जगभरात सर्वाधिक प्रमाणात कोणता त्रास होत असेल, तर तो आहे - स्ट्रेस! जीवन जगताना स्ट्रेस तर असणारच आहे, अगदी शाळेत जाणाऱ्या मुला-मुलींपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच तणावातून जावं लागतं. वयाप्रमाणं त्या स्ट्रेसचं स्वरूप बदलतं, पण कमी-अधिक प्रमाणात सगळीकडे अपूर्णता, अशांतता, अस्थिरता आणि अप्रसन्नता आहेच. आपण सगळेच आपापल्या परीनं आणि पद्धतीनं या स्ट्रेसला झुंज देत मार्ग काढत असतो आणि उरलेल्या निचरा न झालेल्या तणावासोबत जगायला शिकतो. खरंतर निसर्गाला हेच अभिप्रेत नाही. आजचा ताण उद्या ‘कॅरी फॉरवर्ड’ होऊ नये यासाठी निसर्गाने रात्र तयार केली. म्हणजे, निसर्गाने स्ट्रेस कमी करण्याची सोय केलेली आहे, झोपेच्या रूपात! पण अनेकांची झोपच बिघडल्यामुळं तणावावर इलाज तर होत नाहीच, उलट अपूर्ण व तुटक झोपेच्या दुष्परिणामांची त्यात भर पडते आणि हे दुष्टचक्र चालू राहते.
आजारांपासून दूर राहण्यासाठी
स्ट्रेस हा मनाच्या पातळीवर सुरू होतो, पण हळूहळू आंतरिक अवयवांवर त्याचे परिणाम दिसू लागतात. ही आंतरिंद्रिये त्यांच्यापरीने लढत असतात, परंतु जेव्हा त्यांची शक्ती कमी होत जाते, तसतसा रोगांचा शिरकाव व्हायला लागतो. उदाहरणार्थ, स्वादुपिंडाची (pancreas) कार्यक्षमता कमी होऊ लागली की मधुमेह होतो, गर्भाशयाची क्षमता कमी झाली की फायब्रॉइड्स होतात, अंडाशयामध्ये पीसीओडी, थायरॉईड, बद्धकोष्ठता, हृदयविकार, लठ्ठपणा, यकृताचे आजार इत्यादी. यांच्यावर उपाय म्हणून आपण लगेच औषधांकडे धाव घेतो. परंतु विचार असा असावा, ‘मी काय केले तर हे जीवनशैलीचे विकार होणार नाहीत, किंवा कमी तीव्रतेत होतील, किंवा शक्य तितकी वर्षे लांबणीवर टाकता येतील.’
लक्षात घ्या कोणत्याही रोगाचे किंवा जीवनशैलीच्या विकारांचे एक सोपे सूत्र आहे -
स्ट्रेस + चुकीची जीवनशैली = विकार
यावर सर्वांत पहिला उपाय म्हणजे झोपेची क्वालिटी सुधारणे. जे लोक सातत्याने सात तासापेक्षा कमी झोपतात, त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ लागतात. त्यांचे एजिंग लवकर होते, हृदयाचे विकार व मधुमेह लवकर होतो. झोप पूर्णपणे सुधारल्यास ५०% जीवनशैलीशी संबंधित आजार बरे (रिव्हर्सल) होऊ शकतात. झोपेवर मी एक संपूर्ण लेख मागील वर्षी लिहिला होता, त्यात झोपेविषयी सर्व शास्त्रीय माहिती दिलेली आहे.
जीवनशैलीत हे बदल करा
रोज सर्वांगाला व्यायाम व योगासने करणे गरजेचे आहे.
प्राणायाम व ध्यान
रोज होणे आवश्यक आहे.
मद्यपान व धूम्रपान करू नये.
स्थूलता येऊ देऊ नये.
माफक आणि वेळच्यावेळी आहार घ्यावा.
पाणी भरपूर प्यावे.
दिवसातला काही काळ का होईना फोन, टीव्ही आणि लॅपटॉपशिवाय घालवावा.
निरोगी नाती व संभाषण कौशल्य टिकवावे.
रोज थोडावेळ तरी निसर्गात घालवावा.
कोणत्याही नवीन डाएट ट्रेन्डच्या मागे जाऊ नये.
दिवसातील काही काळ बाह्य विश्व सोडून स्वतःबरोबर राहावे
बदल कधीही मोठ्या प्रमाणावर आणि एकदम होत नाहीत. सातत्याने जीवनशैलीमध्ये छोटे-छोटे बदल करून तीन महिने टिकवल्याने त्यांचे सवयींमध्ये रूपांतर होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.