हसण्यासाठी जगा : विचार करण्याचा करूया विचार!

शाळेचे जुने दिवस आठवून बघा. लाकडी बेंचवर बसलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक प्रश्न विचारतात आणि म्हणतात, ‘विचार करून उत्तर सांगा.’
Thinking
ThinkingSakal
Updated on

लहानपणापासून विविध वस्तूंबाबत आपलं आकलन वाढायला लागतं. अक्षर ओळखीतून भाषेचं आकलन वाढायला  लागतं. आयुष्यात जसं जसं वय वाढत जातं आकलन, तसं तसं तयार होतं भावनांचं आंदोलन! या सर्वांतून भरून जातं, विचारांनी आपलं मन!!! मनातले विचार कधी वाऱ्याची झुळूक बनून येतात, तर कधी त्यांची चक्रीवादळं तयार होतात. मग प्रत्येकाला गरज वाटायला लागते ती मानसिक शांततेची!

शाळेचे जुने दिवस आठवून बघा. लाकडी बेंचवर बसलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षक प्रश्न विचारतात आणि म्हणतात, ‘विचार करून उत्तर सांगा.’ हे ऐकल्यावर विद्यार्थ्यांच्या पाठीला थोडा पोक येतो. हनुवटी जरा खाली ओढली जाते.  मुलं ओठांना पेन किंवा पेन्सिल लावून, डोळे आकाशाकडं  तिरके करत बघायला लागतात. शिक्षकांनी सांगितलेलं असतं ‘विचार करून सांगा,’ ...आणि बहुसंख्य मुलांच्या मनात प्रश्नाच्या उत्तराऐवजी एकच विचार येत असतो ‘मला  उत्तर विचारू नका’!

चालायचं कसं, बोलायचं कसं, वाचायचं कसं, कपडे कसे करायचे, जेवायचं कसं अशा अनेक गोष्टी आपल्याला शिकवल्या जातात. पण ‘विचार कसा करायचा,’ हे कधी शिकवलं जात नाही. जगण्यातले बहुसंख्य गोंधळ हे त्यातूनच निर्माण होतात. आजूबाजूला असणारी लोकं कशा रीतीनं वागतात,  याच्या निरीक्षणशक्तीतून, आकलनाप्रमाणं प्रत्येकजण शिकतो. त्यातून आपापल्या परीनं विचार करायला लागतो. दिवसभरामध्ये आपल्या मनात ५० हजार ते ७० हजार विचार येतात, असं म्हणतात. त्यातले ९५ टक्के विचार तेच तेच असतात. विचारांच्या मायाजालात मन भरकटायला लागतं.  अशावेळी विचार कसा करायचा हे शिकायला हवं. मनाला स्थिर व शांत करायचं असेल, तर विचारांच्या प्रक्रियेबाबत काही गोष्टी जरूर करून पाहा.

  • विचारांवर ताबा आणण्यासाठी यापुढं अधून मधून स्वतःलाच प्रश्न विचारायचा ‘आत्ता मी कोणता विचार करतोय?’ दुसऱ्यावर लक्ष देतो, त्याप्रमाणे स्वत:च्या मनातल्या विचारांवर लक्ष देण्याची सवय निर्माण करा. योग्य दिशेने विचार करायला ही सवय मदत करेल.

  • सिग्नलवर भिकारी भीक मागायला येताना दिसले, तर दुचाकीस्वार गाडी थोडी पुढं घेऊन त्यांना चुकवतात. कारमधली मंडळी कारच्या काचा वरती करतात. भिकाऱ्यांना  थारा न देणाऱ्या लोकांनी यापुढं ‘भिकार विचारांना देखील मनाची फट उघडून जागा देणार नाही,’ असा संकल्प करायला हवा. थोडक्यात, या दुसऱ्या टप्प्यात मनात येणारा विचार सकारात्मक आहे की नकारात्मक, याचा अधून मधून पडताळा करण्याची सवय लावा. 

  • प्रत्येकाला घर, गाडी, वस्तू या स्वतःच्या मालकीच्या हव्या असतात.  यापुढं स्वतःच्या मनातल्या विचारांचे स्वतः मालक व्हा. कुणाच्यातरी चुकीच्या बोलण्यावरून, वागण्यावरून आपलं मन अस्वस्थ होणार नाही,  याकडं अधिक लक्ष द्या.

  • आपले शरीर आपल्या मनाचे नोकर आहे. त्यामुळे मनात येणाऱ्या विचारांचा परिणाम शरीरावर होतो. भीती आणि शंका मनाला कमजोर बनवतात. त्यावर ताबा मिळावा.

  • मनाला स्थिर करण्यासाठी एखादं उद्दिष्ट धरून त्यावर सलग  विचार करण्याची सवय लावा. ही सवय लावण्यासाठी, दोन मिनिटं घड्याळातल्या सेकंद काट्याकडं इतर कोणताही विचार न आणता बघत राहा.  सोशल मीडियाच्या अतिवापरामुळं मधूनच वेगळे विचार यायला लागतील.  हे करताना मन भरकटलं तर पुन्हा हाच खेळ नव्यानं दोन मिनिटं सुरू करा. हळूहळू मनातल्या विचारांवर  ताबा आणण्याची नवी शक्ती तुमच्यामध्ये तयार होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.