12 मार्च 2021 रोजी दक्षिण आफ्रिकेतील क्वाझुलू नेताल प्रांताचे राजे गुडविल झ्वेलिथिनी यांचा जोहान्सबर्गमधील रुग्णालयात मृत्यू झाला. त्यावेऴी ते 72 वर्षांचे होते. तब्बल पन्नास वर्षे ते झुलूंचे राजे होते. 1993 मध्ये नेल्सन मंडेला 27 वर्षांच्या तुरूंगवासातून मुक्त झाले व दक्षिण आफ्रिकेत 1994 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकानंतर ते राष्ट्राध्यक्ष झाले. तब्बल साडे तीनशे वर्षांच्या वसाहतवादानंतर प्रथमच कृष्णवर्णियांचे सरकार आले. त्यावेळी राजकीय समन्वय साधणे आवश्यक होते. म्हणूनच पहिले सरकार आले, ते गव्हर्नमेन्ट ऑफ नॅशनल युनिटीचे. त्यात मंडेला यांच्या अध्यक्षतेखालील आफ्रिकन नॅशनल काँग्रेस, (एनसी) गौरवर्णियांची नॅशनल पार्टी (एनसी) व क्वाझुलू नेतालमधील राजे गुडविल झ्वेलिथिनी यांचा इंकाथा फ्रिडम पक्ष, (आयएफपी) या तीन पक्षांचे संमिश्र सरकार आले. झ्वेलिथिनी यांनी या संदर्भात मह्त्वाची भूमिका बजावली. मंडेला यांच्या व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष एफ.डब्लु.डी क्लर्क हे उपाध्यक्ष व क्वाझुलू नेतालचे पंतप्रधान मांगोसुथू बुथलेझी हे गृहमंत्री झाले.
20 व्या शतकातील या महत्वपूर्ण राजकीय स्थित्यंतराचे वार्तांकन करण्यासाठी मी सकाळ तर्फे दक्षिण आफ्रिकेलाला तेथे गेलो असता, केपटाऊनमधील संसद अधिवेशनालाही उपस्थित राहिलो होतो. सभागृहात सत्तारूढ पक्षाचे मंत्रिमंडळ उपस्थित असूनही ते एकत्र वा सत्तारूढ पक्षांच्या बाकांवर बसलेले नव्हते. निवडणुकात हे पक्ष एकमेकाविरूद्ध लढले. त्यांनी स्वतंत्रपणे जागा मिळविल्या. परंतु, दक्षिण आफ्रिकेत राजकीय स्थिरता यावी, यासाठी या तीन पक्षांनी सामंजस्य दाखविले. सत्तारूढ पक्षाच्या बाकांवर मंडेला यांच्यासह आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे मंत्री, संसद सदस्य, तर विरोधी पक्षांच्या बाकांवर डी क्लर्क व बुथलेझी बसले होते. सदस्यांनी विचारेल्या प्रश्नाना ते आपापल्या जागेवरून उत्तरे देत होते. संसद अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाला प्रेक्षकांच्या कक्षेत झ्वेलिथिनीही बसले होते, ते आपल्या परंपरागत वेशभूषेत.
भारतातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
दक्षिण आफ्रिकेतील प्रमुख टोळ्या अथवा जमातीत झुलू, खोसा, सोथो, त्स्वाना, एनेबेले, वेंडा, त्सोंगा व स्वाझी यांचा समावेश होतो. मंडेला हे खोसा जमातीचे, तर झ्वेलिथिनी व बुथलेढझी हे झुलू जमातीचे. दक्षिण आफ्रिकेच्या एकूण लोकसंख्येपैकी 21 टक्के झुलू, 17 टक्के खोसा व 15 टक्के सोथो आहेत. झुलू ही लढवैय्यी जमात. ते क्वाझुलू नेताल प्रांतात राहतात. डर्बन ही प्रांताची राजधानी. 161 वर्षांपूर्वी भारतीय मजुरांचं पहिलं जहाज डर्बनच्या बंदराला लागलं, तेव्हापासून भारतीयांनी डर्बन प्रांतात वसाहत केली. आज दक्षिण आफ्रिकेतील एकूण 14 लाख भारतीय वंशाच्या दक्षिण आफ्रिकी नागरिकांपैकी बव्हंशी सुमारे बारा ते तेरा लाख भारतीय क्वाझुलू नेताल प्रांतात राहतात. महात्मा गांधी यांनी आपला लढाही याच प्रांतातील पीटरमॅरित्झबर्ग या रेल्वेस्थानकावर झालेल्या त्यांच्या अपमानानंतर सुरू केला होता. ज्या गल्लीतून गांधीजींचा मोर्चा निघायचा, ती मक्युरी लेन डर्बनमध्ये असून, फिनिक्स येथील गांधीजीनी 1904 मध्ये स्थापन केलेला आश्रमही याच प्रांतात आहे. इतिहासात झुलूलँड हे वेगळे राज्य होते. तेव्हापासून त्याचे नेतृत्व निरनिराळ्या झुलू राजांकडे आले. त्यातील झ्वेलिथिनी हे त्यांचे वडील सिप्रियन बेकुझुलू यांच्या मृत्यूनंतर 1968 मध्ये राजे झाले. त्यांना स्वायत्त प्रदेश हवा होता. त्यासाठी त्यांनी प्रारंभी मंडेला व आफ्रिकन ऩॅशनल काँग्रेसला व नव्या राज्यघटनेला विरोधही केला. दक्षिण आफ्रिकेत निवडणुका होऊ नये, म्हणूनही विरोधही केला. परंतु, नव्या घटनेनुसार, राजाचे स्थान हे केवळ अलंकृत असून, झुलू पंतप्रधानाकडे बरेच अधिकार असतात. मंडेला यांनी पंतप्रधान बुथलेझी यांच्याबरोबर समन्वय साधून त्यांना आपल्या पहिल्या मंत्रिमंडळात घेतले. बुथलेझी हे झ्वेलिथिनी यांचे चुलत बंधू. झ्वेलिथिनी व मंडेला या दोघांबरोबर कोणत्या न कोणत्या कारणांमुळे बुथलेझी यांचे मतभेद झाले. नव्या सरकारमध्ये गृहमंत्रीपदावर ते तब्बल दहा वर्ष राहिले.
