Health Tips : साथीच्या रोगाप्रमाणे वाढतोय हाडांचा ठिसुळपणा; दगडासारखी हाडं होताहेत काचांसारखी नाजूक

भारतामध्येदेखील (India) हाडांची ठिसुळता हा आजार मोठ्या प्रमाणावर आढळतो.
Osteoporosis Symptoms
Osteoporosis Symptomsesakal
Updated on
Summary

जगभर लोकांची वयोमर्यादा वाढल्यामुळे २०५० पर्यंत कंबरेचं हाड मोडलेल्या ५० टक्के ज्‍येष्ठ नागरिकांची संख्या एकट्या आशिया खंडात असेल.

- डॉ. नितीन चव्हाण, अस्थिरोगतज्ञ, रत्नागिरी (nitin २२२५५@gmail.com)

साध्या सोप्या भाषेत ऑस्टिओ म्हणजे हाड व ऑस्टिओपोरोसिस म्हणजे ठिसूळ झालेले हाड (Bones). वय वाढेल तसे हाडांच्या पातळ होत जाण्याला ऑस्टिओपोरोसिस (Osteoporosis Symptoms) म्हटले जाते. ऑस्टिओपोरोसिस हा तसा सर्वसामान्यपणे कोणालाही होणारा आजार आहे. योग्यवेळी उपचार केले नाहीत तर आजारापासून व्यक्तीला मुक्ती मिळत नाही. जगभर लोकांची वयोमर्यादा वाढल्यामुळे २०५० पर्यंत कंबरेचं हाड मोडलेल्या ५० टक्के ज्‍येष्ठ नागरिकांची संख्या एकट्या आशिया खंडात असेल. याचाच अर्थ अस्थिक्षय हा साथीच्या रोगाप्रमाणे अतिशय झपाट्याने वाढत आहे.

भारतामध्येदेखील (India) हाडांची ठिसुळता हा आजार मोठ्या प्रमाणावर आढळतो. अस्थिक्षय या आजारामध्ये जसजसं वय वाढत जातं तसतसं हाडांचा क्षय होत जातो. यामध्ये हाडे इतकी कमकुवत, नाजूक बनतात की, एक हलकासा धक्काही त्यांना तोडू शकतो. अगदी लहानशा मुरगळ्यामुळे किंवा जड वस्तू उचलल्यामुळे देखील हे फ्रॅक्चर होऊ शकते. बालवयातच आपल्या हाडांची वाढ होते तर तरुणपणात हाडांची घनता वाढून ती कणखर बनतात व वय जसजसे वाढत जाते तसे शरीराची झीज होत जाते. तसेच आपल्या हाडांचेही असते.

Osteoporosis Symptoms
Hemorrhoids Symptoms : मूळव्याधीतही होमिओपॅथीचा सम्यक विचार; 'या' लोकांना ही व्याधी उद्भवण्याची शक्यता जास्त!

आपण योग्य ती काळजी न घेतल्यास वयाच्या तिशीनंतर हळूहळू प्रामुख्याने हाडांची घनता कमी होण्याचे प्रमाण अधिक वाढतं आणि ऑस्टिओपोरोसिसचा विकार उद्‍भवतो. उतारवयातील दुखणं म्हणून याकडे दुर्लक्ष झालं आहे; परंतु अलीकडे वयाच्या ३५व्या वर्षापासूनच या आजाराची लक्षणे दिसायला लागली आहेत. याला सायलेंट डिसिज असं म्हटलं जातं. कारण, या आजाराची कुठलीही लक्षणे दिसत नाहीत. या आजारामध्ये हाडाचं वजन, घनता व आकार तिन्ही कमी होते. परिणामी, ज्येष्ठ नागरिकांची उंची व ताठ उभं राहण्याची नैसर्गिक शक्ती कमी होत जाते. बरेच वेळा कुठल्याही कारणांनी पडल्यास, शरीराच्या ज्या भागावर गृहस्थ पडतो त्या ठिकाणचे हाड मोडते. यालाच फ्रजिलिटी फ्रॅक्चर म्हणतात.

म्हणजेच दगडासारखी हाडं काचांसारखी नाजूक होतात. हाड मोडेपर्यंत कुणीही या आजाराकडे गांभीर्याने पाहत नाही. शरीरातील सर्व हाडांना अस्थिक्षयाची बाधा अधिक जाणवते. अस्थिक्षयामुळे तसं पाहिलं तर वेदना होत नाहीत; परंतु एकदा हाड मोडलं तर असह्य वेदना, कायमचं अपंगत्व आणि काहीवेळा मृत्यूही होऊ शकतो. स्त्रियांमध्ये तर याचा परिणाम अतिशय जास्त प्रमाणात पाहायला मिळत आहे. हाडे मजबूत असल्यास त्याची घनता चांगली असते. हाडे कमकुवत असल्याचे कारण हाडे पोकळ बनतात व त्यामुळे मुख्यत: मनगटातील हाड फ्रॅक्चर होणे, खुब्याचे हाड तुटणे, साधे शिंकल्याने अथवा खोकल्याने छातीच्या पिंजऱ्यातील ''रिबबोन'' चे हाड फ्रॅक्चर होणे या गोष्टी हाडांच्या ठिसुळतेमुळे घडून येतात.

