शोध स्वतःचा : द्वंद्वातीत
कोणत्याही व्यक्तीला, विचाराला, भावनेला, प्रसंगाला चूक किंवा बरोबर - चांगलं किंवा वाईट अशा साच्यात न घालता जे जसं आहे तसं आणि तेवढंच राहू देऊन, त्याला आहे त्या स्वरूपात स्वीकारणं ही प्रगत मनुष्याची लक्षणं आहेत. आपल्याला लहानपणापासून चांगलं-वाईट, बरोबर-चूक, सुंदर-कुरूप, हुशार-ढ, श्रीमंत-गरीब, पास-नापास अशा टोकाच्या भूमिकेत आपला समाज, घरचे व शिक्षण संस्था कायम ठेवत आले आहेत. अजाण वयापासूनच अशा विचारधारेत वाढत आपणही नकळत तसेच बनू लागलो. कधीच समजलं नाही. की असं बॉक्समध्ये टाकण्यानं आपला जीवनाकडं पाहण्याचा दृष्टिकोन खुंटत आहे. आपल्याला कोणी अशा बॉक्समध्ये पाहिलं, तर आपली घुसमट होते, तसंच आपणही इतरांना असं करत नाही ना याकडं तटस्थपणे पाहता आलं पाहिजे!
"The ability to observe without evaluating is the highest form of intelligence"
– J. Krishnamurthy
विचारशून्यता
योगसूत्रांमध्ये पतंजली मुनी जेव्हा चित्तवृत्तींचा निरोध करण्याबद्दल सांगतात, तेव्हा पुढं जाऊन चित्तवृत्ती म्हणजे विचारांच्या विविध प्रकारांबद्दल आणखी विस्तार करून सांगतात. इथं विचारांचे चांगले-वाईट म्हणजे क्लिष्ट-अक्लिष्ट असे प्रकार ते सांगतात, परंतु हे म्हणायच्या आधीच ते स्वच्छपणे सांगतात, की दोन्ही प्रकारच्या विचारांचा ‘निरोध’ म्हणजे त्यांना थांबवायचं आहे. योगात चांगल्या-वाईट दोन्ही प्रकारच्या विचारांना शांत करायचं असतं. विचारशून्यता ही मात्र सुरुवात मानली आहे. म्हणूनच १९६व्या योगसूत्रात महर्षी पतंजली दुसऱ्याच सूत्रात स्पष्टपणे ‘योगश्चित्तवृत्तिनिरोध:’ असं सांगून मोकळे होतात. कोणत्याही द्वंद्वांमध्ये न अडकता त्यांच्या पलीकडं जाणं ही खरी जगण्याची कला. संपूर्ण भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने स्थितप्रज्ञ पुरुषांच्या लक्षणांमध्ये द्वंद्वातीत होणं हे महत्त्वाचं लक्षण सांगितलं आहे.
निःपक्षपातीपणा
गोष्टींना चांगलं-वाईट म्हणण्यात अडचण ही असते की चांगल्या गोष्टींचा अतिरेक होऊ शकतो आणि वाईट गोष्टींपासून आपण पळू पाहतो किंवा त्यांना दडपून टाकतो. ते दडपण्याची, त्यापासून पलायन करण्याची मनाची धडपड आणि त्याने होणारा त्रास, यावर उपाय हा की आपल्या मनाला जे घडतंय त्याकडे नि:पक्षपातीपणे पाहण्याची सवय लावावी. असं जगू लागलो की तुमचं तुम्हाला आतून हलकं वाटायला लागेल. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याची, मत मांडण्याची, काहीतरी म्हणणं असण्याची, त्याला गुड-बॅडच्या पक्षात टाकून त्याचं अस्तित्व सीमित करण्याची सवय मोडावी. अशानं आपलं व्यक्तिमत्त्व परिपक्व, सहज, मोकळं, आनंदी आणि हवहवसं वाटू लागेल. आपला सहवास इतरांनाही आनंद देईल आणि नाती घट्ट होतील.
मागच्या आठवड्यात पाऊस पडून गेला, तेव्हा ग्रुप कॉलवर आम्ही सगळे मित्रमैत्रिणी गप्पा मारत मातीच्या सुवासाचा आनंद घेत होतो. तेवढ्यात एक मित्र म्हणाला, ‘हा पाऊस चांगला नाहीये, सगळं मातीचं घाण पाणी आहे.’ आता निसर्गाला देखील आपण अशा बॉक्समध्ये ठेवायला लागलो तर आनंदी राहायचं कधी आपण? तेव्हा मला व्लादिमिर नाबोकोवचं एक उद्धृत आठवलं - Do not be angry with the rain, it simply does not know how to fall upwards.
जे जसं आहे तसं त्याला राहू देऊ – कारण आपलं मत, आपला अभिप्राय बहुतांश वेळेला कोणालाही नको असतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.