काबूल : अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर आता तालिबानकडून सरकार स्थापन्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान, तालिबाननं काबूलच्या राष्ट्रपती भवनातून पहिली अधिकृत पत्रकार परिषद घेतली. यामध्ये आमच्या राज्यात महिलांना गरज असलेल्या क्षेत्रात काम करण्यास परवानगी असेल तसेच इस्लामिक कायद्यांनुसार त्यांच्या हक्कांचा सन्मान केला जाईल, अशी घोषणा तालिबानचा प्रवक्ता झबिहुल्लाह मुजाहिद यानं केली.
तालिबाननं म्हटलं की, इतर देशांसोबत शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करण्याची आमची इच्छा आहे. आम्हाला देशांतर्गत आणि देशाबाहेर कोणीही शत्रू नको आहे. आमच्या राज्यात समाजातील महिला इस्लामच्या चौकटीत खूपच अॅक्टिव्ह होतील. झबिहुल्लाह मुजाहिदनं पुढे म्हटलं की, मी आमच्या शेजारील राष्ट्रांना ही ग्वाही देतो की त्यांच्याविरोधात आमच्या जमीनीचा गैरवापर केला जाऊ दिला नाही. आंतरराष्ट्रीय समाजातही आमची ओळख निर्माण होईल. यावेळी त्यानं अश्रफ घनी यांच्या सरकारला 'नालायक' असं संबोधलं.
काबूलमधील विविध देशांचे दुतावास आणि संस्थांना संरक्षण दिलं जाईल याची आम्ही खात्री देतो. आमचा प्लॅन होता की, इतर भाग जिंकल्यानंतर काबूलच्या दारावरच थांबायचं. पण दुर्देवानं मागचं सरकार नालायक निघालं, त्यांनी संरक्षण पुरवलं नाही. आता आम्ही सर्व परदेशी संस्थांना सुरक्षा पुरवू. आम्हाला अफगाणिस्तानात आणि बाहेर कोणीही शत्रू नको आहे, असंही तालिबाननं यावेळी स्पष्ट केलं.
दरम्यान, १९९०चा तालिबान आणि सध्याचा तालिबान कसा आहे? या प्रश्नावर मुजाहिदनं म्हटलं, "आमची विचारसरणी आणि विश्वास त्यावेळेसारखाच आहे कारण आम्ही मुस्लिम आहोत. पण आमच्या अनुभवामध्ये आणि दृष्टीकोनातही बदल झाला आहे."
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.