मला कोरोना झाला तर ?

corona
corona
Updated on

कोरोना... कोरोना... कोरोना...सध्या सर्वत्र याच विषयाची चर्चा आहे. आपल्या सर्वांच्या आयुष्यात या जिवाणूमुळे उलथापालथ झाली आहे. टीव्ही, वर्तमानपत्र, इतर सोशल मीडियावर कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाबद्दल समज-गैरसमजावर विविध प्रकारची माहिती पसरत आहे. त्यामुळे समाजात सध्या कोरोनामुळे घाबरुन दडपणाखाली जगणारे व कोरोनाला साधा "फ्लू' समजून बिनधास्त जगणारे असे दोन गट दिसून येत आहेत. दोन्ही अतिरेकी विचार घातकच असल्याने योग्य काळजी घेवून आपल्या दैनंदीन जीवन जगायचे आहे, हे ध्यानात ठेवावे लागेल.

धारावी ते बॉलीवूड क ोणीही याच्या तडाख्यातून सुटलेले नाही. सांगितल्याप्रमाणे आपण सगळी काळजी घेत आहोत म्हणून सुरक्षित आणि कोरोनापासून लांब आहोत, असे आतापर्यंत वाटायचे. पण जेव्हा मागच्या आठवड्यात बरीच डॉक्‍टर मंडळी, नर्सेस, सफाई कर्मचारी, पोलिस कोव्हिड पॉझिटिव्ह येऊ लागले आणि अचानक जाणवले की आपण सर्वच कोरोनाच्या विळख्यात आहोत. आता कोरोना दूर नाही. तो कोणतीही सोसायटी, कोणत्याही वस्तीत कोणाचेही दार ठोठावू शकतो. मनात विचारांचे काहूर माजले आणि जाणवले की नकारात्मक विचारांचे सावट जनमानसावर पडते आहे.

मला कोरोना झाला तर... असं मनात येताच, क्वारंटाईन, आयसोलेशन, हॉस्पिटलमध्ये भरती, न्युमोनिया, ऑक्‍सिजन, व्हेंटीलेटर, महागडी औषधे, मृत्यूचे भय इत्यादी शब्द डोळ्यासमोर फेर धरू लागतात. कोरोनाच्या या भयामुळे माणूस अस्वस्थ होऊ लागतो. याच वेळी काही सकारात्मक गोष्टीही समाजात घडत आहे. त्या मला प्रामुख्याने समोर आणाव्याशा वाटतात. सध्या कोव्हिड पॉझिटिव्ह डॉक्‍टर्स व इतरही पेशंट मंडळीच्या तब्येतीचा आणि आजाराच्या तीव्रतेचा आढावा घेतल्यास असे लक्षात आले की योग्य वेळी, योग्य ट्रीटमेंट घेतल्यास आपण या आजारावर मात करू शकतो. कोव्हिड रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर खचून न जाता मनावर ताबा ठेऊन सत्य स्विकारायला पाहीजे. दवाखान्यात भर्ती होऊन डॉक्‍टरांशी चर्चा करून त्वरित उपाययोजना सुरू करायला पाहिजे. योग्य औषध द्या. प्राणायाम करा. प्रतिकारशक्ती वाढवणारा आहार घ्या. श्‍वसनाचे व्यायाम करा. सध्याची चांगली बातमी म्हणजे नवीन औषधोपचार पद्धतीचा फायदा दिसून येतो आहे. दुसरीकडे लसीचे संशोधन शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचले आहे.

या सर्व सकारात्मक गोष्टींमुळे व आजारातून बरे होणाऱ्या पेशंटच्या अनुभवामधून एक विश्‍वास निर्माण झाला आहे. मृत्यूचे भय कमी होत आहे. त्यामुळे उद्या जर कोरोना झाला तर कोणीही घाबरू नये. हिंमतीने सामोरे गेलो तर कोरोनाला हरविणे कठीण नाही, असा विश्‍वास मनी बाळगा. यावेळी आणखी एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की, अशा या खडतर प्रवासात कुटुंबीय व मित्र मंडळीची साथ महत्त्वाची असते. पेशंटचे मनोबल वाढवण्यासाठी, आप्तस्वकीय व मित्र मंडळीचा मोठा सहभाग असतो, हे नुकत्याच आलेल्या अनुभवांमधून नव्याने जाणवले.

