शोध स्वतःचा : वातावरणनिर्मितीचं महत्त्व

शोध स्वतःचा : वातावरणनिर्मितीचं महत्त्व
Updated on

आपण कोणतेही काम करताना प्रामुख्याने तीन गोष्टींचा विचार करतो. एक म्हणजे ‘काय’ करायचंय (what), दुसरं ‘कसं’ करायचं (how) आणि तिसरं त्यातून ‘काय मिळणार’ (result). आपण केलेलं कुठलंही काम उत्तम प्रकारेही होऊ शकतं किंवा कसंबसंही. कर्म उत्तमप्रकारे होण्यासाठी आणि उत्तम रिझल्ट मिळवण्यासाठी आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे ‘योग्य वातावरण निर्मिती’. मात्र, आपण बहुतेक वेळा फळाच्या अपेक्षेत आणि घाईत तेच कर्म आणखीही चांगल्याप्रकारे होऊ शकतं याचा विचारच करत नाही.

एकाग्रतेचं महत्त्व
समजा तुम्हाला एक लिंबाचं झाड लावायचं आहे, तर झाड लावलं आणि त्याला लिंबू लागले असं होत नाही. त्या झाडाला लागणारा विशिष्ट प्रमाणात सूर्यप्रकाश, पाणी किती घालावे, खत, मातीचा पीएच हे सर्व त्याला लिंबू लागण्याकरिता असलेले contributing factors आहेत. म्हणजेच योग्य वातावरण दिल्यास बीजातील potential maximum utilize होईल. नाहीतर झाड मोठे होईल, पण फळ हवं तसं मिळणार नाही. अभ्यास करताना किंवा कोणतीही नवीन गोष्ट शिकताना त्याला पूरक वातावरण गरजेचे आहे. घरात भांडणं व अशांतता असेल किंवा कायम टीव्ही चालू असेल आणि माणसांची वर्दळ असेल तर अभ्यासात व्यत्यय निर्माण होईल. गेले अनेक महिने ऑनलाइन शिक्षण चालू आहे. मी अनेक मुला-मुलींशी बोलले आणि सर्वांच एकच म्हणणं आहे की ऑनलाइन वर्ग नको, शाळा-कॉलेज हवं. योग्य व सकारात्मक वातावरणाचा आपल्या एकाग्रतेत, विषय समजण्यात आणि विषयाची गोडी निर्माण होण्यात खूप मोठा वाटा आहे. आपल्याला लहानपणापासून घरातील मोठे सांगत आले आहेत, की जेवणापूर्वी, जेवताना किंवा जेवणानंतर लगेच खूप प्रमाणात पाणी पिऊ नये. याचं कारण पचनक्रियेत त्याचा व्यत्यय निर्माण होतो. आपण अन्न ग्रहण करताना पचनकार्य एका विशिष्ट तापमानात आणि हलकसं अ‍ॅसिडिक वातावरणात होत असतं. गॅस लावून पातेलं चढण्यापूर्वी गॅसवर भसकन पाणी ओतल्यासारखं आपल्या पचनक्रियेचं वातावरण आपण भंग करतो. या सृष्टीत पृथ्वीवरच फक्त जीवन आहे, कारण पृथ्वीवरचं सुयोग्य वातावरण. पृथ्वीचं सूर्यापासूनचं अंतर, त्याची रचना, त्यावरील गुरुत्वाकर्षण, पृथ्वीभोवतीचे चुंबकीय क्षेत्र आणि चंद्राचे अस्तित्व या सर्वांमुळं पृथ्वी जीवन जगवण्यासाठी योग्य बनते.

महत्त्व फिटनेसचं
आता येऊया फिटनेसकडं. वजन कमी करणं किंवा एकूणच तंदुरुस्तीसाठी सामान्यतः व्यायाम करा इतकच पाहिलं जातं. पण, उत्तम आरोग्यासाठी आणि आपल्या शरीराच्या संतुलनासाठी अनेक घटक कारणीभूत असतात. आहार, व्यायाम, झोप, योग्य जीवनशैली, मानसिक स्वास्थ्य, ध्येयपूर्ण आयुष्य जगणे, संतुलित नाती, आचारसंहिता, सकारात्मकता, आनंद, समाधान हे सगळे लाईफ इसेनशियल्स आहेत. यातील एक नसल्यास असंतुलन  जाणवायला लागतं. ग्रीक तत्त्वज्ञ अ‍ॅरिस्टॉटलने म्हटले आहे “The whole is greater than the sum of its parts”. हा जो होलसमनेस आहे, तो येतो अनुकूलतेतून-पूरकतेतून !

वातावरण निर्मितीच्या उपयुक्ततेची सर्वांत जास्त प्रचिती येते ती ध्यानात. आज-काल ‘I meditate’ म्हणणं ही फॅशन झाली आहे. पण ध्यानाला बसल्यावर समजतं, आपण स्वतःशी किती गप्पा मारू शकतो. ध्यानात पूरक असं बाह्य व आतील वातावरण निर्माण केल्यास आतील चंचलता आणि बाह्य व्यत्यय या दोन्हींचे प्रमाण कमी होते. मागील वर्षी ध्यान व त्यास पूरक घटकांवर एक संपूर्ण लेख मी लिहिला होता.

तेव्हा मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपण हा वरील दृष्टिकोन ठेवून सर्वांगीण जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. नववर्षात हा पण एक संकल्प का नसावा...

(लेखिका योगऊर्जा या संस्थेच्या  संस्थापिका आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.