वॉशिंग्टन- अमेरिकेच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी २०२४ च्या अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांनी माघार घेतानाच अध्यक्षपदासाठीचा उमेदवार म्हणून उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे आता अमेरिकेच्या राजकारणाचे चित्र बदलण्याची शक्यता आहे.
जो बायडेन यांनी पहिल्या डिबेटमधील खराब कामगिरीनंतर अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याचं बोललं जातं. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प हे डिबेटमध्ये वरचढ ठरले होते. शिवाय, रिपब्लिकन पक्षाकडून जो बायडेन यांना अध्यक्षपदासाठी अकार्यक्षम असल्याचं म्हटलं जात होतं. रिपब्लिकन पक्षाच्या या टीकेला चांगलीच हवा मिळाली होती.
डेमोक्रेटिक पक्षामध्ये देखील बायडेन यांच्या विरोधात काहीसा विरोधात सूर उमटत होता. माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह इतर डेमोक्रेटिकच्या महत्त्वाच्या नेत्यांनी बायडेन यांनी माघार घ्यावी असेच संकेत दिले होते. अमेरिकेच्या राजकीय वर्तुळात बायडेन माघार घेतील अशीच चर्चा सुरु झाली होती. आज त्यावर शिक्कामोर्तब झाले असं म्हणावं लागेल.
डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन यांच्यामध्ये २७ जून रोजी पहिली अध्यक्षीय डिबेट झाली होती. यात बायडेन निस्तेज दिसून आले होते. ते बोलताना अडखळत होते आणि ट्रम्प यांच्या आरोपांना त्यांना उत्तर देता आले नव्हते. त्यानंतर त्यांनी माघार घ्यावी अशी मागणी डेमोक्रेट्समधूनच होऊ लागली होती. आठ पैकी एक डेमोक्रेट्स सार्वजनिकरीत्या जो बायडेन यांनी माघार घ्यावी असं बोलत होता.
विरोधकांनी देखील जो बायडेन विरोधात कॅम्पेन सुरु केले होते. त्याचा त्यांना चांगला फायदा झाला असं बोललं जातं. जो बायडेन हे अध्यक्षपदासाठी असमर्थ आहेत, असा प्रचार रिपब्लिकन पक्षाकडून सुरू करण्यात आला होता. सोशल मीडियावर देखील बायडेन यांचे खिल्ली उडवणारे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले होते. एकप्रकाराने जनमत तयार करण्यासाठी याचा वापर करण्यात आला.
जो बायडेन यांची स्मरणशक्ती कमी झाली होती. ते अनेक गोष्टी विसरू लागले होते. याची दखल घेऊन डेमोक्रेट्स यांनी बायडेन यांना माघार घेण्यास सूचवले होते.अशाच पद्धतीने सुरू राहिलं तर अध्यक्षपदाची निवडणूक तर हरणारच पण, काँग्रेसच्या पुढील वर्षीच्या निवडणुकीत देखील पक्षाची मोठी हाणी होऊ शकते असं डेमोक्रेट्सना वाटत होतं. त्यामुळेच बायडेन यांच्यावर माघार घेण्यासाठी दबाव वाढत होता.
रॉयर्टच्या सूत्रांच्या माहितीनुसार, जो बायडेन शेवटपर्यंत माघार घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. पण, शेवटच्या क्षणाला त्यांचे हृदय परिवर्तन झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या सल्लागारांसोबत चर्चा केली. आपण माघार घेत असल्याची माहिती त्यांनी पहिल्यांदा कमला हॅरिस यांना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.
जो बायडेन यांनी माघार घेतल्यामुळे आणि आता अध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून कमला हॅरिस यांना पुढे केले असल्याने नेमका काय परिणाम होईल असा प्रश्न विचारला जात आहे. तसे पाहता डोनाल्ड ट्रम्प हे सध्या मजबूत स्थितीत आहेत. जो बायडेन यांनी त्यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण केले नव्हते. पण, आता कमला हॅरिस त्यांच्यासमोर असल्याने त्या आव्हान निर्माण करतील असंही म्हणता येत नाही.
कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या अमेरिकी नागरिक आहेत. अमेरिकेत स्थलांतराचा मुद्दा नेहमीच पेटता राहिला आहे. त्यामुळे रिपब्लकिन हा मुद्दा लावून धरू शकतात. कमला हॅरिस यांच्यावर जोरदार हल्लाबोल ट्रम्प यांच्याकडून केला जाऊ शकतो.
अमेरिकीत काही मिडिया रिपोर्टनुसार, अध्यक्षपदासाठीच्या उमेदवार म्हणून कमला हॅरिस या डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा पिछाडीवर आहेत. त्यामुळे डेमोक्रेटने उमेदवार बदलला असला तरी यामुळे फार काही फरक पडण्याची शक्यता कमी आहे. मात्र, अध्यक्षीय निवडणुकीसाठी आणखी काही महिने शिल्लक आहेत. या काळात काही घडामोडी घडतात का अन् चित्र बदलतं का हे पाहावं लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.