विमानतळाबाहेर झालेल्या आत्मघाती स्फोटांतील मृतांची संख्या 170 झाली आहे.
Afghanistan Crisis : अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये ड्रोन हल्ला करत काबूल विमानतळावर स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांना काही तासांच्या आत धडा शिकवला आहे. काबूल विमानतळवर स्फोटाचं षडयंत्र रचणाऱ्याचा खात्मा केल्याचा दावा अमेरिकेनं केला आहे. तसेच भविष्यात काबूल विमानतळावर हल्ला होण्याची शक्यताही अमेरिकेनं व्यक्त केली आहे.
गुरुवारी काबूल विमानतळावर आयसिस-के या दहशतवादी संघटनेनं स्फोट घडवून आणला होता. यामध्ये अमेरिकेच्या 13 सैनिकांसह शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता तर हजारो जण जखमी झाले होते. अमेरिकेनं 24 तासांच्य आत या हल्ल्याचा बदला घेतला आहे. अफगाणिस्तानमधील नंगरहास प्रांतात लपून बसलेल्या आयसिस-के च्या दहशतवाद्यांचा ड्रोनच्या साह्याने खात्मा केला आहे. नंगरहास प्रांत पाकिस्तानच्या सिमेला लागून आहे. काबूलमध्ये आणखी एक स्फोट घडवून आणला जाण्याची शक्यता अमेरिकेच्या गुप्तचर संघटनेनं व्यक्त केली आहे.
मृतांची संख्या 170 वर
काबूलमधील हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर (ता. २६) झालेल्या आत्मघाती स्फोटांतील मृतांची संख्या 170 झाली आहे. एक हजारांहून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये अमेरिकेच्या १३ सैनिकांचा समावेश आहे. विमानतळाच्या ॲबे प्रवेशद्वाराजवळ गर्दीवर नियंत्रण मिळविण्याचा अमेरिकी सैनिक प्रयत्न करत असतानाच दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. विमानतळावर आणखी हल्ले होण्याची शक्यता अमेरिकेने व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, तालिबानने विमानतळावरील सुरक्षा वाढवावी, असे आवाहन अमेरिकेने केले आहे. यानंतर अनेक तालिबानी रॉकेट लाँचर, आधुनिक बंदुका घेऊन विमानतळाबाहेर गस्त घालत आहेत.
हल्ले दोन नव्हे, एकच?
काबूल विमानतळाबाहेर काल (ता. २६) दोन नव्हे, एकच हल्ला झाल्याचा दावा आज अमेरिकेचे लष्करी मुख्यालय असलेल्या ‘पेन्टॅगॉन’ने केला आहे. विमानतळाशेजारी असलेल्या बॅरन हॉटेलमध्ये कोणताही स्फोट झाला नसल्याचे ‘पेन्टॅगॉन’चे म्हणणे आहे. चुकीची माहिती कशी पसरली, हे निश्चित सांगता येणार नाही. मात्र, स्फोटानंतर प्रचंड गोंधळ उडाल्याने अशा अफवा पसरु शकतात, असे ‘पेन्टॅगॉन’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
हल्ल्याचा बदला घेऊ - बायडेन
अफगाणिस्तानातील काबूल विमानतळाबाहेर दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटांनंतर अमेरिकेने आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी हल्लेखोर दहशतवाद्यांना शोधून काढत त्यांना याची जबर किंमत मोजायला भाग पाडू असा इशारा दिला आहे. बायडेन म्हणाले, की ‘‘ हा हल्ला घडवून आणणारे आणि अमेरिकेला इजा पोचवू पाहणाऱ्यांना आम्ही कधीही माफ करणार नाही. हा हल्ला आम्ही कधीच विसरू शकत नाहीत. आम्ही त्यांना शोधून काढू आणि त्याची जबर किंमत मोजायला भाग पाडू. आम्ही आमचे हित आणि लोकांचे संरक्षण करू.’’ या दहशतवादी हल्ल्यांमागे ‘इसीस’चा हात असल्याचा दावाही बायडेन यांनी केला आहे. अशाप्रकारचे हल्ले होऊ शकतात याची भीती आम्हाला पूर्वीपासून वाटत होती. गुप्तचरसंस्थांनी तसा इशारा देखील दिला होता. विमानतळाबाहेर उभे असलेल्या अमेरिकी सुरक्षारक्षकांचा त्यांनी जीव घेतला असून अनेकजणांना गंभीररीत्या जखमी केले आहे. अनेक नागरिक यात मरण पावले असून काहीजण गंभीर जखमी झाले आहेत. ‘इसीस’ची संपत्ती, त्यांचे नेतृत्व आणि केंद्रांना लक्ष्य करण्याचा आराखडा लष्करी अधिकाऱ्यांनी तयार करावा, असे आदेशही बायडेन यांनी दिले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.