काबुल : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबानची (Taliban) सत्ता आल्यापासून सर्वसामान्यांना जगणं अत्यंत कठीण झालं आहे. तालिबानचा कहर अफगाणी नागरिकांवर सुरूच आहे. अफगाणिस्तानातील महिला आणि मुलांना जाणून बुजून त्रास दिला जात असल्याचं दुर्दैवी चित्र सध्या पाहायला मिळत आहे. सध्या तिथली भीषण परिस्थिती पाहता अफगाणिस्तानात महिलांची स्थिती ही अत्यंत वाईट आणि दुर्दैवी झाली आहे. अशातच परिस्थितीने हताश मातेची एक मन सुन्न करणारी बातमी समोर येतेय. यावर सोशल मिडियावर देखील हळहळ व्यक्त होत आहे.
एकीकडे पोटचा दीड वर्षाचा गोळा..दुसरीकडे हतबलता...
तालिबानची सत्ता आल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये अन्नधान्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. आपल्या मुलांवर उपचार करण्यासाठी नागरिकांकडे पैसे नाहीत आणि मुलांना सुरक्षित निवारा देण्यासाठी घरंदेखील नाहीत. अनेक नागरिक सध्या विस्थापितांच्या छावण्यांमध्ये राहत असून प्रचंड हालअपेष्टा सहन करत आहेत. अशातच एका मातेची शोकांतिका आपल्या 13 वर्षांच्या मुलीवर उपचार करण्यासाठी एका मातेने चक्क आपल्या दीड वर्षांच्या पोटच्या गोळ्याला काळजावर दगड ठेवत विकून टाकलं. मुलीचा जीव वाचवण्यासाठी दुसरा कुठलाच उपाय किंबहुना पर्याय तिच्याकडे नव्हता. आपल्या मुलीवर इलाज करण्यासाठी पैसे हवेत, म्हणून एका अफगाणि महिलेवर स्वतःच्या मुलाला विकण्याची वेळ आली. टोलो न्यूजनं दिलेल्या बातमीनुसार या महिलेनं मुलीवर इलाज करण्यासाठी आपल्या पोटच्या मुलाला केवळ 355 डॉलरला म्हणजेच साधारण 25 हजार रुपयांना विकलं. लैलुमा असं या महिलेचं नाव असून काबुलच्या तंबूमध्ये ती राहते. मुलीचा जीव वाचवण्यासाठी यापेक्षा दुसरा कुठलाही उपाय तिच्याकडे नव्हता असं तिने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
तालिबानींचा क्रूर चेहरा...मातेवर झाडल्या गोळ्या, कुशीत होतं 6 महिन्यांचं बाळ
काही दिवसांपूर्वी तालिबानींनी एका महिलेवर गोळ्या झाडल्या असून तिच्या कुशीत तेव्हा 6 महिन्यांचं बाळ असल्याची माहिती मिळाली होती. अफगाणिस्तानातील 30 वर्षांची फरवा तालिबानच्या जुलमी राजवटीला विरोध कऱण्यासाठी रस्त्यावर उतरली होती. तालिबानविरोधी आंदोलनात सहभागी होत होती. आंदोलनामुळे तिच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. मात्र तरीदेखील ती तालिबानींना विरोध करत होती. त्यामुळेच तालिबानींनी तिचे निर्घृणपणे हत्या केली. रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्यांची तालिबान हत्या करत आहे. अत्यंत क्रूर पद्धतीने त्यांचा जीव घेत आहे
कोवळ्या जीवांचे प्रचंड हाल
अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यानंतर अनेक नागरिक छावण्यांमध्ये राहत आहेत. जीव वाचवण्यासाठी नागरिक धावपळ करत आहेत. लोकांना दोन वेळचं अन्न मिळत नाही. अन्नासाठी त्यांना हात पसरावे लागत आहेत. या सगळ्यात कोवळ्या लहान मुलांचे मात्र प्रचंड हाल होत असून त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होत आहेत. नागरिकांना कडाक्याच्या थंडीत कुठे आणि कसं राहायचं, हा प्रश्न सतावतो आहे. त्यांच्याकडे पक्की घरं नाहीत आणि ती बांधण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे सरकार जोपर्यंत या नागरिकांच्या निवाऱ्याची सोय करत नाही, तोपर्यंत त्यांना हलाखीत दिवस काढावे लागत आहेत. .
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.