पावसाळा म्हटला की सर्दी, खोकला, व्हायरल फिव्हर या आजारांनी घरातला एखादा सदस्य आजारी पडतोच. या दिवसांत डॉक्टरांच्या दवाखान्याबाहेर रुग्णांची वाढती गर्दी तसेच वाढता औषधांचा खर्च कित्येकदा महिन्याच्या बजेटलाही धक्का पोहचवतो. औषध- गोळ्यांनी रुग्ण बरे होत असले, तरीही आयुर्वेदासारख्या जुन्या औषधी परंपरेतील खाण्याच्या सवयींचे योग्य पालन केले, तर आजार मुळात होणार नाही. किंबहुना रोगप्रतिकारक शक्तीमुळे आजार शरीरातून पटकन निघून जातात, असा विश्वास एम्स दिल्लीचे सहसंचालक डॉ. उमेश तागडे देतात.
पावसाळ्यात पचनशक्तीत बिघाड झाला, की सर्दी, खोकल्यासारखे आजार होतात. या दिवसांत पचनशक्तीत बिघाड होण्याची दाट शक्यता असते. म्हणून बाहेरचे अन्नपदार्थ तसेच पाणी पिणे टाळलेलेच बरे. थंड वातावरणात शरीरात वात-दोष निर्माण होतो. त्यामुळे गुडघे दुखण्याच्या तक्रारीही वाढतात. जुलाब, श्वसनाचे विकार, त्वचारोग या आजारांसह डेंगी, मलेरिया, लेप्टोसारखे जीवघेणे आजारही होण्याची दाट शक्यता असते. या दिवसांत हलका आहार घेणे आणि तसेच तेलकट, तूपकट पदार्थांपासून लांब राहण्यासाठीच पावसाळ्यात उपवास करण्याचा सल्ला जुनीजाणती मंडळी देतात. हा सल्ला शरीराच्या पचनक्रियेसाठी उत्तम असल्याची माहिती डॉ. तागडे देतात. शरीरात वात तयार होऊ नये म्हणून मोहरी, हिंग आणि मेथीच्या फोडणीचा अन्नपदार्थ तयार करताना वापरावी. पावसाळ्यातील मायाळू, मोरशेंड, आघाडा, टाकळा, भुईआवळी, नळीची भाजी, कपाळफोडी, आंबुशी, शेवळा या औषधी भाज्यांचा समावेशही रोजच्या जेवणात असावा.
हे कराच...
या दिवसांत शरीरात वात निर्माण करणारे पदार्थ टाळावेत. कांदा, बटाटा, मटार, कोबी, वांगे या पदार्थांमुळे शरीरात वात निर्माण होतो. ज्वारी, बाजरी, राजगिरा, मूगडाळ, भाकरी, खाकरे अन्नपदार्थात आवर्जून असावेत, असा सल्ला आयुर्वेदाचार्य डॉ. ऊर्मिला पिटकर देतात. मेथी, साजूक तुपासह गव्हाच्या पिठात मळून लाडू करा. मेथी वातशामक आहे. त्यामुळे गुडघ्यांच्या आजारांवर मात करण्यासाठी तसेच शरीरात वात निर्माण न होण्यासाठी रोजच्या सकाळच्या न्याहारीत मेथीचा लाडू नक्की घ्या. सुंठ, तूप आणि गुळाचा लाडूही शरीरासाठी उत्तम, सुंठ या दिवसांत गुळासह घ्यावी. पावसाळ्यातील सर्दी, खोकला आणि डोकेदुखी दूर ठेवण्यासाठी सुंठीचा लाडू नक्कीच मदत करतो. पावसात भिजल्यानंतर अंग गरम झाले असेल, तर कुळथाची उसळ जेवणात समाविष्ट असावी. नागपंचमीच्या दिवसांतील दूध, लाह्या असो वा गुळाने बनवलेले गोड पदार्थ- या दिवसांत शरीर निरोगी राहण्यासाठी सणोत्सवारातील अन्नपदार्थ बनवले गेले आहेत. मधाचे सेवन या दिवसांत करणे आरोग्यासाठी उत्तम आहे.
अशी घ्या काळजी
हे करू नका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.