रशिया-युक्रेन युद्धाचा आज तेरावा दिवस असून काल झालेली चर्चेची तिसरी फेरीही निष्फळ ठरली आहे. या युद्धामुळे एकीकडे भीषण मंदी आणि महागाईचं सावट आहे. तर दुसरीकडे सर्वांधिक चिंता ही तेलाच्या किंमती अव्वाच्या सव्वा वाढण्याची आहे. एकीकडे अमेरिकेने युक्रेनवर रशियाने लादलेल्या या युद्धामध्ये रशियाच्या (Russian President Vladimir Putin) विरोधात भूमिका घेतली असून युक्रेनला आपलं सहाय्य जाहीर केलंय. रशियाला धडा शिकवण्याची घोषणा करत अमेरिकेने अनेक प्रकारचे निर्बंध लादणार असल्याचं याआधीच जाहीर केलंय. असं असलं तरी अमेरिका एका बाबतीत मात्र अजूनही कच खाताना दिसतोय. ती गोष्ट अर्थातच आहे तेल...! (Russia-Ukraine War)
या साऱ्या पार्श्वभूमीवर सध्यातरी अमेरिकेने म्हटलंय की, रशियाकडून तेल आयात करण्यावर बंदी घालण्याबाबत बायडन प्रशासनाने (United States) कोणताही निर्णय घेतला नाही. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी गेल्या महिन्यात "विशेष लष्करी कारवाई" अर्थात युद्ध जाहीर केल्यानंतर अमेरिका आणि इतर पाश्चात्य देशांनी रशियावर अनेक निर्बंध लादले आहेत. मात्र, यामुळे या साऱ्याचा ऊर्जा पुरवठ्यावर कसा परिणाम होईल या चिंतेमुळे रशियाकडून इंधन आयातीवर बंधने लादण्यापासून सध्या तरी सगळेच देश हात राखून आहेत.
व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी सांगितलं की, "रशियाकडून तेल आयात करण्यावर बंदी घालण्याबाबत राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाहीये. सध्या त्याबाबत अंतर्गत चर्चा सुरुच आहे शिवाय युरोप आणि जगभरातील आमच्या इतर मित्र देशांशीही चर्चा सुरु असल्याचं त्यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटलंय. त्यांनी पुढे सांगितलं की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे पुतिन यांच्या या मनमानी कारभाराबाबत धडा शिकवण्यासाठी विविध मुद्यांवर लक्ष केंद्रीत करत आहेत. मात्र, त्यासोबतच इतर किंमतींवर त्याचा विपरित परिणाम होणार नाही, याचीही काळजी घेत आहेत.
साकी यांनी म्हटलंय की, पुढील वर्षभरात अमेरिका पूर्वीपेक्षा जास्त तेल उत्पादन करणार आहे. अमेरिकेने माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या पहिल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी अधिक तेलाचे उत्पादन केलंय. ऊर्जा विभागाच्या म्हणण्यानुसार, पुढील वर्षी आम्ही पूर्वीपेक्षा अधिक तेलाचे उत्पादन करणार आहोत, असंही त्या म्हणाल्या. यापूर्वी व्हाईट हाऊसने रशियाकडून आयात होणाऱ्या इंधनावर बंदी घालण्याचं सुतोवाच केलं होतं. मात्र, रविवारी, यूएस स्टेट सेक्रेटरी अँटोनी ब्लिंकन यांनी म्हटलंय की, अमेरिका आपल्या इतर युरोपियन मित्रांसह "समन्वित मार्गाने" ही संभाव्य बंदी लादण्याचा विचार करत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.