शोध स्वतःचा : प्रतिसाद द्या प्रतिक्रिया नको!

Devyani-M.
Devyani-M.
Updated on

आपल्या आयुष्यात अनेक घडामोडी घडत असतात. आयुष्य कशाला - प्रत्येक दिवशी, प्रत्येक मिनिटाला छोट्या-मोठ्या घटना घडतच असतात. घरात काम करणाऱ्या मावशींनी थोडं काम कमी केलं किंवा एक कोपरा नीट साफ नाही केला, ऑफिसमध्ये सहकाऱ्यांकडून काम व्यवस्थित झालं नाही, रस्त्यात कोणीतरी अचानक कट मारून गेलं, रेस्टॉरंटमध्ये वेटरनं ऑर्डर चुकवली, प्रिंटआउट उलटी आली, रिक्षावाल्या दादांकडं दोन रुपये सुट्टे नव्हते, बायकोकडून चुकून मीठ किंवा तिखट जास्त पडलं... अशा हर प्रसंगी आपण उत्तेजित होत असतो आणि प्रतिक्रिया देत असतो. या प्रतिक्रिया आपल्या नकळत टोकदार, समोरच्याला बोचणाऱ्या किंवा आपल्यालाच मनस्ताप देणाऱ्या असतात. आता या सगळ्या घटना घडून गेल्यावर एका तासाने यांचा परिणाम किती टिकतो याचा कधी विचार केला आहे? अक्षरशः शून्य! आपण विसरूनही जातो की असं काही झालं होतं. पण त्यावेळी आपण एकदम शार्प रिअॅक्शन देऊन स्वतःला व समोरच्याला वेदना देऊन मूडही घालवतो.

5 by 5 rule
इंग्रजीमध्ये एक म्हण आहे - ''If it doesn''t matter in 5 years then don''t spend more than 5 minutes worrying about it!''. व्यवसायात अनेक प्रसंग येतात जेव्हा उद्योजकांसमोर पेच निर्माण होतात किंवा हताश करणाऱ्या घटना घडतात, तेव्हा त्यांनी जरा थांबून विचार करावा की त्यांना पुढील पाच वर्षात कुठे पोहोचायचं आहे. तुमच्या योजनांना इतक्या विस्तारित रूपात जेव्हा पाहाल तेव्हा समोर वाढून ठेवलेल्या प्रसंगांना कशाप्रकारे हाताळायचं याचं अचूक उत्तर सापडेल आणि मनस्तापही होणार नाही. आपण सर्व गोष्टींना इतक्या जवळून पाहतो, की त्यावेळी त्या खूप मोठ्या भासतात. अंतर निर्माण करता आलं, तर त्याच गोष्टी स्पष्ट दिसतात व छोट्या वाटतात आणि योग्य व पटकन निर्णय घेता येऊ शकतो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Just take a deep breath...
असं तुमचं झालं असेलच की एखादी प्रतिक्रिया दिल्यावर किंवा त्याक्षणी पटकन काहीतरी बोलून गेल्यावर नंतर पश्चात्ताप झाला. जसे फोनवर विविध ॲप्समध्ये फिल्टर असतात तसेच आपल्या आतील खोलवर असलेली भीती, असुरक्षितता, राग यांचे जणू आपल्या मनावर फिल्टरच लावलेले असतात. आपल्या नकळत त्यांचे अवशेष बाहेर येऊन क्षणार्धात दिलेल्या प्रतिक्रियांना बोचक बनवतात. अशानं आपल्या आतील-बाहेरील वातावरण आणि नाती दोन्ही दूषित होतात. असं करून बघा पुढच्या वेळी असा प्रसंग समोर आला तर प्रथम थांबा, प्रसंगाकडं तटस्थपणे पाहा, समजून घ्या की त्यांचा तुमच्या आयुष्याच्या ‘बिग पिक्चर’वर तसा काही फारसा फरक पडणार नाहीये, तर सोडून द्या. सर्वांत शेवटचं म्हणजे, त्यावर चिंतन करून वेळ आणि शक्ती वाया घालवू नका. जितकी त्या घटनेची पात्रता आहे तितकाच वेळ आणि शक्ती त्यावर खर्च करा.

Reaction and Respone
मन देते ती प्रतिक्रिया (reaction) आणि बुद्धी देते तो प्रतिसाद (response). आपल्या मेंदूमध्ये संवेदना पोहोचल्यावर खालीलपैकी दोन ठिकाणी जाऊ शकतात. ''प्रीफ्रंटल कॉर्टेक्स'' म्हणजे मेंदूतील वैचारिक भाग ज्याला थिंकिंग ब्रेन म्हणूया, जो केवळ १७ टक्के आहे, किंवा दुसरा उरलेला सर्व भाग रिअॅक्टिव्ह ब्रेन ज्यांच्यावर भावना, स्ट्रेस आणि सवयींचा प्रभाव असतो, तिथे तरी त्या संवेदना पोहोचतात. नकारात्मकता, स्ट्रेस कमी असेल आणि मनाची स्थिरता असेल, तर थिंकिंग ब्रेन चांगल्या प्रकारे काम करू शकतो. अशाने reaction नाही तर respond करायला सुरुवात होईल आणि हळूहळू तेच ब्रेनचं वायरिंग बनेल. अशानं मनातील तीव्र चढ-उतार कमी होऊन दैनंदिन जीवन बरचसं सहज होईल.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.