शोध स्वतःचा : पाण्याप्रमाणे बना...

गेले दोन-तीन दिवस ‘तौक्ते’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळं सोसाट्याचा वारा आणि जोरदार पावसाचा अनुभव आपण सर्वजण घेत आहोत.
Devyani M
Devyani MSakal
Updated on

गेले दोन-तीन दिवस ‘तौक्ते’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळं सोसाट्याचा वारा आणि जोरदार पावसाचा अनुभव आपण सर्वजण घेत आहोत. काही महिन्यांपूर्वी ‘निसर्ग’ चक्रीवादळ येऊन गेलं. निसर्गानं दाखवलेली त्याच्या रौद्ररूपाची छोटीशी झलक आहे ही. हे रूप पाहून आपण अंदाजच बांधू शकतो, की पंचमहाभूतांमध्ये काय ताकद असू शकेल. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते परस्परविरोधी असली, तरी ती सामंजस्याने नांदतात म्हणून आपण त्यांचे महत्त्व आणि त्यांच्या शक्तीला गृहीत धरतो. परंतु भूकंप, त्सुनामी, वणवा, वादळ इत्यादींच्या रूपात यांमध्ये असंतुलन होऊन हानी दिसून आल्यावर आपल्याला त्याचं अस्तित्व प्रकर्षानं जाणवतं. आणि ती तत्त्वं सौम्य प्रमाणात व रूपात आहेत, हे पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीवर केलेले उपकारच आहेत. या वैश्विक शक्तीच्या क्षमतेची आपण फक्त कल्पनाच करू शकतो.

योग सरावाकडे व्यायामासारखे न पाहता, प्रत्येक कर्मच जागरूकतेने केल्यास प्रत्येक क्षण योगमय होईल. पतंजली मुनी म्हणतात

‘सतु दीर्घकालनैरन्तर्यसत्कारासेवितो दृढभूमि:’

(दीर्घकाळ, खंड न पडता आणि आदरयुक्त भावनेने केलेली साधना यानेच आपली आंतरिक अवस्था दृढ होते.)

ब्रूस लीचे वाक्य आहे ‘Be like water’. पाणी कोणत्याही आकाराच्या भांड्यात किंवा पात्रात ओतले, तर ते त्याचा आकार घेते. शरीराच्या लवचिकते इतकंच, किंबहुना जास्त, आपण मनाच्या लवचिकतेला प्राधान्य दिले पाहिजे. माझ्याकडं योग शिकण्यास येणारे अनेक क्लायंटस् मी दररोज पाहते. काही जणांमध्ये अक्षरश: काही आठवड्यातच कमालीचे परिवर्तन दिसू लागते, तर काहीजण महिनोंमहिने सातत्यानं सराव करून सुद्धा त्यांच्यात फार कमी बदल दिसतो. सातत्याबरोबरच मनाच्या लवचिकतेनं, ‘सत्कारासेवितो’ म्हणजे प्रक्रियेवर व शिक्षकांवर नितांत श्रद्धा ठेवून, आदरपूर्वक केलेल्या सरावानं भराभर प्रगती होते. ‘मी’पणाला विरघळवून केलेल्या कोणत्याही कर्माचा योग होईल आणि ते उंचीवरच घेऊन जाईल.

निसर्ग आणि ‘मी’

आपल्या गुरफटलेल्या दिवसातून जरा डोकं वर काढून पाहिलं आणि दृष्टिकोन असा ठेवला, तर हे निसर्गाचं रूप क्षणार्धात आपला अहंकार गळून पाडणारं आहे, नाही का? निसर्ग त्याचे हे भव्यदिव्य रूप दाखवून आपल्याला वेळोवेळी जणू आठवण करून देत आहे, की तुम्ही ज्याला ‘मी’ म्हणता आणि ज्या ‘मी’ला इतकं मोठं करून ठेवता तो वस्तुत: किती क्षुद्र आणि शक्तिहीन आहे. योगसूत्रात पंच क्लेश (पाच क्लेश) सांगितले आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘अस्मिता’. महर्षी पतंजली म्हणतात, आपल्या चित्तात जे शरीरासंबंधीचे ‘अस्मि’ म्हणजे ‘मी’चे अखंड स्मरण होत असते, तो भास आहे. आतील चैतन्य तत्त्व ते सत्य आहे, पण हा भास आपल्या जीवनात क्लेश निर्माण करतो आणि हे क्लेशच सर्व दुःखांना कारणीभूत ठरतात. सर्व गोष्टींच्या - विषयांच्या मध्यभागी असणाऱ्या या ‘मी’कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. योगाभ्यास आपल्याला अहंकाररूपी ‘मीपणा’पासून विश्वव्यापी ‘मी आहे’पर्यंत प्रवास करण्यास मदत करतो. योग या अहंकारापासून निर्माण झालेल्या मीपणाचा कडकपणा विरघळवतो. कारण आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये अनेक शार्प कंगोरे असू शकतात, जे आपल्याला कळतही नाहीत. जे योगाभ्यासामुळे आकलनाच्या क्षेत्रात येऊ लागतात आणि हळूहळू ते बोथट होत जातात. अखंड वाहणारे पाणी पाषाणाला देखील झिजवते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.