झ्वेलिथिनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांच्या स्मरणात राहातील, ते झुलू व भारतीयांमध्ये सौहार्द व सांस्कृतिक संबंध टिकविण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे. ते भारतीयांना माझीच एकनिष्ठ जनता, असे म्हणत असे. या संदर्भात आलेल्या वृत्तानुसार, झ्वेलिथिनी यांच्या निकटवर्तियात अनेक भारतीयांचा समावेश होता. लोकहितवादी व्यापारी इश्वर रामलुचमन यांना तर झ्वेलिथिनी यांनी झुलू राष्ट्रांचे राजपुत्र असा सन्मान बहाल केला. झुलूंच्या सामाजिक पुनरुत्थानासाठी त्यांनी अनेक वर्षे कार्य केले, त्याला मिळालेली ही राजमान्यता होती. झ्वेलिथिनी म्हणाले होते, की रामलुचमन यांना मी आपलेसे केले, तेव्हा त्यांना माभेका झुलू असे नाव दिले. माभेका यांचा अर्थ, जनतेची काळजी वाहणारा. झ्वेलिथिनी म्हणत ,की पुढील काही वर्षात माभेका आमच्या परिवाराचा सदस्यच बनला. त्याला मी इंडोदाना येथू, म्हणजे आमचा मुलगा, असे म्हणत असे. रामलुचमन यांनी केवळ सामाजिक सौहार्द निर्माण केले नाही, तर धर्म, सांस्कृतिक परंपरा व निसर्गाचे रक्षण करण्यासाठी अथक प्रयत्न केले. म्हणून आम्हाला त्यांचा आदर होता. वंशभेदाच्या राजकारणामुळे झुलू व भारतीय या दोघांनाही गौरवर्णिय सरकारचे अनेक अत्याचार प्रदीर्घ काळ सहन करावे लागले. दक्षिण आफ्रिकेच्या आर्थिक प्रगतीत भारतीयांचे मोठे योगदान आहे, असे झ्वेलिथिनी वारंवार सांगत. त्यांच्या सल्ल्यानुसार रामलुचमन यांनी आपल्या नॉनगोमा गावात वार्षिक दिवाळी उत्सव सुरू केला. त्यात आता दरवर्षी भारतीय व झुलू कलाकार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतात.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
एड्स, कोरोनाविरुद्ध लढा
2019 मध्ये एका समारंभात झ्वेलिथिनी यांनी दक्षिण आफ्रिका व भारत दरम्यान असलेल्या खास व घनिष्ट संबंधांची प्रशंसा केली व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरील मैत्रीचा उल्लेख केला. ते म्हणाले, दक्षिण आफ्रिकेतील लोकांचे व्यवसाय कौशल्य कसे वाढवायचे, या संदर्भात मोदी व माझ्यात वारंवार बोलणी झाली आहेत. 2017 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील भारतीय दूतावास व कौन्सुलेट्सच्या अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाबरोबर बोलताना झ्वेलिथिनी यांनी जनतेच्या भल्यासाठी क्वाझुलू नेतालला अधिक सुजलाम सुफलाम बनविण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. इंडिया हाऊसला दिलेल्या पहिल्या भेटीत त्यांनी दक्षिण आफ्रेकेतील भारतीय उच्चायुक्त रुचि घनश्याम, उप-उच्चायुक्त एस.जानकीरामन, डर्बनमधील भारतीय कौन्सुलेट जनरल डॉ शशांक विक्रम, जौहन्सबर्गमधील कौन्सुलेट जनरल डॉ डी.के.श्रीवास्तव व एसकेएस रावत यांच्या भेटी घेऊन चर्चा केली. त्यांनी इंडिया हाऊसच्या परिसरात आंब्याचे रोप लावले. झ्वेलिथिनी यांची राजवट दुतर्फा सांस्कृतिक संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने जाणली जाईल. एड्स व करोनाविरूद्ध लढा देण्यातही झ्वेलिथिनी यांनी प्रयत्न केले. त्यामुळे त्यांच्या निधनाची हळहळ क्वाझुलू नेतालमधील भारतीयांतून व्यक्त केली जात असून, एक हितकारी राजा निधन पावला, याबाबत दुःख व्यक्त करण्यात येत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.