शोध स्वतःचा : ‘मी’ पणाचं ओझं

Devyani-M
Devyani-M
Updated on

आपण सर्वांत जास्त विचार कशाचा करतो – स्वतःचा! मी, माझं, मला.. मी बिझी आहे, माझा वेळ, माझी गाडी, माझं घर, मला असंच लागतं, मला असं वाटतं, मी.. मी.. मी.. आपले अस्तित्व, आपला विचार लहान करून ठेवतो. लहान का, तर हे सगळं आपण आपल्या शारीरिक अस्तित्वाच्या दृष्टिकोनातून पाहत असतो. चूक आहे का? तर नाही, पण क्षुद्र नक्कीच आहे. हे जग खूप विशाल आहे. पण आपण आपलं जग अगदी समुद्रासमोर एका थेंबाप्रमाणं करून ठेवतो. तो थेंब विसरतो की खरंतर तो त्याच समुद्राचा अंश आहे आणि त्यानं स्वतःकडं त्याच विशालतेनं पाहिलं पाहिजे.

उदाहरणार्थ आपण ज्याला माझं घर म्हणतो ते खरंच आपलं असतं का? समर्थ रामदास स्वामी ग्रंथराज दासबोधामध्ये म्हणतात -
‘मुष्यक म्हणती घर आमुचे | पाली म्हणती घर आमुचे | मक्षिका म्हणती घर आमुचे | निश्चयेसी|| कांतण्या म्हणती घर आमुचे | मुंगळे म्हणती घर आमुचे | मुंग्या म्हणती घर आमुचे | निश्चयेसी |’
ज्या घराचा तुम्ही कष्टाने इएमआय भरत आहात त्याला तुमच्या घरातील उंदरे, पाली, माश्या, वाळवी, मुंगळे, मुंग्या, झुरळे, ढेकूण हे सुद्धा त्यांचंच घर समजतात. पुढं जाऊन ते हेही म्हणतात की जसे घर खरे आपले नाही, तसे तुमचे शरीरसुद्धा तुमचे खरे नाही. पोटातील जंत, दातातील कीड हेही आपल्या शरीराला त्यांचंच समजतात. जरा स्वतःच्या आयुष्याच्या गुंत्यातून बाहेर येऊन लांब जा, छोट्या ''मी''ला जरावेळ विसरून सर्वत्र पसरलेल्या विशाल ‘मी’कडं पाहा. या अफाट विश्वाचं आकलन फक्त माणूसच करून घेऊ शकतो इतकी विलक्षण क्षमता आहे आपल्यात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संकल्पना ‘मी’पणाची
श्री निसर्गदत्त महाराजांचे एक वाक्य माझ्या मनात कायम घर करून असतं – “Make use of the body without identifying with it.” आपण आपल्या अस्तित्वाची (‘मी’पणाची) संकल्पना आपल्या नावाशी, रूपा-रंगाशी, हुद्द्याशी, परिस्थितीशी, शैक्षणिक-आर्थिक पातळीशी घट्ट चिकटवून ठेवतो. या विविध संकल्पनांची कॉलर लावून वावरत असतो. मग काही काळानं या कॉलरचं ओझं व्हायला लागतं. श्रीमंत आहे तर श्रीमंती टिकवण्याचं ओझं, सुंदर आहोत तर सौंदर्य टिकवण्याचं ओझं, कंपनीत चांगल्या हुद्द्यावर आहोत तर आणखी पुढं जाण्याच्या रेसमध्ये होणाऱ्या फरफटीचं ओझं इत्यादी. हे चालूच राहणार, काम सोडून बसायचं हा यावरील उपाय नाही. पण कल्पना करा हे सगळं करत राहून सुद्धा ओझं उतरलं तर? कधी गावाकडं जाऊन थोडं श्रमदान करावं, कधीतरी काहीही गबाळे कपडे घालून वावरावं, कधीतरी काहीही न करण्यातली स्थिरता अनुभवावी, पैसे आहेत म्हणून खरेदी न करता खरी गरज असेल तरच खर्च करावा वगेरे वगेरे.

सगळी कर्मे केवळ शरीर भावावर न राहता कर्मतन्मयतेने करता आली, नात्यात अहंकार आड येऊ दिला नाही आणि ‘आपण’पेक्षा ‘मी’ मोठा होऊ दिला नाही तर आयुष्य हलकंफुलकं वाटेल. मीपणाची सीमा पार करून तुमच्या अस्तित्वाला विशाल बनवता आलं तर कितीतरी अकल्पनीय गोष्टी शक्य होतील.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.