अमेरिका ते भारत, डेल्टाचं थैमान ते ऑलिम्पिकचं मैदान; जगातील मोठ्या घटना

Year End 2021
Year End 2021Sakal
Updated on
Summary

LookBack 2021 : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी ज्यो बायडेन विराजमान झाल्यापासून ते भारतात सीडीएस बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेपर्यंत जगातील २०२१ मध्ये घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने (Corona) जगाला वेठीस धरलं आहे. २०२० मध्ये कोरोना नेमका काय, त्याचे गांभीर्य, भीती, मृत्यू, लॉकडाऊन यातच वर्ष सरलं होतं. त्यानंतर हळू हळू सावरत असताना २०२१ मध्ये पुन्हा मधल्या काही काळात जगाला कोरोनाचा विळखा पडला. डेल्टा या नव्या व्हेरिअंटने धुमाकूळ घातल्यानंतर मोठ्या प्रमाणावर जगभरात मृत्यू झाले. २०२० च्या तुलनेत कोरोनाशी लढण्यासाठी अनेक राष्ट्रांनी तयारी केली असतानाही वैद्यकीय साधन सामुग्री अपुरी पडताना दिसली. दरम्यान कोरोनाशिवाय जगभरात अशा अनेक घटना घडल्या ज्याची नोंद जगाने घेतली आणि ती तेवढी महत्त्वाचीसुद्धा आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी ट्रम्प यांच्यानंतर ज्यो बायडेन विराजमान झाले. याशिवाय इस्रायल (Israel), जर्मनी (Germany), जपानमध्येही (Japan) अध्यक्ष-पंतप्रधान पायउतार झाले. सुएज कालव्यात (Suez Canal) अडकलेल्या जहाजामुळे हजारो कोटींचं नुकसान झालं. अफगाणिस्तानवर (Afghanistan) तालिबानने (Taliban) ताबा मिळवल्यानंतर उद्भवलेला गोंधळ आणि जगभरातून झालेली टीका याचीही चर्चा झाली. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडत क्रीडा (Sports) क्षेत्रानेही मरगळ झटकली. यात गेल्या वर्षी स्थगित झालेली टोक्यो ऑलिम्पिक (Tokyo Olympic) स्पर्धा पार पडली. जी २० (G20 Summit), ग्लास्गो परिषदा (CoP 26) घेण्यात आल्या. ग्लास्गो परिषदेत जगाला भेडसावणाऱ्या हवामान बदलाच्या (Climate Change) समस्येवर चर्चा करण्यासाठी जगातील जवळपास सर्व देश सहभागी झाले होते.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी ज्यो बायडेन

अमेरिकेचे (America) ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून ज्यो बायडेन (Joe Biden) यांनी २० जानेवारी रोजी शपथ घेतली. यावेळच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. कोरोनाचे संकट, ते हाताळत असताना ट्रम्प यांनी सातत्यानं केलेली वादग्रस्त विधाने, कॅपिटल हिलवर झालेला हल्ला इत्यादी घटनांनी निवडणुकीला वेगळं वळण लागलं. उपाध्यक्षपदी कमला हॅरीस (Kamala Haris) यांची वर्णी लागली. तर मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी शपथविधीला उपस्थिती लावली नाही. बायडेन हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वयस्क अध्यक्ष ठरले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन

23–29 मार्च - सुएज कालव्यात अडकले एव्हर गिवन जहाज

जलवाहतुकीमध्ये सर्वात महत्त्वाचा मार्ग असलेल्या सुएज (Suez Canal) कालव्यात मार्च महिन्यामध्ये २३ ते २९ मार्च दरम्यान आठवडाभर एव्हर गिवन (Ever Given) जहाज अडकलं होतं. यामुळे जगभरात कोट्यवधींचा फटका बसला होता. जहाज अडकल्यानंतर नादुरुस्त झालं होतं. ते नऊ महिन्यानंतर पुन्हा वाहतुकीला सज्ज झालं. ४०० मीटर लांबीचं हे जहाज अडकल्यानं दर दिवशी किमान साडेसात हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. जहाज अडकल्यानं सुएज कालव्यातील वाहतूक पुर्णपणे ठप्प होती. सुएज कालव्यात जहाज नेमकं कसं अडकलं? व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा

सुएज कालव्यात अडकले एवर गिवन जहाज
सुएज कालव्यात अडकले एवर गिवन जहाज

३१ मे - नव्या व्हेरिअंटचे डेल्टा असे नामकरण; दुसऱ्या लाटेला कारणीभूत

जगभरात कोरोनाच्या डेल्टा व्हेरिअंटने (Delta) धुमाकूळ घातला. अमेरिकेसह भारतात यामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले. जागतिक आरोग्य संघटनेनं या व्हेरिअंटला ३१ मे रोजी डेल्टा असं नाव दिलं. अमेरिकेत जुलैमध्ये ८३ टक्के रुग्ण हे डेल्टाचे होते. तर भारतात मार्चमध्ये सुरु झालेली दुसरी लाट ही यामुळेच होती. दुसऱ्या लाटेत दोन लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. भारतात दुसरी लाट ओसरेपर्यंत जितके मृत्यू झाले त्याच्या अर्धे मृत्यू एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यात झाले. भारतात २५ डिसेंबरपर्यंत ४ लाख ७९ हजारहून अधिक लोकांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.

