हसण्यासाठी जगा : भीतीवर मात, आयुष्याची पहाट!

माणसाच्या मनात निर्माण होणाऱ्या मूलभूत गोष्टींपैकी एक म्हणजे ‘भीती’! काही लोकांना सतत भीती वाटत असते. काही भीती ‘सकारण’ असतात, तर काही कल्पनाशक्तीचा वापर करून ‘अकारण’ असतात.
Fear
FearSakal
Updated on

माणसाच्या मनात निर्माण होणाऱ्या मूलभूत गोष्टींपैकी एक म्हणजे ‘भीती’!  काही लोकांना सतत भीती वाटत असते. काही भीती ‘सकारण’ असतात,  तर काही कल्पनाशक्तीचा वापर करून ‘अकारण’ असतात.  भीतीमुळं ही लोकं काम करत नाहीत, तर काही वेळेला करत असलेलं काम भीतीमुळं अर्धवट सोडतात.  त्यांच्या या वागणुकीचा आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो. कुटुंबीयांना त्रास होतो आणि मुख्य म्हणजे स्वतःला त्रास होतो! अनाठायी भीतीमुळं मन अस्वस्थ राहतं. कामावर लक्ष केंद्रित होत नाही.

शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये लहान मुलांना भाषण करण्याची संधी मिळते.  प्रत्यक्ष स्टेजवर गेल्यानंतर शेकडो प्रेक्षक आपल्याकडं पाहात आहेत, हा अनुभव त्याला पहिल्यांदाच येतो. पाठ केलेलं भाषण ते लहान मूल विसरतं.  समोरचे  मित्र  हसतात.  मोठी माणसं रागवतात. त्यानंतर  मनात भीती बसते.  पुढच्या आयुष्यात स्टेजवर भाषण द्यायचं म्हटलं, की घाबरायला होतं.

एखादी सामाजिक संस्था अनेक पुरस्कारांचं वाटप करते.  त्यामध्ये ‘जीवनगौरव’ पुरस्कार देण्यात येतो.  पुरस्कार वितरणानंतर नेमकं त्या व्यक्तीचे निधन होतं. पुढच्या वर्षीदेखील जीवनगौरव पुरस्कार दिलेल्या व्यक्तीचं निधन होतं.  कोणीतरी हा योगायोग आयोजकांच्या मनामध्ये भरवतो. पुढच्या वर्षीचा पुरस्कार जाहीर करताना आयोजकांना मनातून अनाठायी भीती वाटत राहते.

परदेशात ‘ट्रीप’ला गेले असताना एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचे निधन होतं. ही गोष्ट परिचितांमध्ये कळते. एखाद्या व्यक्तीच्या मनात ही गोष्ट घर करते. ‘ट्रीप’वर जाणं आणि निधन होणं या गोष्टी मनामध्ये जोडल्या जातात. ऐकणारी व्यक्ती पुढं ट्रीपला जायला घाबरायला लागते.

जेव्हा भीती निर्माण होते, तेव्हा माणसं  त्या ठिकाणापासून, त्या व्यक्तीपासून, त्या परिस्थितीपासून लांब पळण्याचा प्रयत्न करतात. लांब गेल्यामुळं त्यांना क्षणभर बरं वाटतं, पण लांब असताना देखील त्यांच्या मनात विचार येतच राहतात. त्यामुळं भीती वाढत जाते. ही लोकं भीतीच्या दलदलीत अधिकच फसत जातात. या अवस्थेत मानसिक मोकळेपणा राहात नाही.

समाजात काही लोक कायमच ‘भीती पिकवण्याचं’ काम करतात. मनात भीती असलेली व्यक्ती परिस्थितीपासून पळ काढते, याचा ते फायदा घेतात.  यावर मात करायची असेल तर...

  • तुम्हाला कसली भीती वाटते हे शोधून काढा.

  • अनाहून भीतीवर ‘कृती’ हाच उपाय आहे. कृतीनं आत्मविश्वास तयार होतो. भीतीचा कसा सामना करता यावर उर्वरित आयुष्य अवलंबून असतं.

  • परिस्थितीचा सामना करणं हाच यावरचा उपाय आहे हे स्वतःला सांगा

  • भीती ही नैसर्गिक आहे. भीतीवर मात करण्यात शौर्य आहे. म्हणून भीतीवर मात करेपर्यंत ती गोष्ट पुन्हा पुन्हा करण्याचा संकल्प करा.

  • कल्पनाशक्तीचा वापर करून संभाव्य  अडचणींचा विचार करा. त्यावर उपायांचा विचार करा. भीतीवर मात करून तुम्ही यशस्वी झाल्याचं चित्र मनात तयार करून परिस्थितीला  सामोरे जा.

  • परिस्थितीचा सामना करण्यापूर्वी मित्रमंडळींबरोबर हास्यविनोद करा.  हसल्याने श्वासाची लय बदलते. भीती पळून जाते.

लोकं परिस्थितीमुळं कमी तर भीतीमुळं जास्त मरतात. भीतीमुळं आपण भूतकाळात अडकतो, काळज्यांमुळं भविष्यकाळात! म्हणूनच वर्तमानात कृती केल्यास दोन्ही काळावर विजय मिळवता येतो!!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.