शरीरावर कोड vitiligo फुटलेली अनेक माणसं तुम्ही तुमच्या आजुबाजूला पाहिली असतील. अनेकदा या व्यक्तींकडे लोक विचित्र नजरेने पाहतात. काही जण त्यांचा तिटकाराही करतात. परंतु, हे अत्यंत चुकीचं असून शरीरावर कोड नेमकं का येतं? किंवा त्यामागील कारणं काय हे तुम्हाला ठावूक आहे? कोड हा काही संसर्गजन्य रोग किंवा आजार नाही. तर ती एक त्वचेची समस्या आहे. स्वयंप्रतिकारामुळे (ऑटोइम्युन) शरीरावर कोड येतं. ज्यामध्ये त्वचेतील रंगपेशी नष्ट होतात व शरीरावर पांढरे डाग यायला सुरुवात होते. शरीराच्या कोणत्याही भागावर कोड होऊ शकते. यात केसांवरही परिणाम होऊन केस पांढरे होऊ शकतात आणि तोंडाच्या आत देखील हे होऊ शकते. (lifestyle-myths-and-facts-about-vitiligo)
मेलॅनिनमुळे आपल्या त्वचेला आणि केसांना रंग प्राप्त होतो. परंतु, जेव्हा मेलॅनिन निर्माण करणाऱ्या पेशींचे कार्य थांबत किंवा त्या पेशी नष्ट होतात. तेव्हा पांढरे कोड उत्पन्न होते. कोणत्याही प्रकारची त्वचा असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत पांढऱ्या कोडाची समस्या उद्भवू शकते.
कोड होण्यामागील सर्वसाधारण कारणे -
१. शरीराच्या रोगप्रतिकार क्षमतेमधील बदल
२.कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला ही समस्या असणे.
३.रोगप्रतिकार क्षमतेशी संबंधित इतर आजार
४.हायपरथायरॉइडिजम, एलोपेशिया एरेटा (केस प्रचंड प्रमाणात गळणे) आणि अतिशय गंभीर ऍनिमिया असणे
कोड कोणत्या वयात येतं?
ही समस्या कोणत्याही वयात होऊ शकते. पण सर्वसामान्यतः त्याची सुरुवात ३० वर्षांच्या आधीच होते. काही बाबतीत चेहरा, हात, पावले, डोळे, नाक आणि कान या अवयवांवर पांढरे कोड येते, त्याला 'अक्रोफेशियल व्हिटीलीगो' म्हणतात. जेव्हा त्वचेच्या संपूर्ण पृष्ठभागावर पांढरे कोड येते. तेव्हा त्याला सर्वत्र पसरलेला 'व्हिटीलीगो' असे म्हणतात. सेगमेंटल व्हिटीलीगोमध्ये त्वचेच्या फक्त एका बाजूला किंवा एकाच भागावर पांढरे कोड येते. जेव्हा फक्त काही जागी त्वचेवरील रंग गेल्यासारखे दिसते तेव्हा त्याला लिमिटेड किंवा 'सेंट्रल व्हिटीलीगो' म्हणतात. ही समस्या कशी वाढेल याचे अनुमान करणे कठीण असते. काहीवेळा पांढरे कोड वाढत राहते आणि सर्वत्र पसरते. तर काहीवेळा काहीही उपचार न करता देखील पांढरे चट्टे येण्याचे थांबते. कधी कधी काही केसेसमध्ये त्वचेचा मूळ रंग परत देखील येतो.
पांढऱ्या कोडावरील उपचार काही वेळा असमाधानकारक ठरतात. चेहरा आणि धडासाठी रिपिगमेंटेशन उपचार सर्वोत्तम असतात. हात, पाय आणि सफेद केस असलेल्या भागांवरील उपचारांना पुरेशी प्रतिक्रिया मिळत नाही. पांढरे चट्टे नवीन असतील तर उपचारांचा परिणाम लवकर दिसून येतो. तर जुन्या चट्ट्यांच्या बाबतीत वेळ लागू शकतो.
कोड आल्यावर कोणती काळजी घ्यावी?
१.त्वचेवर जखमा होऊ न देणे.
२. अंग झाकलं जाईल असे कपडे वापरणं.
३.त्वचेवर ओरखडे किंवा अन्य जखम होणार नाही याची काळजी.
या समस्येवरील उपचारांमध्ये प्रामुख्याने स्टिरॉइड्स असलेली टॉपिकल क्रीम्स, कॅल्सेन्यूरिन इन्हिबिटर्स, फोटोथेरपी यांचा समावेश असतो. तसेच काही विशिष्ट मेलॅनोसाइट पेशींच्या प्रत्यारोपणाचा समावेश असलेले विविध सर्जिकल उपचार देखील आहेत, तसेच वेगवेगळे ग्राफ्टिंग पर्याय पण आहेत.
दरम्यान, पांढरे कोड ही समस्या जीवघेणी किंवा संसर्गजन्य नाही. ही समस्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे होते असा एका गैरसमज आहे. आंबट पदार्थ, मासे, सफेद खाद्यपदार्थ इत्यादींमुळे पांढरं कोड येतं असा लोकांचा समज होता. परंतु, यात कोणतीही सत्यता नाही. वरील पदार्थांमुळे कोड होतं, असं सिद्ध करणारा कोणताही शास्त्रीय पुरावा सापडलेला नाही. पांढऱ्या कोडामुळे व्यक्तीच्या सौंदर्यामध्ये बाधा येऊ शकते, खास करून गहूवर्णीय किंवा सावळ्या रंगाच्या व्यक्तीच्या बाबतीत ही समस्या अधिक अडचणीची ठरू शकते. यामुळे त्या व्यक्तीवर मानसिक ताण निर्माण होऊ शकतो.
(लेखिका डॉ. तृप्ती डी. अगरवाल या कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये कन्सल्टन्ट डर्मेटोलॉजिस्ट, ट्रीकोलॉजिस्ट व अएस्थेटिक डर्मेटोलॉजिस्ट आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.