सकाळी लवकर उठण्याची आपली सर्वांत पहिली आठवण म्हणजे आई-वडील, आजी-आजोबा आपल्या आधी पहाटे उठायचे. किंवा अगदीच शाळा सकाळची लवकर असल्यास कसे-बसे उठून जायचं. बेंजामिन फ्रँकलिनचं ‘Early to bed early to rise makes a man healthy, wealthy and wise’ हे फक्त ऐकूनच आहोत. पण या मागचे कारण आणि आपल्या घरातील मोठ्यांच्या ‘सकाळी लवकर उठत जा’ अशा शंभर वेळा सांगितलेल्या वाक्यावर कधीच चिंतन केले गेले नाही. सकाळी लवकर उठण्यामागची शास्त्रीय कारणे व त्यांचे फायदे कायम थिअरीमधेच राहिले. मोठे झाल्यावरसुद्धा अनेक जणांची लवकर न उठण्याची सवय कायमच राहिली. याचे सर्वसाधारणपणे ऐकण्यात येणारे कारण म्हणजे ‘सकाळी उठून करू काय?’ अलिखित नियमानुसार घरातील स्त्रीला मात्र लवकर उठून ‘सगळ्यांचे सगळे करायचे असते'', पण शाळा, कॉलेज, जॉब किंवा पिकनिक याच्या व्यतिरिक्त सकाळी उठण्याचे प्रयोजन काहींना नसतेच. निरोगी, यशस्वी आणि ज्ञानी होण्याचा सकाळी लवकर उठण्याशी काय संबंध असावा?
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
Healthy
आपल्या मेंदूमध्ये स्वतःचं असं एक घड्याळ (biological clock) असते, जे झोपण्या-उठण्याचे उत्तम नियंत्रण करू शकते. परंतु आपण आपल्या सवयींनी ते घड्याळ बिघडवतो. आपले शरीर एक परिपूर्ण असा कारखाना आहे, आपला मेंदू एक उत्तम मॅनेजर आहे ज्याला टाइम मॅनेजमेंट आणि एनर्जी मॅनेजमेंट उत्तम जमते. पण आपण एका वाईट कर्मचाऱ्यासारखे वागून कायम असहकार्य करत या कारखान्याचे संतुलन बिघडवतो. लवकर उठण्याने संपूर्ण दिवस उत्साह टिकून राहतो, चयापचय (metabolism) सुधारते. मायग्रेन, ब्लड प्रेशर नियंत्रित राहते व हृदयरोग टाळता येऊ शकतो. स्ट्रेस कमी ठेवण्यासाठी आणि मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी लवकर पहाटे उठणे अत्यंत आवश्यक आहे. स्थूलता कमी करायची असल्यास झोपण्या-उठण्याचे चक्र सुधारणे गरजेचे आहे. एकाग्रता, स्मरणशक्ती, मूड आणि कार्यक्षमता पहाटे लवकर उठण्याने वाढते. विद्यार्थ्यांनी रात्री जागून अभ्यास करण्यापेक्षा पहाटे उठून केल्यास विषय आणखी चांगला समजेल. एकंदरीतच, कोणतेही बौद्धिक काम पहाटे उठून करा, कारण झोपेत आपला शरीर आणि मेंदू पूर्णपणे रिसेट आणि रिबूट होऊन फ्रेश झालेला असतो. व्यक्तिमत्त्वाचा सुबकपणा, तजेलदार त्वचा आणि डोळ्यात दिसणारी चमक हवी असेल तर पहाटे उठायला सुरू करा.
Wealthy
इतरांपेक्षा दोन तास लवकर उठलात, तर त्यांच्यापेक्षा रोज दोन पावले पुढे असाल. प्रत्येकाला मिळालेल्या २४ तासांचे विभाजन आणि उपयोग कसा करताय यावर तुमचे यश अवलंबून आहे. कार्यक्षमता आणि हातातील वेळ जास्त असल्यास कितीतरी गोष्टी झटपट साध्य करता येऊ शकतात. स्वतःसाठी, जवळच्या व्यक्तींसाठी आणि कामासाठी मिळालेला हा वेळ आणि निरोगी शरीर यांनी तुम्हाला हवे ते मिळवू शकता. सकाळी घाईत उठून जेमतेम आवरून, केवळ वाहनाचा वेग वाढवून कामाला पोहोचण्यात आणि लवकर उठून दिवसाचे नियोजन करून मनाच्या क्लॅरिटीतून शांततेने सुरू केलेला दिवस यातला फरक अनुभवून पाहा, नक्कीच त्याच्या प्रेमात पडाल!
Wise
जगातील यशस्वी लोक पहाटे लवकर दिवस सुरू करतात. त्यात ते व्यायाम, ध्यान, योग्य आहार आणि दिवसाचे नियोजन करतात. भारतीय संस्कृतीमध्ये ब्राह्म मुहूर्ताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संपूर्ण जग उठायच्या आधीच जेव्हा वातावरणातील रजोगुण आणि तमोगुण सुप्त असतात तेव्हा सात्विकता सर्वाधिक असते. अशा काळात आत्मविकासासाठी पूर्ण लक्ष केंद्रित करणे सर्वांत सोपे जाते. हा सुवर्णकाळ योग, ध्यान करण्यासाठी सर्वोत्तम असतो, कारण त्यावेळी मनातील विचार, काळजी, भीती, भावनिक उचंबळ शांत असतात. मन शांत आणि शुद्ध असते - अगदी कोऱ्या कागदासारखे! आजच्या धकाधकीच्या काळात अगदी ब्राह्ममुहूर्त नाही, पण आपल्याला शक्य तितक्या लवकर उठणे तीही प्रगतीच आहे.
हे साध्य करून दिवसभर स्टॅमिना टिकवायचा असल्यास रात्री वेळेत झोपणे अपरिहार्य आहे. किमान सात तास किंवा आपापल्या गरजेनुसार झोप पूर्ण होऊन पहाटे उठावे, नाहीतर अपुरी झोप अनेक आजारांना आमंत्रण देते आणि पुन्हा आपण आरोग्याच्या मागे धावत राहतो. स्वामी विवेकानंदांमुळे प्रसिद्ध झालेले कठोपनिषदातील ‘उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत..’ असे अनेकांना आज म्हणण्याची गरज आहे - उठा, जागे व्हा...! अर्थात ही उक्ती आध्यात्मिक जागृतीसाठी आहे, परंतु आपण त्या अगोदर निदान दैनंदिन जीवनातील जागृती तरी साधूया.
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.