हा आजार कधीही सुरू होऊ शकतो पण बऱ्याचदा पौगांडावस्थेच्या मध्यावर किंवा विशित सुरू होतो.
-श्रुतिका कोतकुंडे, सजग स्वास्थ्य क्लिनिक, चिपळूण
sajagclinic@gmail.com
सतरा वर्षाच्या अवधूतची आई सांगत होती, लॉकडाउननंतर जेव्हा अवधूत जिमला जाऊ लागला तेव्हा त्याला वाटू लागले की लोकं त्याच्या मागे त्याच्या संदर्भात बोलत आहेत. त्याने जिममधल्या मुलांशी भांडण काढून राडा केला. अवधूतच्या आई-वडिलांना जिममध्ये पोलिसांनी बोलावून घेतले होते आणि समज देऊन सोडून दिले. त्या आधी थोडे दिवस अवधूतच्या आईने त्याच्या मनःस्थितीत थोडे बदल पाहिले होते. तो एकटा राहू लागला होता. जास्त कोणाच्यात मिसळत नव्हता व जेवणही तो त्याच्या खोलीत करीत होता. फॅमिली डॉक्टरच्या (Family Doctor) सल्ल्याने त्याला कशाबशा समुपदेशनासाठी घेऊन आल्या.
मुलांमध्ये तीव्र मानसिक त्रास तसे दुर्मिळ असतात. परंतु जेव्हा ते उद्भवतात तेव्हा बऱ्याचदा त्यांची सुरुवात कुमार वयात होते. मुख्यतः बायपोलर डिसऑर्डर किंवा द्विदध्रुवीय आजार व स्किझोफ्रेनिया किंवा छिन्नमनसकता हे दोन तीव्र मानसिक आजार कुमारवयात उद्भवू शकतात. तीव्र मानसिक आजारात (Mental illness) रुग्णाला आपण आजारी आहोत हे भान नसते. द्विध्रुवीय आजारात खूप आनंद व उन्माद वाटतो किंवा त्याच्या विपरीत खूप उदास व नैराश्य वाटते. क्वचित रुग्णाला फक्त आनंद किंवा चिडचिड अनुभवायला येते. हा आजार बऱ्याचदा पौगांडावस्थेच्या मध्यावर सुरू होतो. शक्यतो आजार सुरू होण्याआधी पालकांना त्याच्या मनस्थितीतले चढ-उतार इतर मुलांपेक्षा जास्त आढळून येतात. बऱ्याचदा एखाद्या तणावपूर्ण प्रसंग जसे की रिलेशनशिप ब्रेकअप किंवा शोक, वियोग या आजाराच्या सुरुवातीचे निमित्त बनते.
उन्मादाचे लक्षण म्हणजे रुग्ण खूप खूश राहू लागतो, कारणाशिवाय चिडचिड करू लागतो. तो स्वतःला खूप ताकदवान, सुंदर, श्रीमंत व खास गुण असलेला समजू लागतो. त्याच्या वागण्यात जलद बोलणे, अति हालचाल, चंचलता, धीर नसणे, खूप पैसे खर्च करणे, कमी झोपणे, अती व्यसन करणे असू शकते. काल्पनिक जगात वावरल्यासारखे त्याला नसलेले आवाज ऐकू येऊ शकतात किंवा नसलेली व्यक्ती दिसू शकते. नैराश्याच्या लक्षणात व्यक्तीला खूप उदास वाटू लागते. शुल्लक कारणांसाठी अपराधी वाटू लागते, झोप कमी होते किंवा जास्त होते, भूक कमी किंवा जास्त होते. उत्साह वाटत नाही, भविष्याबद्दल नाउमेद वाटते व मृत्यूचे तथा आत्महत्येचे विचार डोक्यात येऊ लागतात. हा आजार लाटांमध्ये येतो व जातो. काही आठवडे, महिने राहतो व नंतर बराच काळ काही लक्षणे नसतात.
कधीकधी अनुवंशिकतेमुळे उन्माद व नैराश्य कुटुंबातील इतर व्यक्तीमध्ये असण्याची शक्यता असते. या आजाराचे निदान होणे व प्रभावी उपचार होणे अत्यंत गरजेचे असते अथवा हा आजार मुरतो व उपचाराअभावी आजार आयुष्यभर राहू शकतो व व्यक्तीचे व कुटुंबाचे अतोनात नुकसान होते. निदान व औषधोपचाराबरोबर समुपदेशनही अत्यंत महत्त्वाचे असते कारण रुग्णाला वाटत नसते की तो आजारी आहे. त्यामुळे पालकांची मदत व सहकार्याची अत्यंत गरज असते. पैशाच्या व्यवहारावर देखरेख ठेवावी कारण रुग्ण अति खर्च करण्याची शक्यता असते. रुग्णाला सुरक्षित ठेवणे गरजेचे असते कारण तो जोखमीने गाडी चालवणे तथा हिंसक बनू शकतो. नैराश्यात असतानाही आत्महत्येच्या शक्यतेमुळे देखरेख अत्यंत गरजेची असते. परिवाराचे समुदपदेशन या आजारात गरजेचे असते कारण अंधश्रद्धा, बुवाबाजीमध्ये या सगळ्यांमध्ये अडकण्यापेक्षा रुग्णाला वैद्यकीय उपचार लवकर मिळाले तर तो लवकर पूर्ववत होऊ शकतो.