जगभरात कोरोनाचे थैमान
जगभरात कोरोनाचे थैमान

१३ जून - इस्रायलच्या पंतप्रधान पदी नफ्ताली बेनेट

इस्रायलमध्ये (Isriel) १२ वर्षे सत्तेत राहिलेल्या बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांना पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यात अपय़श आले. त्यांच्या जागी नफ्लाती बेनेट (Naftali Benet) हे पंतप्रधान झाले. १३ जून रोजी नफ्ताली यांच्या पंतप्रधानपदावर शिक्कामोर्तब झाले. इस्रायलची संसद नेसेटमध्ये १२० सदस्यांपैकी ६० जणांनी नफ्तालींच्या बाजुने मतदान केलं आणि ५९ जणांनी विरोधात मतदान केलं. तर एक जण अनुपस्थित राहिल्यानं नफ्ताली हे इस्रायलचे पंतप्रधान बनले. नफ्ताली यांच्या नव्या सरकारमध्ये २७ पैकी ९ महिला आहेत. अनेक पक्षांनी एकत्रित येऊन हे सरकार बनलं आहे. नफ्ताली बेनेट हे कमांडो होते. ते नेतन्याहूंचे चीफ ऑफ स्टाफसुद्धा होते.

नफ्ताली बेनेट इस्रायलच्या पंतप्रधानपदी
नफ्ताली बेनेट इस्रायलच्या पंतप्रधानपदी

१९ जुलै - जेफ बेजोस यांची अंतराळ सफर

अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस (Jeff Bezos) यांच्यासह चौघांनी जुलै महिन्यात ब्लू शेफर्डमधून अंतराळ सफर केली. यामध्ये जेफ आणि मार्क बेझोस या बंधूसह आणखी दोघे होते. यात वॉली फंक ही ८२ वर्षांची महिला अंतराळवीर आणि नेदरलँडचा १८ वर्षीय ऑलिव्हर डेमेन. या मोहिमेत सर्वात वयस्कर आणि सर्वात तरुण अंतराळवीर सहभागी होते. विशेष म्हणजे वॉली फंक या `नासा’च्या पहिल्या १३ स्त्री अंतराळ प्रवास प्रशिक्षणार्थीपैकी एक आहेत. तब्बल ६० वर्षानंतर वॉली फंक यांचं अंतरिक्षात झेपावण्याचं स्वप्न साकार झाले. ब्लू ओरिजिन कंपनीने तिकिटाचा लिलाव बारा जूनला सुरु केला होता. यात ज्याने तिकिट जिंकलं होतं त्याने आयत्यावेळी यायला नकार दिल्यानं ऑलिव्हरची वर्णी लागली. ब्लू ओरिजिनाने तिकिटविक्रीतून आलेल्या २८ दशलक्ष डॉलर्सपैकी १९ दशक्षलक्ष डॉलर्स अंतराळ संबंधित सेवाभावी संस्थांना देण्याचे जाहीर केले आहे. ब्लू शेफर्ड अंतरिक्षात झेपावून ११ मिनिटात परतही आले. त्यातून प्रवास केलेल्या चौघांना अविस्मरणीय अनुभवाची सफर घडली.

जेफ बेजोस यांची अंतराळ सफर
जेफ बेजोस यांची अंतराळ सफर

२३ जुलै ते ८ ऑगस्ट - टोकियो ऑलिम्पिक

कोरोनामुळे टोक्यो ऑलिम्पिक (Tokyo Olympic) २०२० ऐवजी २०२१ मध्ये आयोजित करण्यात आलं. २३ जुलै ते ८ ऑगस्ट पर्यंत ऑलिम्पिकचा सोहळा रंगला होता. आतापर्यंतच्या ऑलिम्पिकमध्ये यावेळी भारताची (India) कामगिरी सर्वोत्तम अशी होती. भारताने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ७ पदके जिंकली. भारताच्या नीरज चोप्राने (Neeraj Chopra) भालाफेकीत सुवर्णपदकाची कमाई केली. मीराबाई चानू (Meerabai Chanu) आणि रवी कुमार दहिया (ravi Kumar Dahia) या दोघांना रौप्यपदक मिळाले. तर पी व्ही सिंधू (PV Sindhu), लोवलिना बोर्गोहेन (Lovlina) आणि बजरंग पुनिया (Bajirang punia) यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. भारतीय पुरूष हॉकी संघानेही कांस्यपदक कमावले.

भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा
भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा

तालिबानचा अफगाणिस्तानवर ताबा

अमेरिकेनं (America) त्यांचं सैन्य माघारी बोलावल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) काबुलवर (Kabul) तालिबानने (Taliban) ताबा मिळवला. १५ ऑगस्ट २०२१ रोजी तालिबानने काबुल जिंकलं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी काबुलच्या विमानतळावर मोठा गोंधळ झाला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावरून तालिबानवर यानंतर टीकाही झाली. तेव्हा तालिबानने जाहीर माफी मागितली. सरकारमध्ये महिलांना सहभागी करून घेऊ असं तालिबानने म्हटलं तरी प्रत्यक्षात मात्र त्यांनी अनेक निर्बंध लादले आहेत. विद्यापीठ, महाविद्यालयात मुली आणि मुलांना एकत्र शिक्षण घेण्यावर बंधने घालण्यात आली आहेत. तुरुंगातील कैद्यांची तालिबान्यांनी सुटका केल्यानंतर आणि हत्यारे लुटीनंतर भयभीत झालेल्या नागरिकांनी स्वत:ला घरात बंदिस्त करून घेतले होते.

तालिबानची पहिली पत्रकार परिषद
तालिबानची पहिली पत्रकार परिषदesakal

१ ते १२ नोव्हेंबर : हवामान बदलावर ग्लास्गो परिषद

जगासमोर असलेला सर्वात मोठा प्रश्न तो म्हणजे हवामान बदलाचा. यावरच चर्चेसाठी ग्लास्गो परिषदेचे (CoP26) आयोजन एक ते १२ नोव्हेंबर या कालावधीत झाले. जगातील जवळपास सर्व देशांनी सहभाग घेतलेल्या या परिषदेत कोळशाचा अनियंत्रित वापर थांबवण्याऐवजी हळू हळू कमी करण्यावर एकमत नोंदवलं. तसंच मोठ्या प्रमाणावर प्रदुषण कऱणाऱ्या राष्ट्रांना उत्सर्जन कमी करण्यासंबंधी सुधारीत उद्दिष्टे मांडण्यासाठी २०२२ पर्यंत वेळ दिला आहे. प्रगत राष्ट्रांनी हवामान बदलाशी गरीब राष्ट्रांना जुळवून घेण्यासाठी आवश्यक असलेले पैसे दुप्पट वाढवून देण्याची विनंतीही परिषदेत करण्यात आली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या परिषदेत पंचसूत्री मांडली. यात कार्बन उत्सर्जन नेट झिरो, कार्बन उत्सर्जनात १०० कोटी टन कपात, ५० टक्के उर्जा अक्षय, पर्यावरणपूरक मार्गाने मिळवणे, कार्बन घनता कमी करणे, सौर उर्जा, पवन उर्जेच्या माध्यमातून उर्जेची निर्मितीचा समावेश आहे.

ग्लास्गो परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी
ग्लास्गो परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी

वर्षाअखेरीस डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात भारतात मोठी दुर्घटना घडली. भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत (CDS Genral Bipin Rawat) यांच्यासह १३ जण असणारं हेलिकॉप्टर 8 डिसेंबरला तामिळनाडुत कोसळलं. यामध्ये हेलिकॉप्टरमधील सर्वांचा मृत्यू झाला. बिपिन रावत यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि लष्करातील उच्च अधिकारीही होते. भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या दुर्घटनांपैकी एक अशी ही घटना आहे. या अपघाताची चौकशी सध्या सुरु आहे. नेमकं कोणत्या कारणामुळे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं याचा शोध घेतला जात आहे.

याशिवाय जगभरात अनेक मोठ्या घटना घडल्या असून यात चांगल्या आणि वाईट घडामोडींचाही समावेश आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या नव्या संचालक पदी नायजेरीयाच्या अर्थमंत्री नागोझी ओकोन्जो इविला यांची निवड झाली. चीनने त्यांची १४ वा पंचवार्षिक योजना जाहीर केली. मेड इन चायना २०२५ अशी त्यांची पंचवार्षिक योजना आहे. शिवाय चीनच्या कम्युनिस्ट पक्षाला १०० वर्षे पूर्ण झाली. जर्मनीच्या अँजेला मर्केल यांनी १६ वर्षे चान्सलरपद सांभाळलं. त्यांच्यानंतर चान्सलर कोण होणार हे आता नव्या वर्षात समजणार आहे. सीडीयु पक्षाचा नवा नेता चान्सलर असणार आहे. अमेरिकेनं इटलीमध्ये जी २० परिषदेचं आयोजन केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.