लतिकाच्या (२७ वर्षे) आईला (५५ वर्षे) स्तनाचा कर्करोग (कॅन्सर) झाला होता. सात दिवसांपूर्वीच ऑपरेशन झाले होते. त्यांना स्तनामध्ये गेल्या चार महिन्यांपासून गाठ होती. पण त्यांना काहीच त्रास नव्हता म्हणून त्यांनी दुर्लक्ष केले होते. कॅन्सर स्टेज दोन वर गेला होता. लतिका व तिची लहान बहिण भेटायला आल्या होत्या. मनात खुप प्रश्न होते. स्तनाच्या कॅन्सरविषयी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
भारतात स्तनाचा कॅन्सर सगळ्यात जास्त प्रमाणात आढळतो. स्त्रियांमधील सर्व कॅन्सरमध्ये स्तनाच्या कॅन्सरचे प्रमाण २५ ते ३२ टक्के आहे. भारतात दर चार मिनिटाला एका स्त्रीला स्तनाच्या कॅन्सर होत आहे व दर २८ स्त्रियांमागे एका स्त्रीला कॅन्सर होतो. पाश्चिमात्य देशांमध्ये कॅन्सर झाल्यावर पाच वर्षांनंतर जिवंत राहण्याचे प्रमाण ८९ टक्के आहे. आणि भारतात ६० टक्के आहे. ही तफावत येण्याचे कारण म्हणजे अज्ञान, आरोग्याविषयी अनास्था आणि उशीरा निदान होणे. यासाठी जनजागृती आवश्यक आहे. यासाठीच दरवर्षी पूर्ण ऑक्टोबर महिना ब्रेस्ट कॅन्सर जनजागृती महिना म्हणून घोषित केला आहे.
सर्वसाधारणपणे ५५ ते ६४ या वयोगटात स्तनाचा कॅन्सर जास्त प्रमाणात होतो. पण तरूण स्त्रियांमध्ये हा जास्त आक्रमक स्वरूपात होऊ शकतो.
आजकाल बरेच रूग्ण विचारतात, 'डॉक्टर, कॅन्सरचं कारण काय? आम्ही कशा प्रकारची काळजी घेतली पाहिजे?
खरं तर कुठल्याही कॅन्सरचं असं ठोस कारण नसतं. ही शरीरातल्या पेशींची अचानक काही कारणांशिवाय होणारी अनिर्बंध वाढ असते.
Risk factors (जोखमीचे घटक)
१. वय : जसे वय वाढते तसे स्तनाच्या कॅन्सरचे प्रमाण जास्त दिसून येते.
२. फॅमिली हिस्टरी : ज्या घरांमध्ये जवळच्या नातेवाईकांना (आई, बहिण, मुलगी, मावशी) स्तनाचा कर्करोग आहे.
३. पर्सनल हिस्टरी
अ. मासिक पाळी जर खूप लवकर चालू झाली असेल म्हणजे वयाच्या १२ व्या वर्षाआधी किंवा ऋतुनिवृत्ती जर खूप उशीरा झाली असेल,
ब. निपुत्रिक स्त्रिया किंवा ज्या स्त्रियांना उशीरा मूल होते (वयाच्या ३० व्या वर्षानंतर) किंवा ज्या स्त्रिया काही कारणास्तव त्यांच्या मुलांना स्तनपान करू शकल्या नाहीत.
क. ज्यांना पूर्वी कधी दुसऱ्या स्तनामध्ये कॅन्सर असेल किंवा स्तनाचे काही विकार असतील अशा स्त्रियांमध्ये कर्करोगाची शक्यता जास्त असते.
४. आहार :
अ. जेवणामध्ये स्निग्धपदार्थांचे किंवा मांसाहारी पदार्थांचे प्रमाण जास्त असणे.
ब. लट्ठपणा जास्त असणे किंवा ऋतुनिवृत्तीनंतर लट्ठपणा येणे.
५. मद्यपान, धुम्रपान व ताणतणाव हे पण जोखमीचे घटक आहेत.
६. अनुवांशिक घटक : गेल्या वीस वर्षांपासून BRCA 1 व 2 अशी चाचणी स्तनाच्या कॅन्सरची अनुवांशिक जोखिम असलेल्या स्त्रियांमध्ये करतात. त्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता समजू शकते. पण यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
५. चिन्हे व लक्षणे :
१. स्तन किंवा काखेमध्ये गाठ येणे किंवा घट्ट लागणे.
२. स्तनाभोवती त्वचेचा रंग बदलणे किंवा त्वचा बदलणे (खळगे, फुगीरपणा)
३. स्तनाग्रामध्ये नव्याने झालेला बदल उदा. आत जाणे, किंवा लहान होणे.
४. स्तनाग्रांमधून लालसर स्त्राव जाणे.
जेव्हा वरील प्रकारची चिन्हे किंवा लक्षणे दिसतात, तेव्हा या निदानाच्या पुष्टीकरणासाठी आम्ही काही चाचण्या करतो.
१. निडल बायोप्सी – याचे दोन प्रकार आहेत.
a. Fine Needle Aspiration Cytology- निडलने द्रव्य काढून तपासतात.
b. True cut biopsy – यामध्ये गाठ असलेली जागा तेवढीच बधीर करून विशिष्ट निडलने छोटासा तुकडा काढतात. ही तपासणी जास्त महत्त्वाची आहे. यामध्ये जिथे गाठ आहे किंवा वरीलपैकी बदल दिसतात, तिथे निडलच्या मदतीने पेशी बाहेर काढून तपासल्या जातात व निदान निश्चित करता येते.