वरील दिलेल्या उदाहरणातल्या अवधूतचे उदाहरण हे छीन्नमनस्कता किंवा स्किजोफ्रेनिया या आजारात मोडते. अवधूचे जेव्हा निदान झाले तेव्हा कळले की त्याला भास होत होते की त्याच्या पोटात चिप घातली गेली व काही लोकं त्याचे बोलणं टॅप करीत आहेत व त्याला कुठल्याश्या कारस्थानात अडकवण्याचा प्रयत्न करीत आहे. काही दिवस त्याने खाणे-पिणे सोडले होते कारण त्याला वाटायचे की लोक त्याला विष देऊन मारायच्या प्रयत्नात आहेत. बायपोलर सारखेच या आजारात रुग्णाला आपण आजारी आहोत याचे भान नसते व रुग्ण निदान व उपचार स्वीकारत नाही. त्यामुळे निदान व उपचारासाठी कुटुंबाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो. या आजारात वैचारिक समस्या निर्माण होतात.
जसे त्यांना वाटू लागते की, त्यांच्या विचारांमध्ये कोणी बाहेरचे छेडछाड करीत आहे. त्यांना वाटू लागते की आजूबाजूला जे घडत आहे ते, परस्पर त्यांच्याशी निगडित आहे. विविध माध्यमातून त्यांच्याबद्दल माहिती पसरवून त्यांना लक्ष केले जात आहे. त्यांना वाटू शकते त्यांच्या शरीरातील संवेदना बदलत आहेत, शरीरात इतर कोणाचा संचार आहे किंवा त्यांचे शरीरच त्यांचे नाही, बदललेले आहे. त्यांना भावना व्यक्त करणे कठीण होते किंवा भावना शून्य वाटू शकते. रुग्णाला काल्पनिक व्यक्ती दिसणे, काल्पनिक आवाज ऐकू येऊ शकतात व कधीकधी रुग्ण या आवाजांशी संवाद करू लागतो. तसेच आपल्या डोक्यातून रुग्णाला हे आवाज काढून टाकणे शक्य नसते.
हा आजार कधीही सुरू होऊ शकतो पण बऱ्याचदा पौगांडावस्थेच्या मध्यावर किंवा विशित सुरू होतो. शक्यतो हाही आजार लाटांसारखा येतो काही आठवडे किंवा महिने खूप बिघडलेली मनःस्थिती आणि मग नंतर कमी तीव्रता असे याचे स्वरूप असते. बऱ्याचदा त्यांचा स्वभाव एकलकोंडा असतो व त्यांना शक्यतो समाजात मिसळणे कठीण जाते. हा आजार मेंदूमधील काही रासायनिक बदलांमुळे होतो पण क्वचित प्रसंगी तणावपूर्ण प्रसंगानंतर याची सुरूवात होते. तसेच व्यसन केल्यामुळेही याची सुरूवात होऊ शकते. अनुवंशिक कारण असल्यास जवळच्या कुटुंबात एखाद्या कोणाला आजार असण्याची शक्यता असते.
निदान पक्के झाल्यावर औषधोपचार त्वरित सुरू करण्याची गरज असते. कुमार वय असल्यामुळे औषधोपचार हळूहळू वाढवत पालकांना विश्वासात घेऊन केली जातात. रुग्णावर देखरेख ठेवणे गरजेचे असते कारण रुग्ण विचित्र वागू शकतो, प्रसंगी हिंसक होऊ शकतो. हा आजार नियंत्रणात आणता येतो पण पूर्ण बरा होत नसतो. आयुष्यभर औषधांची गरज भासू शकते. मनोविकारतज्ज्ञ रुग्णाला कुठल्या गोष्टीचा त्रास होतोय ते समजून त्यावर उपचार करतात. त्यांच्या विचारांना आव्हान न देता त्यांना या अनुभवांचे कारण शोधण्यास प्रवृत्त केले जाते. रुग्णांसोबत परिवारालाही आजाराबद्दल अवगत करून त्यांना उपचारांमध्ये संम्मीलीत केले जाते. जेणेकरून आजार लवकर नियंत्रणात येतो. कधी कधी परिवारालाही आधार देण्याची गरज भासते कारण हा आजार विचित्र भासल्यामुळे कुटुंबावर पण दडपण येण्याची शक्यता असते. योग्य उपचार व समुपदेशनामुळे रुग्ण बरा होतो. योग्य उपचार चालू ठेवत रुग्ण अभ्यास, काम करून पुढे संसार व नोकरीही करू शकतो व आपले आयुष्य चांगल्या रीतीने घालवू शकतो. अवधूतचे निदान व उपचार झाल्यावर तो पुन्हा अभ्यास व छंद जोपासू लागला आहे व नियमित औषधं व मनःशांती चे उपाय घेत आहे...
(लेखिका मनोविकार व मानसोपचारतज्ज्ञ आहेत)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.