मरणोत्तर करा संकल्प, अनमोल डोळे दानाचा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Updated on

आपल्या संस्कृतीत स्वार्थत्याग करून गरजूंना केलेले दान सर्वश्रेष्ठ मानले जाते. मात्र, एक दान असंही आहे, जे मृत्यूनंतर करता येतं. होय, नेत्रदान! वर्षाकाठी राज्यात 35 हजार नेत्ररोपणांची गरज असताना, नेत्रदानाच्या अल्प प्रमाणामुळे होतात अवघ्या 12 हजार शस्त्रक्रिया! दरवर्षी त्यात सुमारे तीन लाख अंधांची भर पडते. जागतिक दृष्टिदानदिनाचे निमित्त साधून नेत्रदान हे संपूर्ण जगातून व्हावे आणि एकही अंध नेत्रहीन राहू नये, हा त्यामागचा उद्देश.

आज जगात अंध लोकांची संख्या खूप आहे. जर प्रत्येकाने मृत्यूनंतर डोळे दान केले, तर एकही अंध नेत्राशिवाय राहणार नाही. डोळ्यांचे महत्त्व हे अंधांनाच माहीत. डोळे नसल्याने समाजात होणारी अवहेलना, दुसऱ्यावर अवलंबून राहणे, जगातील सृष्टीसौंदर्यास मुकणे, हे त्यांच्या नशिबी येते. त्यामुळे प्रत्येकाने या दिनाचे महत्त्व समजून घ्यावे. वयाच्या आठ ते दहा वर्षांपर्यंतच्या कोणत्याही वयाचे स्त्री व पुरुष चष्मा असला तरी किंवा डोळ्यांचे ऑपरेशन झालेले असले तरी नेत्रदानाचा संकल्प करू शकतात. फक्त त्या व्यक्तीला एड्‌स, रेबीज, कॅन्सर आदींसारखे आजार नसावेत. म्हणून प्रत्येकाने 10 जून या दिनाचे महत्त्व लक्षात घेऊन हे अनमोल डोळे नष्ट न करता "मरावे परी नेत्ररूपी उरावे' या म्हणीप्रमाणे नेत्रदानाचा संकल्प करावा.
आपल्या प्रत्येकाच्या मनात येत असेल 10 जून हाच दिवस का? तर अंधांना दृष्टिदान करणारे महान नेत्रशल्यचिकित्सक डॉ. भालचंद्र यांच्या स्मृतीनिमित्त 10 जून हा दृष्टिदानदिन म्हणून पाळण्यात येतो. अत्यंत कठीण व प्रतिकूल परिस्थितीत डॉ. भालचंद्र यांनी एक लाख शस्त्रक्रिया करून दृष्टिदान केले. दृष्टिदानाच्या त्यांच्या या महान कार्याचा हा "गौरव' म्हणून पाळला जातो. योगायोग असा की, डॉ. भालचंद्र यांचा जन्मदिन व मृत्यूदिन 10 जून आहे.

"रुग्ण सेवा हीच खरी सेवा' हे ब्रीद खरे ठरवत नेत्रचिकित्सा क्षेत्रात त्यांनी आदर्श घालून दिला. समाजाचा सहभाग मिळवत त्यांनी दारिद्य्र, अंधश्रद्धा यांच्या पगड्याखाली असलेल्या ग्रामीण समाजाला दृष्टी लाभण्यासाठी गावोगावी नेत्रशिबिरे भरवत दृष्टिदान केले. आजही समाजात अंधत्वाचे प्रमाण मोठे असून डॉ. भालचंद्र यांच्यासारख्या मानवतावादी नेत्रशल्यचिकित्सकांची महाराष्ट्राला गरज आहे. डॉ. भालचंद्र यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून त्यांचे दृष्टिदानाचे कार्य पुढे सुरू ठेवण्यासाठी प्रत्येक नेत्र शल्यचिकित्सक प्रयत्नशील आहेत. दरवर्षी हजारो शस्त्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील नेत्ररोग विभागात होतात. बदलत्या काळानुसार अलीकडे "फेको'सारख्या अत्याधुनिक यंत्राद्वारे नेत्रशस्त्रक्रिया होत आहेत. राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ही सोय उपलब्ध आहे. मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम हा विचार न करता बुबूळरोपण, तिरळेपणा, काचबिंदू या अंधत्वाच्या कारणांवरही राज्यातील नेत्ररोग विभागाचे लक्ष आहे. मेडिकलमधील बालवयातील अंधत्व, नेत्रपेढी व क्षेत्रीय नेत्रसंस्थेचा दर्जा मिळविण्यासाठी मेडिकलच्या नेत्ररोग विभाग प्रयत्नशील आहेत.

नेत्रदानाविषयी समाजाचे डोळे मिटलेलेच

याविषयी मेडिकलचे नेत्ररोग विभागप्रमुख डॉ. अशोक मदान म्हणाले, एखाद्याचा जीव वाचविणारे रक्तदान, गरजूंसाठी किडनीदान, मरणोत्तर नेत्रदान आणि वैद्यकीय संशोधनासाठी मरणोत्तर देहदान. मात्र, दुर्दैवाने देहदान व नेत्रदानाविषयी अद्याप अपेक्षित व्यापक जनजागृती झालेली नाही. जगात सुमारे दहा कोटी अंध व्यक्तींपैकी भारतात सुमारे अडीच कोटी अंध आहेत. त्यापैकी 70 टक्के रुग्णांना नेत्ररोपण शस्त्रक्रियेद्वारे पुन्हा दृष्टी प्राप्त होऊ शकते. गरज आहे ती फक्त दृढ संकल्पाची. कुपोषण, "अ' जीवनसत्त्वाचा अभाव, डोळ्यांत कचरा, फटाक्‍याचा स्फोट अथवा रसायन गेल्याने, तसेच गोवर, कांजिण्या किंवा अन्य कारणांनी लहान वयात अथवा तारुण्यात दृष्टी गमावलेल्यांची संख्या 25 लाखांपर्यंत आहे.

बुबुळावरील पांढऱ्या झालेल्या आवरणाची शस्त्रक्रिया करून त्या जागी निरोगी पारदर्शक बुबूळ बसविले की, गेलेली दृष्टी बऱ्याच अंशी परत लाभू शकते. 1923 मध्ये अमेरिकेत नेत्ररोपणाची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाली. कोणत्याही व्यक्तीने स्वेच्छेने मृत्यूनंतर आपले डोळे काढून परिचित-अपरिचित व्यक्तीला दृष्टी मिळावी म्हणून दिलेली परवानगी म्हणजे नेत्रदान. कोणत्याही जाती, धर्म, वंश, वर्णाची स्त्री अथवा पुरुष मरणानंतर नेत्रदान करू शकतो. एक वर्षाच्या बालकापासून 80 वर्षे वयाच्या ज्येष्ठ नागरिकापर्यंत कुणीही नेत्रदान करू शकतो. दरवर्षी 35 हजार अंधांना दृष्टीची गरज असताना अवघ्या दहा ते बारा हजार व्यक्ती नेत्रदान करतात. हे प्रमाण चिंताजनक आहे. आपण मनात आणले तर नेत्रदान करून दोन व्यक्तींचे जीवन प्रकाशमय करू शकतो. कारण एका व्यक्तीच्या डोळ्यांचा लाभ दोन अंधांना करून दिला जातो. चला तर मग करू या संकल्प नेत्रदानाचा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.