काय आहे वैवाहिक सौख्याचे पाचवे सूत्र?

Happy-Married-Life
Happy-Married-Life
Updated on

आतापर्यंत आपण वैवाहिक सौख्याच्या चार सूत्रांबद्दल चर्चा केलेली आहे. आता शेवटच्या तीन सवयी म्हणजेच स्वास्थ्य(आरोग्य), स्पर्श आणि संभोग यावरील चर्चा बाकी आहे. आज आपण वैवाहिक सौख्याचे पाचवे सूत्र "स्वास्थ्य' या विषयावर चर्चा करणार आहोत.

जेव्हा आपण आरोग्य असं म्हणतो तेव्हा केवळ शारीरिक आरोग्य अभिप्रेत नसते तर त्यासोबत मानसिक स्वास्थ्याची चर्चा होणेदेखील आवश्‍यक असते. हे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आरोग्य प्रशिक्षण आवश्‍यक आहे. मात्र, आपल्या समाजात आरोग्यासंबंधाची चर्चा अथवा त्याच्या प्रशिक्षणाची सुरुवात चाळिशीनंतर अथवा कुठल्या विकारांनी ग्रासल्यानंतरच केली पाहिजे, असा एक समज आहे. मात्र, याची सुरुवात फार आधीच व्हायला हवी. मला जेव्हा कोणी विचारते की, निरामय लैंगिक आरोग्य (साउंड सेक्‍सुअल हेल्थ) म्हणजे काय तेव्हा माझं उत्तर असतं की, साउंड सोल इन ए साउंड बॉडी इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर साउंड सेक्‍सुअल हेल्थ. आत्मा आणि मन हे जरी महत्त्वाचं असलं तरी शरीर हे त्याचे वाहन आहे. त्यामुळे मन कितीही चांगलं असलं आणि शरीर स्वस्थ नसेल तर सेक्‍स चांगला होणार नाही. त्याच प्रकारे शरीर कितीही चांगलं असलं आणि मन मात्र स्वस्थ नसेल तरीदेखील सेक्‍स चांगला होणार नाही. त्यामुळे सेक्‍समध्ये शारीरिक व मानसिक आरोग्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

शरीरस्वास्थ्यासंबंधीचं बोलायचं झालं तर शरीर अनेक व्याधींनी ग्रस्त असेल तरीदेखील सेक्‍स चांगला होणार नाही. अशा वेळी आरोग्याचे प्रशिक्षण प्रत्येकासाठी अत्यावश्‍यक आहे. आरोग्याच्या प्रशिक्षणात आहार आणि व्यायाम या दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. मध्यम वयात म्हणजे चाळिशीच्या आसपास मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयविकार, लठ्ठपणा, मेटॅबॉलिक सिन्ड्रॉम यासारखे विकार उद्भवतात. हे सगळे आजार मूलतः असंतुलित जीवनशैलीमुळे उद्भवतात असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. त्यामुळे जीवनशैली संतुलित ठेवून ते रोग कसे कमी होतील अथवा ते होणारच नाही याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. दाम्पत्य जीवनाची सुरुवात होतानाच चांगल्या सवयी लावून घेणे गरजेचे आहे. आपल्या आहारात प्रोटिन्स (प्रथिने) जास्त प्रमाणात असावी आणि स्निग्ध व पिष्टमय पदार्थ कमी असावे, याचे भान ठेवणे आवश्‍यक आहे.

लैंगिक समस्या या मधुमेह, उच्चरक्तदाब, थायरॉईड ग्रंथींचे विकार, लठ्ठपणा आदींनी ग्रासलेल्या व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात. त्यांच्यावर वेळीच आळा घातला तर लैंगिक संबंध सुदृढ होतील आणि लैंगिक संबंध सुदृढ असेल तर वैवाहिक सौख्य चांगले राहील. त्यामुळे वैवाहिक संबंध सुदृढ ठेवण्यासाठी निरोगी असणे फार महत्त्वाचे आहे. निरोगी राहण्यासाठी पती-पत्नीने व्यायाम करणे आवश्‍यक आहे. मागे आपण "समय' या सूत्रावर चर्चा करताना व्यायामाचे महत्त्व प्रतिपादित केले होते. त्यात आपण असे म्हटले होते की, जोडीदारासोबत व्यायामासाठी वेळ घालविला तर फिटनेस पण मिळतो आणि सकारात्मक वेळदेखील मिळतो. कोणते व्यायाम करावे यासंबंधी मतभिन्नता असेलही. जिमला जाण्यापासून ते सकाळी फिरण्यापर्यंत व योगासने यापैकी कुठलेही व्यायाम प्रकार आरोग्यासाठी चांगले असतात. मात्र, यात नियमितता हवी.
व्यायामामधला भारतातील प्राचीन लोकप्रिय असा व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार, यात शरीराच्या जवळपास प्रत्येक स्नायूचा व्यायाम होतो. काही लैंगिक शास्त्रज्ञांचे तर असेही म्हणणे आहे की, सूर्यनमस्कारामुळे लैंगिक संप्रेरकांचा स्त्रावसुद्धा जास्त प्रमाणात शरीरात होतो व त्यामुळे सेक्‍युअल फिटनेसही चांगला राहतो. सूर्यनमस्कार हा घरच्या घरी व फार कमी जागेत करता येण्यासारखा असल्यामुळे प्रत्येकाने सकाळी उठल्यानंतर कमीत कमी बारा सूर्यनमस्कार घालण्याची सवय लावावी. पती-पत्नींनी शारीरिक व्यायाम सोबत केल्यामुळे मुलांवरदेखील आरोग्यविषयक चांगले संस्कार होतात व निरोगी जीवनशैली आत्मसात करण्यामुळे समस्त समाजाला फायदा होऊ शकतो. त्याचप्रमाणे कोणाला एखाद्या क्रीडा प्रकारात रुची असल्यास तो खेळ खेळणेसुद्धा शरीराला निरोगी ठेवू शकतो. लठ्ठपणा म्हणजेच पोटावरचा घेर हा पूर्वी खात्यापित्या घराची निशाणी समजल्या जायचे. मात्र, हे चूक आहे. वजन जास्त असले तरी पोटाचा घेर कमीत कमी असावा अथवा मुळीच नसावा. याचे पथ्य तरुणपणापासूनच पाळणे आवश्‍यक आहे. सायकलिंग हासुद्धा एक चांगला व प्रभावी व्यायाम आहे.

हे सर्व लक्षात घेता निरामय आरोग्य हे भावी वैवाहिक सौख्यासाठी फार आवश्‍यक आहे, हे लक्षात ठेवून पती-पत्नींनी एकमेकांना नियमित व्यायाम व संतुलित आहार घेण्यासाठी प्रेरित केले पाहिजे. जीवनशैलीमुळे या बदलांमुळे भावी जीवनात जे रोग लैंगिक संबंधांमध्ये अडथळा ठरू शकतील, त्यांना आळा बसू शकेल आणि वैवाहिक सौख्य वृद्धिंगत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.