Health Tips : लैंगिकतेबद्दल मुलांशी केव्हा बोलावे? नातेसंबंध, प्रेम, आकर्षण, वासना यावर पालकांनी का चर्चा करावी?

सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले मूल सेक्स जाळ्यात तर अडकत नाहीना, हे तपासावे.
Health Tips
Health Tipsesakal
Updated on
Summary

विवाहपूर्व सेक्स, गर्भधारणा टाळण्यासाठी असुरक्षित सेक्स टाळण्यास प्रवृत्त करावे व त्यामुळे गुप्तरोगाची शक्यता असते, हेही समजवावे.

-श्रुतिका कोतकुंडे, सजग स्वास्थ्य क्लिनिक, चिपळूण

sajagclinic@gmail.com

क्लिनिकच्या माध्यमातून काम करताना जाणवते की, सर्वसामान्य जनतेचं लैंगिकतेबद्दल पराकोटीचे अज्ञान आहे व प्रसंगी परकोटीचा बीभत्सपणा, छळ व विकृती आहे. त्यामुळे वैवाहिक जीवनात (Married Life) प्रचंड ताणतणाव निर्माण होतो. वयात येणाऱ्या मुलांशी या संदर्भात संवाद साधणे अत्यंत गरजेचे आहे.

लैंगिकता म्हणजे फक्त सेक्स नव्हे, तर लैंगिकता या संकल्पनेत स्त्रीत्व, पुरुषत्व, लैंगिक ज्ञान, प्रवृत्ती, मूल्य व्यवस्था, वर्तणूक या सर्व बाबी येतात. शरीराबरोबर मनही लैंगिकतेची कल्पना घडवत असते. आपली संस्कृती, शैक्षणिक (Educational) पार्श्वभूमी व व्यक्तिगत अनुभव याबद्दलची समज घडवते. मुलांशी लैंगिकतेबद्दल बोलणे म्हणजे फक्त लैंगिक ज्ञान देणे नव्हे, तर नातेसंबंधांबद्दल मौलिक समज घडवणे हे होय.

Health Tips
पालकांचा मुलांच्या मित्रांसोबत व्यवहार कसा असावा? वाढत्या वयातील 'मैत्री' कशी जपली पाहिजे? जाणून घ्या..

लैंगिकतेबद्दल मुलांशी केव्हा बोलावे : या विषयाबद्दलच्या संकोचामुळे अनेक पालकांना हे कळत नाही. पालकांमध्ये असा गैरसमज असतो की, सेक्सबद्दल बोलल्याने मुलं त्याबद्दल प्रवृत्त होतील. उलटपक्षी, संशोधन हे सांगते की, जेवढा हा विषय टाळाल तेवढी मुलं कुतुहलापोटी सेक्सकडे जास्त ओढली जातील. मुलांना सेक्सबद्दल टीव्ही, जाहिराती, सिनेमा या माध्यमातून खूप गोष्टी दिसत असतात. याबद्दल योग्य माहिती न दिल्यास मुलांवर त्या दृष्यांचा विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वयानुरूप याबाबत बोलत राहणे अत्यंत गरजेचे असते. याबाबत बोलायला पालकांना लाज वाटू शकते म्हणूनच पालकांनी आधी लैंगिकतेविषयी पुरेसे ज्ञान गोळा करावे, तसेच मुलांशी बोलताना फक्त शारीरिक बाबींबद्दल न बोलता एकूणच नातेसंबंध, प्रेम, आकर्षण, वासना या सर्व बाबींबद्दल चर्चा करावी.

बहुतेक मुलांना आई-वडिलांकडून याबाबत चर्चेच्या स्वरूपात माहिती हवी असते. एखादी जाहिरात किंवा बातमीला अनुसरून संधी साधून मुलांना याबाबत बोलते करावे. मुलांनी याबाबत प्रश्न विचारल्यास तो टाळू नये. मुले त्या सेक्सबद्दल विचारतात म्हणून त्यांना त्याचा अनुभव हवाय, असा निष्कर्ष काढू नये तसेच जर मुले याबाबत प्रश्न विचारत नाहीत म्हणजे त्यांना त्याबद्दल काहीच ज्ञान नाही, हे गृहित धरू नये. सेक्स हे प्रौढपणे अत्यंत जबाबदारीने अनुभवण्याची गोष्ट आहे, हे त्यांच्या मनावर बिंबवा. मुलांनाही याबाबत आपल्या पालकांचे मत काय हे जाणून घ्यायचे असते व पालकांची मूल्यव्यवस्था काय हे जाणून घ्यायचे असते.