Osteoporosis Symptoms
Chiplun Datta Temple : शांत...शांत...संवादासाठी श्रीक्षेत्र अवधूतवन!

फ्रॅक्चर झाल्यास त्यामुळे असणाऱ्या वेदना हे अनेकदा या विकाराचे लक्षण असते. त्यानंतरच्या तपासणीअंती आपणास ऑस्टिओपोरोसिस असल्याचे आढळून येते. स्त्रियांमध्ये मासिक पाळी बंद झाल्यानंतर रजोनिवृत्तीच्या काळात "इस्ट्रोजेन" या आंतरस्त्रावी संप्रेरकाच्या कमरतेमुळे हळूहळू स्त्रियांमधील हाडे कमकुवत होत असतात. याचबरोबर कृश व्यक्ती सातत्याने औषधांच्या स्वरूपात अधिक प्रमाणात घेतली जाणारी स्टेरॉइडसारखी औषधे, अतिप्रमाणातील धुम्रपान व मद्यपान याबरोबर कौटुंबिक इतिहास ऑस्टिओपोरोसिसची कारणे आहेत. ‘

हाडांची ठिसुळता’ तपासण्यासाठी ‘बीएमडी ’ (बोन मिनरल डेन्सिटी) ही तपासणी करतात अथवा डेक्सा स्कॅन तपासणीद्वारेही हाडांची ठिसूळता पाहता येते. फ्रॅक्चर झाल्यास अस्थिरोगतज्ञांकडून तपासणी करून एक्सरे किंवा सीटी स्कॅन केले जातात. विविध भागातील हाडांच्या फ्रॅक्चरसाठी गरजेनुसार उपचारपद्धती अवलंबल्या जातात. शस्त्रक्रिया करताना काही वेळेस बोन सिमेंटचा वापर केला जातो. ज्यामुळे हाड घट्ट जुळण्यास मदत होते. हाडांचा ठिसुळपणा हा मुख्यत्वेकरून नैसर्गिकरित्या होणारा शारीरिक बदलाचा भाग असल्याने व पडल्यामुळे फ्रॅक्चर होण्याची शक्यता विशेषतः वृद्धांना जास्त असल्याने हालचाली करताना काळजी घेणे महत्त्‍वाचे आहे. अरुंद जागी किंवा पायऱ्यांवरून चढ-उतार करताना जास्त काळजी घ्यावी.

तोल सावरण्यासाठी काठी किंवा वॉकर असल्यास उत्तम तसेच टॉयलेटमध्ये आधारासाठी हँडलचा वापर करणे आवश्यक आहे. ऑस्टिओपोरोसिसचा उपचार हा वृद्धिंगत करणारा, बळकटी आणणारा व फ्रॅक्चरला प्रतिबंध करणाऱ्या औषधोपचारांवर असतो. आपल्या डेक्सा स्कॅनच्या तपासणीनुसार ऑस्टिओपोरोसिसचा धोका असल्यास सर्वप्रथम नियमित व्यायामाचा (फिजिओथेरपी) सल्ला दिला जातो. कॅल्शिअम व व्हिटॅमिन ‘डी’ जीवनसत्वेयुक्त औषधे दिली जातात. कॅल्शिअम व व्हिटॅमिन ‘डी’ची संयुक्त औषधे उपयुक्त ठरतात. कोवळ्या उन्हामधून प्राप्त होणाऱ्या "ड" जीवनसत्वाला हाडांच्या ठिसुळतेच्यादृष्टीने अधिक महत्त्‍व आहे.

Osteoporosis Symptoms
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात; बालमानस शास्त्राची जाण नसल्यामुळं उद्भवू शकतात समस्या!

तसेच महिलांमध्ये आंतरस्त्रावी संप्रेरकाचा उपयोग करणारी उपचारपद्धतीही ऑस्टिओपोरोसिसमध्ये उपयुक्त ठरते. दूध, दुग्धजन्य पदार्थ, नाचणी, सोयाबीनसारख्या कॅल्शियमयुक्त पदार्थांमुळे ऑस्टिओपोरोसिस हा आजार टाळता येतो. अस्थिक्षयाचा विषय हा निरंतर गंभीर व वाढत जाणारा विषय आहे, याला जबाबदार फक्त हाडांचा क्षय किंवा हाडांचे वजन कमी होणे हेच नाहीतर याला अतिशय मोठ्या प्रमाणावर ज्येष्ठांचं पडणं, वारंवार पडणं व पडण्याची भीती हे सुद्धा जबाबदार आहे.

ज्येष्ठ नागरिक हे सध्याच्या लोकसंख्येमध्ये झपाट्याने वाढणारा समूह आहे. अस्थिक्षयामुळे वाढत जाणाऱ्या फ्रॅक्चरना थांबवणं सहजशक्य आहे व सोपं आहे. या आजारासाठी कायमस्वरूपी उपचार उपलब्ध नसल्याने सर्वांनी विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी समुपदेशन व जनजागृती करण्याची नितांत आवश्यकता आहे.

(लेखक चिरायु हॉस्पिटल, रत्नागिरी येथे अस्थिरोगतज्ञ आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.