखेची पदवी पूर्ण करून डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी युक्रेनचे दरवाजे बंद झाले आहेत. त्यामुळे, उझबेकिस्तानमधून एमबीबीएसची पदवी घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे.

उझबेकिस्तानमधील ९३ वर्षे जुन्या समरकंद वैद्यकीय विद्यापीठात अशा भारतीय विद्यार्थ्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. या सरकारी विद्यापीठात २०२१ पर्यंत दरवर्षी १०० ते १५० भारतीय विद्यार्थी येत होते. मात्र, युक्रेन-रशिया युद्धानंतर हीच संख्या २०२३ मध्ये तीन हजारांवर गेली आहे.

युक्रेनमधील वैद्यकीय अभ्यासक्रम युद्धामुळे अर्धवट सोडलेल्या एक हजार विद्यार्थ्यांना सामावून घेत त्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यातही समरकंद विद्यापीठाने हातभार लावला.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. जाफर अमिनोव्ह म्हणाले, की आमच्या विद्यापीठात येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये, याची आम्ही पुरेशी व्यवस्था करत आहोत. त्यासाठी यावर्षी आम्ही भारतातून ४० पेक्षा अधिक शिक्षकांची नियुक्ती केली आहे. विद्यापीठात इंग्रजीमध्येच अध्ययन व अध्यापन होते.

मात्र, उच्चारांमुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये, याची पुरेशी दक्षता आम्ही घेत आहोत. त्यामुळे, शिक्षक सांस्कृतिकदृष्ट्या विद्यार्थ्यांच्या अधिक नजीक जात असून भारतीय शिक्षकांमुळे भारतातील विद्यार्थ्यांना आम्ही अधिक प्रभावीपणे हाताळू शकतो, असेही त्यांनी सांगितले.

परदेशातून वैद्यकीय शाखेची पदवी घेऊ इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची युक्रेनला पसंती होती. मात्र, रशियाने व युक्रेनमध्ये दीर्घकाळापासून सुरू असलेल्या युद्धाने युक्रेनचे दरवाजे बंद झाल्याने विद्यार्थ्यांनी नवीन पर्याय शोधण्यास सुरुवात केली. त्यातूनच उझबेकिस्तानचा पर्याय पुढे आला.

भारतात एमबीबीएसचा अभ्यासक्रम साडेपाच वर्षांचा असला तरी उझबेकिस्तानमध्ये तो सहा वर्षांचा आहे. भारताप्रमाणेच इंग्रजीमध्ये होणारे अध्ययन, शांत वातावरण, परवडण्याजोगे शुल्क आणि प्रात्यक्षिकांचा समावेश असल्याने विद्यार्थी उझबेकिस्तानकडे आकर्षित होत आहेत.

विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेशी संबंधित असलेल्या एमडी हाऊस या सल्लागार कंपनीचे संचालक सुनील शर्मा म्हणाले, की समरकंद हे मध्य आशियातील छुपे रत्न आहे. पूर्वी ‘एमबीबीएस’ची पदवी घेण्यासाठी भारतीय विद्यार्थी वेगवेगळ्या देशांत जात होते. मात्र, युक्रेन युद्धानंतर उझबेकिस्तानचा पर्याय ठळकपणे विद्यार्थ्यांसमोर आला. उझबेकिस्तानमध्ये विद्यार्थ्यांसाठी काही चांगल्या गोष्टी असून विशेषत: भारतीय विद्यार्थिनींसाठी हा देश सुरक्षित आहे, असेही त्यांनी नमूद केले.

उझबेकिस्तानचे वातावरण शांत असून येथे भारत आणि पाकिस्तानातून येणाऱ्या शिक्षकांचे ज्ञानही चांगले आहे. भाषेच्या अडथळ्यासारखा कोणताही मुद्दा नाही. आम्हाला आरामदायी वाटेल अशा भाषेत शिक्षक आम्हाला शिकवितात.

- मोहम्मद अफताब, भारतीय विद्यार्थी

वैद्यकीय शिक्षणासाठी दरवर्षी परदेशांत जाणारे भारतीय - २५ हजार

उझबेकिस्तानातील समरकंद विद्यापीठातील विद्यार्थी - तीन हजार (२०२३)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.