लंडन - समाज माध्यमांच्या जगतामध्ये एलॉन मस्क यांच्या ‘ट्विटर’ला धोबीपछाड देण्यासाठी मार्क झुकेरबर्ग यांच्या ‘मेटा’ने थ्रेड्स हे नवे अॅप लाँच केले आहे. मस्क यांच्या लहरीपणामुळे वैतागलेल्या यूजरना एक नवा प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न यामाध्यमातून करण्यात आला आहे. ‘मेटा’चे फोटो शेअरिंग अॅप इन्स्टाग्रामचे हे ‘थ्रेड्स’ हे टेक्स्ट बेस्ड व्हर्जन असेल. यूजरचे रिअल टाइम अपडेट्स आणि सार्वजनिक संवादासाठी एक नवी आणि वेगळी स्पेस याद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
हे अॅप बुधवारी मध्यरात्रीच ब्रिटनमध्ये अॅपल आणि गुगल अँड्रॉईड अॅप स्टोअरमध्ये उपलब्ध झाले असून अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि जपानसह शंभर देशांमधील नेटीझन्सना त्याचा वापर करता येईल. हे अॅप लाँच होताच जगभरातील सेलिब्रेटींच्या त्याच्यावर उड्या पडल्या. गॉर्डन रॅमसे, पॉपस्टार शकीरा आणि मार्क होयले आदींनी तातडीने ते वापरायला सुरूवात केली.
हा प्लॅटफॉर्म ट्विटरसारखाच असल्याचा दावा यूजरकडून करण्यात आला आहे. अनेकांनी त्यांचे स्क्रीन शॉट देखील समाजमाध्यमांवर व्हायरल केले आहेत. ट्विटरची मालकी एलॉन मस्क यांच्याकडे आल्यानंतर या प्लॅटफॉर्ममध्ये अनेक बदल करण्यात आले होते.
या बदलांवर जगभरातील नेटीझन्समधून उघडपणे नाराजी व्यक्त होत होती अनेकदा मस्क यांनाही ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. नेमक्या या असंतोषाचा फायदा घेत झुकेरबर्ग यांनी ‘थ्रेड्स’ लाँच केले आहे. ट्विटरला टक्कर देण्यासाठी ‘मेटा’ला इन्स्टाग्रामवरील यूजरचा फक्त एक चतुर्थांश एवढाच वाटा गरजेचा असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
झुकेरबर्ग आणि मस्क यांच्यातील वाद
‘मेटा’चे मार्क झुकेरबर्ग यांनी आज दोन स्पायडरमॅनचे सूचक ट्विट करताना ‘थ्रेड्स’ लाँच केले होते. तब्बल अकरा वर्षांनंतर ट्विटरवर अॅक्टिव्ह झालेल्या झुकेरबर्ग यांनी घोषणा केल्यानंतर मस्क यांनीही त्यांना तशाच सूचक पद्धतीने उत्तर दिले होते.
मजकूर संवादावर भर
या प्लॅटफॉर्मवर ‘लाईक’, ‘रिपोस्ट’ आणि ‘रिप्लाय’ आणि थ्रेडला कोट करण्यासाठी वेगवेगळी बटणे आहेत. पोस्टला कितीजणांनी लाईक केले तसेच त्याला कितीजणांचे प्रत्युत्तर आले हे देखील पाहता येईल. या नव्या अॅपमध्ये मजकूर आणि संवादावर अधिक भर देण्यात आला असून हेच त्याचे मूळ मॉडेल आहे. सध्या इन्स्टाग्रामचा वापर हा फोटो आणि व्हिडिओ शेअरिंगसाठी होत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.
पाचशे अक्षरांची मर्यादा
या प्लॅटफॉर्मवरील पोस्टसाठी पाचशे अक्षरांची (कॅरेक्टर) मर्यादा असून ही ट्विटरपेक्षा अधिकच आहे. या पोस्टसोबत लिंक्स, फोटो आणि पाच मिनिटांपर्यंतचे व्हिडिओ देखील शेअर करता येऊ शकतात. इन्स्टाच्या यूजर्सना विद्यमान यूजरनेमचा वापर करून लॉग ईन करता येईल. नव्या अॅपवर त्याच अकाउंटला फॉलो करता येईल. नव्या यूजरना मात्र या अॅपसाठी इन्स्टाग्राम अकाउंट सुरू करावे लागेल.
डेटा प्रायव्हसी पुन्हा चर्चेत
या नव्या अॅपमुळे डेटा प्रायव्हसीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे कारण ‘थ्रेड्स’च्या माध्यमातून वैयक्तिक माहिती मोठ्या प्रमाणावर गोळा करण्यात येईल. त्यात आरोग्यविषयक माहिती, वित्तीय लेखाजोखा, ब्राउजिंग आणि सर्च हिस्ट्री, लोकेशन डेटा, खरेदी व्यवहार आदींचा समावेश आहे. ही सगळी संकलित माहिती मूळ कंपनीकडे जाण्याचा धोका व्यक्त केला जात आहे.
थ्रेड्सचा दबदबा
लाँचिंगनंतरच्या फक्त सात तासांत - १ कोटी यूजर
पहिल्या चार तासांत - ५० लाख यूजर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.