आईचे दूध हे बाळासाठी अमृतच

breast feeding.
breast feeding.
Updated on

दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट हे सात दिवस जागतिक स्तनपान आठवडा म्हणून जगात साजरा केले जातात. 1990 साली इटलीतील फ्लोरेंस येथे जागतिक आरोग्य संघटना, UNICEF आणि इतर संघटनांनी एकत्र येऊन इनोसेंटी डिक्‍लेरेशनवर स्तनपानाला महत्त्व देण्यासाठी,वाढवण्यासाठी शिक्कामोर्तब केले. त्यानंतर दरवर्षी जगात स्तनपानाचे महत्त्व जोपासण्यासाठी हा आठवडा साजरा केला जातो. दरवर्षी स्तनपानाला जोडून वेगवेगळी संकल्पना घेऊन स्तनपानाचे समर्थन, संरक्षण, वृद्धीकरण करण्यासाठी जगभरात खुप सामाजिक कार्यक्रम घेतले जातात.
जागतिक स्तनपान 2020 ची संकल्पना पृथ्वी व पृथ्वीतलावरील लोक निरोगी राहण्यासाठी स्तनपानाचे समर्थन करा व पर्यावरणाचा समतोल राखा.

आज पूर्ण विश्‍वामध्ये स्तनपानाला विशेष महत्व दिले जाते आहे. प्रत्येक स्त्रीला स्तनपान, प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतर स्तनांची घ्यावयाची काळजी हे कळणे महत्त्वाचे आहे. आज आपण स्तन व स्तनपानाबद्धल विशेष माहिती करून घेऊ.

स्तनांची रचना व कार्य
 स्तनांच्या आतील भागात अनेक लहानलहान पिशव्या असतात. या पिशव्या एकमेकांजवळ आल्या की त्यांचा एक समुदाय तयार होतो. याप्रमाणे अनेक गुच्छ मिळून मोठे गुच्छ तयार होतात. प्रत्येक स्तनामध्ये साधारणपणे 15 ते 20 मोठे गुच्छ असतात.

. दुधाच्या पिशव्यातील दूध लहानलहान नलिकांमधून वाहते. या एकमेकांना जोडल्या जाऊन मोठी नलिका तयार होते. अशा या मोठया नलिका स्तनाग्र म्हणजेच निप्पलच्या मागच्या भागात उघडतात निप्पलवर काही विशेष प्रकारचे स्नायु असतात, जे आकुंचन प्रसरण पावल्यावर निप्पलमधून दूध बाहेर येते.

स्तनांची देखरेख व काळजी
गरोदरपणामुळे स्तनांवर काही बदल घडून येतात व जी स्त्री पहिल्यांदा गर्भवती असते, त्या स्त्रीमध्ये चांगल्या प्रमाणात दिसून येतात.
1. प्रत्येक स्त्रीला स्तनपानाचे महत्व माहित असावे. विशेषत: प्रथम मातांना दूध कसे पाजावे याची माहिती असणे आवश्‍यक असते. आधुनिक किंवा नोकरी करणाऱ्या माता बहुतेक बाटलीतून दूध पाजतात. अशा स्त्रियांनी दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अंगावर दूध पाजणे आवश्‍यक आहे.
2. मुलाला अंगावर दूध पाजण्याकरिता मानसिकदृष्टया आईची तयारी पाहिजे. त्यामुळे ती स्तनांची व स्वत:ची नीट काळजी घेईल. प्रत्येक गर्भवती स्त्रीने स्तनांकडे लक्ष दिलेच पाहिजे.
3. गर्भवती महिलांनी दररोज स्वच्छ आंघोळ केली पाहिजे. स्तन व स्तनाग्रे कमीतकमी एकवेळा मऊ साबण व पाण्याने धुवावे.
4. प्रसूतीपूर्व स्तनांची तपासणी गर्भवती स्त्रीसाठी आवश्‍यक बाब आहे. यामध्येच निप्पल व स्तनांमधील दोषसुद्धा दिसतात व उपाययोजना करता येतात.
5. गर्भवती स्त्रियांनी प्रसूतीपूर्व काळजी, प्रसूतीची तयारी, प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरचा आहार, स्तनपान,यावर विशेष लक्ष देणे जरूरी आहे.

ही झाली प्रसूतीपूर्व काळजी. पण प्रसूती झाल्यानंतरचा काळ खरा महत्त्वाचा असतो.
पहिला गट - यामध्ये नॉर्मल प्रसूती झालेल्या, बाळंतपणाची दुसरी वेळ असणाऱ्या व दुसरे काही आजार नसलेल्या माता किंवा बाळ येतात. अशांना स्तनपानाचा फारसा त्रास होत नाही. प्रसूतीनंतर एक दोन दिवसातच स्तनपान व्यवस्थित चालू होते.

दुसरा गट - दुसरा गट म्हणजे पहिलटकरीण, प्रसूती ऑपरेशनने झाली असेल. या मातांना जरा वेळ लागतो. स्तनपानाकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे.