सेक्स आणि प्रसिद्धीमाध्यमे

सिनेमा, टीव्ही, मालिका बघताना मुलांना टीकात्मक नजरेने बघायला शिकवा. जे जे दाखवले जाते ते वस्तुस्थितीला धरून नाही हे सांगा. मुलांसाठी इंटरनेट मोठी देणगी असली तरी त्याचा सुरक्षित वापर करण्यासाठी मुलांना योग्य नियंत्रण शिकवा. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले मूल सेक्स जाळ्यात तर अडकत नाहीना, हे तपासावे. ज्या मुलांना घरातून प्रेमाची उब मिळते ती मुलं विवाहपूर्व सेक्सबाबत जास्त पुढाकार घेत नाहीत, असे संशोधन सांगते.

Health Tips
Dizziness Symptoms : 'चक्कर येण्यामागील 80 टक्के कारणे ही कानाशी संबंधित असतात'; यावर कसा करता येईल उपचार?

पालकांनी डेटिंगबाबत मुलांवर काही मर्यादा नक्की घालाव्यात. मुलांना असुरक्षित सेक्सचा धोका समजवावा. सेक्स फक्त शारीरिक नसून एक भावनिक कृतीसुद्धा आहे, हे त्यांच्या मनावर बिंबवावे. पालकांनी मुलांशी बोलताना आपली सेक्सबाबत गृहितके तपासून बघावीत. हस्तमैथून केल्याने प्रकृतीवर कुठलाही दोष परिणाम होत नाही हे जाणावे. अभ्यास सांभाळून जर खासगीत मुले तसे करत असतील तर दुर्लक्ष करणेच बरे.

मुलांचा लैंगिक छळ होणार नाही, यासाठी प्रयत्नशील राहा

मुलांना अचकटविचकट बोलणे, हावभाव स्पर्शातून छेडणे हे वयात येणाऱ्या मुलांमध्ये होत असते. याबाबत पालकांनी मुद्दाम जागरूक राहून चर्चा केली पाहिजे. बऱ्याचदा मुलं छळ होत असला तरी घरी सांगायला घाबरतात. अशावेळी मुलांना विश्वासात घेऊन याबद्दल माहिती घेतली पाहिजे तसेच शाळेशी संपर्क करून याबद्दल कडक धोरण राबवण्याची सक्ती केली पाहिजे. मुलांचा असा छळ होत असेल तर त्यापासून संरक्षण करणे ही पालकांची व शाळेची मुख्य जबाबदारी आहे.

Health Tips
Love Affair : वयात येणारी मुलं आणि प्रेमभावना! आकर्षण, वासनेलाच 'प्रेम' समजून बसतात अन् नंतर पश्चाताप..

वयात येणाऱ्या मुलांशी व मुलींशी पेहराव, नटण्याबद्दल खुली चर्चा व्हायला हवी. फक्त रूप महत्वाचे नसून चारित्र्य, बुद्धिमत्ता, प्रेम, मैत्रीही आवश्यक आहे, हे मुलांच्या मनावर बिंबंवावे. भडक मेकअप् व तोकडे कपडे घातल्याने आपल्या चारित्र्याबद्दल टीकाटिप्पणी होऊ शकते हे त्यांच्या मनावर बिंबवावे. कुमारवयातील मुले जसे प्रौढत्वाकडे झुकतात तेव्हा त्यांच्यातील प्रेमसंबंध वाढण्याची शक्यता असते. अशावेळी आपल्या मूल्यव्यवस्थेबद्दल चर्चा करावी.

विवाहपूर्व सेक्स, गर्भधारणा टाळण्यासाठी असुरक्षित सेक्स टाळण्यास प्रवृत्त करावे व त्यामुळे गुप्तरोगाची शक्यता असते, हेही समजवावे. गर्भनिरोधक वापरूनही गर्भधारणा होऊ शकते, हे मुलांना समजवावे. सेक्ससारखी महत्वाची गोष्ट ही जबाबदारीने प्रौढ वयात करण्याची लग्नानंतर करण्याची बाब आहे, हे समजवावे. यासाठी धीर धरावा हे मनावर बिंबवावे. पालकांनी मुलांशी अशी चर्चा करून आपली मूल्ये व मते मुलांना समजवावीत.

(लेखिका मनोविकार व मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com