नवी दिल्ली : भारत आणि चीनदरम्यानचा पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवरील संघर्ष आता संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. ज्या ठिकाणी दोन्ही देशांचे लष्कर आमनेसामने आले होते त्या ठिकाणांवरील गस्तीवरून उभय देशांत मागील काही दिवसांपासून सुरू असलेली चर्चा कराराच्या पातळीवर पोहोचली आहे. दोन्ही देशांनी आपापले सैन्य मागे घेण्यावर तसेच गस्त कायम ठेवण्याबाबत सहमती दर्शविल्याचे आज जाहीर करण्यात आले. आता दोन्ही देशांचे लष्कर माघार घेण्याची शक्यता निर्माण झाली असून, त्यामुळे भविष्यात गलवानसारखा संघर्ष टाळला जाऊ शकतो.