तिसरा गट - गुंतागुंतीची प्रसूती व बाळाचे आजार

1. कांही वेळा बाळ वेळेआधी जन्मते.
2. कधी त्यांची वाढ खुंटलेली असते.
3. बाळातील जन्मदोष
4. आईचे आजार
5. जुळी बाळे
या सर्व प्रकारांमध्ये डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार स्तनपान करावे. कारण आईच्या दुधामुळे बाळाची प्रतिकारक्षमता वाढून बाळ लवकर बरे होते.

स्तनपानाचे महत्त्व :
अ) बाळासाठी -
* आईच्या दुधात सर्व पौष्टिक घटकांचे प्रमाण योग्य प्रमाणात असते व दुध पाचक असते.
* आईच्या दुधामुळे बाळाची प्रतिकारक शक्ती वाढते.
* आईच्या दुधाचे तापमान योग्य प्रमाणात असते व लगेच स्तनांमधून बाळाच्या मुखात गेल्यामुळे बाळाला बाधत नाही. इन्फेक्‍शन होत नाही.
* आईच्या दुधात बाळाच्या वाढीसाठी अत्युत्तम प्रथिने असतात. तसेच अनुकुल स्वरूपात फॅटस्‌ व कॅल्शिअम असते. कांही विशिष्ट घटक मेंदूच्या विकासासाठी महत्त्वाचे असतात.
* बाळ जर वेळेआधी जन्मले असेल तर नैसर्गिकरित्याच आईच्या दुधात बदल होतात व त्या कमी वजनाच्या बाळासाठी हे दूध अत्यंत पोषक असते.
* आईच्या दुधात लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, हार्मोन्स, संप्रेरके योग्य प्रमाणात असतात. या सर्व महत्त्वपूर्ण घटकांमुळे बाळाची मानसिक, शारिरिक, बौद्धिक वाढ चांगली होते.
* वेगवेगळ्या संसर्गजन्य आजारांपासून बाळाचे रक्षण आईच्या दूधामुळे होते.
* आईचे दूध बाळाला नेहमीच उपलब्ध असते. स्तनपान कोठेही करता येते.
* आईच्या दुधामुळे बाळाचे पोट तर भरतेच पण बाळ अत्यंत शांत व समाधानी असते. आईचा स्पर्श, गंध बाळाला आवडतो. त्यामुळे माता व बाळ हे नाते अधिक दृढ होते.
ब) आईसाठी पण स्तनपान हे तितकेच महत्त्वाचे आहे.
* आईला मानसिक समाधान मिळते.
* प्रसूतीनंतर गर्भाशयाचे आकारमान पूर्ववत होण्यास मदत होते.
* स्तनपान करणाऱ्या मातांमध्ये नैसर्गिक रित्याच हॉर्मोन्सच्या बदलामुळे मासिकपाळी येत नाही. तसेच हा स्तनपानाचा कालावधी गर्भनिरोधकाप्रमाणे काम करतो. पण यावर पूर्णपणे अवलंबून राहू नये.
* स्तनपान करणाऱ्या स्त्रियांमध्ये स्तन व स्त्रीबीजकोशांच्या कॅन्सरचे प्रमाण कमी असते.
* स्तनपानामुळे बाळ आईच्या खुप जवळ येते. व यामुळे फलदायी पालकत्वाकडे पहिले पाऊल पडते.
स्तनपान कसे व किती वेळा करावे?
बाळाला स्तनपान जन्मल्याबरोबर सुरू करावे व साधारणपणे कमीतकमी 1 ते दीड वर्षापर्यंत करावे. स्तनपान दर दोन ते अडिच तासांनी करावे. बाळाच्या वजनाप्रमाणे किंवा कांहीही अडचणीप्रमाणे डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार करावे.
आजच्या या कोरोनाच्या आजारात आईने स्तनपान करावे कां?
जागतिक आरोग्य संघटनेनुसार, जर आईला अगदी कमी प्रमाणात आजार असेल तर ती सर्वप्रकारची खबरदारी घेऊन स्तनपान करू शकते किंवा दूध वाटीत काढून ते बाळाला पाजू शकतात.
बाळाच्या जडणघडणीमध्ये स्तनपानाला अतिशय महत्व आहे. त्यामुळेच आम्ही म्हणतो, ईश्‍वराने बाळाची काळजी घेण्यासाठी जशी आई निर्माण केली तसेच बाळाच्या वाढीसाठी अमृततुल्य पोषक असे आईचे दूध बनविले.

थोडक्‍यात
1. दूधन्मसिद्ध हक्क आहे.
2. होणाऱ्या बाळाला स्तनपान करण्यासाठी गर्भवतीची शारिरिक व मानसिक तयारी असणे खुप आवश्‍यक आहे. तिने स्तनांची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे.
3. स्तनपानाबद्दल कुठलेही त्रास व शंका असल्यास स्त्रीरोगतज्ञांचा सल्ला ताबडतोब घेणे अतिशय आवश्‍यक आहे.
4. आईच्या दुधाची बरोबरी कुठल्याच दुधाशी होत नाही त्यामुळे स्तनपान हा बाळासाठी सर्वश्रेष्ठ आहार आहे.
बाळाची शारिरिक व मानसिक रितीने योग्य वाढ होण्यासाठी आईचे दुध ही बाळाला आईने दिलेली अनमोल भेट आहे. आईचे दूध हे बाळासाठी अमृतच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.