अमरावतीच्या एका सुप्रसिद्ध फिजिशियन डॉक्‍टरचा अनुभव येथे नमूद करावासा वाटतो. डॉक्‍टर कोव्हिड पॉझिटिव्ह झाले व नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये त्यांना भरती करण्यात आले. येथे भरती झाल्यावर जोपर्यंत तब्येत ठीक होती तोपर्यंत वॉर्डात रेसिडेंट डॉक्‍टरसोबत राउंड घेत होते. त्यांना मदत करत होते. इतर पेशंटची देखभाल करीत होते. पेशंटचे मनोबल उंचावण्यासाठी त्यांचे समुपदेशन (कॉन्सेलिंग) करत होते. पुढे त्यांचा आजार वाढला. ऑक्‍सिजनची कमतरता, श्‍वसनाचा त्रास यामुळे तब्येत गंभीर झाली. तरीही खासगी रुग्णालयात जाण्यास त्यांनी नकार दिला. मेडिकलमध्ये राहूनच उपचार घेण्याचा निर्धार पक्का ठेवला. मेडिकलचे डॉक्‍टर, नर्स व इतर कर्मचाऱ्यांनी केलेली सेवा, त्यांची स्वतःची सकारात्मकता व देवाची कृपा यामुळे ते कोरोना विरुद्धच्या लढ्यात विजयी झाले. ही लढाई कठीण होती, पण अशक्‍य नव्हती. त्यामुळे कठोर प्रयत्नांना यश मिळाले. पण गोष्ट इथेच संपत नाही. डॉक्‍टर बरे झाल्यानंतर देवाने आपल्याला या कोरोनापीडित रुग्णसेवेसाठीच नव्याने जीवनदान मिळाले आहे असा विचार करून पुढे बरेच दिवस ते वॉर्डात रुग्णसेवा देण्यासाठी थांबले. सलाम या कोव्हिड योद्‌ध्याला. संपूर्ण आजार व नंतरच्या काळातील आध्यात्मिक आत्मबळ व तीव्र इच्छाशक्तीमुळे त्यांनी वार्डात काम करणाऱ्या डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवले. अशा चांगल्या घटना, प्रसंग बऱ्याच लोकांनी अनुभवले असतील. ते लक्षात ठेवावे व इतरांना सांगावे. या सर्वांमधून सकारात्मकता आपल्या आजुबाजूला जाणवते आहे. मग आपल्याला कोरोना झाला तर घाबरायचे कशाला. भारतातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर इतर देशांच्या तुलनेत बराच कमी आहे. औषधांना चांगला प्रतिसाद आहे. आपली प्रतिकारशक्ती चांगली आहे. याचा अर्थ असा मुळीच नाही की आपण सर्व निर्बंध सोडून बिनधास्तपणे वागावे.

कोरोना होऊ नये म्हणून घेण्याची सर्व काळजी आपण घ्यायलाच हवी ! सोशल डिस्टंसिंग, मास्क व सॅनिटायझरचा वापर, वारंवार साबणाने हात धुणे, अनावश्‍यक फिरणे, गर्दीची ठिकाणे टाळणे इत्यादी नियम आपल्याला पुढे अनेक दिवस पाळायचे आहेतच. तरीही कोरोना झाला तर खचून जाता कामा नये. परिस्थिती कठिण आहे पण ती आपल्याला उद्धवस्त करायला येत नसते तर ती आपल्यातील सुप्त क्षमता आणि ताकदीची ओळख करून देण्यासाठी येत असते, हे आठवावे. आपल्या आत्मबळावर, कुटुंबियांच्या सहकार्याने, मित्रमंडळींच्या शुभेच्छा आणि आशीर्वादाने, परिस्थितीला आपल्यातील सामर्थ्यांची जाणीव करून देऊ या. कारण आपण एकटे नाही. आपण सर्व एकत्र या अंधाऱ्या खडतर प्रवासात, एकमेकांच्या आधाराने मार्ग शोधतो आहोत. त्यामुळे एक दिवस निरामय पहाट नक्की होणार...तोपर्यंत फक्त मनाला सांगायचे आहे...सर्व ठीक आहे आणि मी जिंकणार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.