२. सर्जिकल बायोप्सी : (पेशींची तपासणी) यामध्ये गाठीच्या भागाचा तुकडा काढून त्याची तपासणी केली जाते व ती गाठ कॅन्सरग्रस्त आहे की नाही, याचे निदान करता येते.
३. मॅमोग्राफी
४. सर्जिकल एक्सीजन : यामध्ये गाठ पूर्णपणे काढून त्याची तपासणी करतात व रोगनिदान निश्चित होते.
सावधगिरीचे उपाय
ज्या स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याची जास्त शक्यता असते त्यांना आम्ही जास्त काळजी घ्यावयास सांगतो व काही विशेष तपासण्या सांगतो.
१. दरवर्षी डॉक्टरांकडून स्तनाची पूर्ण तपासणी करून घेणे.
२. दर महिन्याला स्वत:च स्वत:ची तपासणी करणे. यालाच Breast self examination म्हणतात. याबाबत एकदा डॉक्टरांशी विचार विनिमय केला पाहिजे. आरशासमोर उभे राहून स्तनाचा आकार, त्यावरची त्वचा, निप्पल याकडे एकदा व्यवस्थित पाहिले पाहिजे.
३ मॅमोग्राफी : हे स्तनाचे विशेष प्रकारचे एक्स-रे व सोनाग्राफी असतात. यामध्ये आपल्याला जर स्तनात कुठे गाठ असेल तर त्याची लवकर माहिती मिळते.
उपचार
स्तनाच्या कर्करोगाच्या उपचाराची पाच प्रकारांमध्ये विभागणी होते.
१. सर्जरी
२. किमोथेरपी (औषधीद्वारे उपचार)
३. रेडिएशन ( लाईटथेरपी)
४. हार्मोनल उपचार
५. इम्युनोथेरपी
कॅन्सरच्या स्टेजप्रमाणे उपचाराची दिशा वळते.
१ सर्जरी : जर कॅन्सरची नुकतीच लागण झाली असेल तर पूर्ण स्तन न काढता फक्त कॅन्सरग्रस्त भाग काढून त्या स्तनाला रेडिओथेरपीचे उपचार देतात. याला ब्रेस्ट काँझर्वेशन सर्जरी म्हणतात.
जर स्टेज पुढे गेली असेल तर पूर्ण स्तन व काखेतील लीफ नोडस् काढावे लागतात.
२ किमोथेरपी : या उपचारपद्धतीमध्ये गोळया किंवा इंजेक्शनद्वारे कॅन्सरच्या पेशी नष्ट करतात. टारगेटेड थेरपीमध्ये फक्त कॅन्सरपेशींना नष्ट केले जाते.
३ रेडिएशन थेरपी (लाईट) : रेडिएशन थेरपीमध्ये अति दाबाच्या म्हणजेच मेगा व्होल्टेज क्ष-किरणाच्या सहाय्याने कॅन्सरग्रस्त पेशींचा नाश करतात. रेडिएशन उपचारामध्ये पण अत्याधुनिक तंत्रज्ञान आज उपलब्ध आहे. उदा. लिनियर अॅक्सलेटर मशिन, Treatment planning system (TPS). यामुळे कॅन्सर रूग्णांना उच्च दर्जाची किरणोपचार सेवा अतिशय कमी वेळात मिळते.
४ हॉर्मोनल थेरपी : ही उपचारपद्धती खुप महत्त्वाची आहे. आणि याचे साईड इफेक्ट पण फारच कमी असतात.
ER Positive - स्तनाचा कॅन्सर असणारी स्त्री जर इस्ट्रोजन रिसेप्टार पॉझिटीव्ह असेल तर तिला त्याप्रमाणे पाच ते दहा वर्षे हॉर्मोनल उपचार देतात.
HER 2 पॉझिटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर :
साधारणपणे २५ टक्के स्तनाचे कॅन्सर HER2 पॉझिटिव्ह असतात. हे एक प्रकारचे प्रोटीन आहे. HER2 पॉझिटिव्ह पेशंटमध्ये कॅन्सर पेशींच्या जास्तीच्या गुणसुत्रांचा संच असतो. हे कॅन्सर जास्त आक्रमक असतात. पण त्यावर योग्य परिणामकारक औषधे आहेत.
५ इम्युनोथेरपी : ही एक नवीन उपचारपद्धती आहे. यामुळे पेशंटची रोगप्रतिकार क्षमता वाढते, कॅन्सरची तीव्रता कमी होते.
थोडक्यात
१. ताणतणाव टाळावा.
२. आहारामध्ये स्निग्धपदार्थ व कॅलरीचे प्रमाण कमी करावे. जास्तीतजास्त फळे, भाज्या व तंतुमय पदार्थ खाल्ले पाहिजेत.
३. नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे.
४. कॅन्सरला आपण प्रतिबंध करू शकत नाही. पण त्याचे वेळेत निदान करून योग्य उपचाराने रोगमुक्त होऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक स्त्रीने स्तनाच्या गाठीबद्धल सतर्क राहणे आवश्यक आहे.
Remarks :
सारांश : डॉ. सुषमा देशमुख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.