असहवासित विवाह म्हणजे नेमके काय?

married life
married life
Updated on

प्रणयानुभूतीच्या आजच्या भागात आपण ‘असहवासित विवाह’ या विषयावर चर्चा करणार आहोत. हा शब्द ऐकल्यावर अनेकांच्या भुवया उंचावलेल्या असतील. असहवासित विवाह म्हणजे काय, असा प्रश्‍न देखील पडला असेल. यास इंग्रजीमध्ये ‘नॉन-कंझुमेशन ऑफ मॅरेज’ असे म्हणतात. लग्न झाल्यावर लैंगिक संबंध प्रस्थापित होणे स्वाभाविक असते. मात्र, विवाह झाला तरी पण लैंगिक संबंध प्रस्थापित झाले नाहीत; म्हणजे विवाहानंतर सहवास झालेला नाही म्हणून त्यास ‘असहवासित विवाह’ असे म्हणतात.

गेल्या भागात आपण लग्नाच्या पहिल्या रात्रीसंबंधी जाणून घेतले. विवाहानंतर पहिल्या काही दिवसांमध्ये सेक्स करताना येणाऱ्या समस्यांमुळे अडथळे येतात. मात्र, कालांतराने बहुतांश जोडप्यांच्या समस्या आपोआपच सुटतात आणि सुरळीत शारीरिक संबंध होऊ लागतात. शारीरिक संबंध होणे म्हणजे पुरुषाचे उद्दिपित लिंग स्त्रीच्या योनीत जाणे आणि वीर्य पडणे. असा शारीरिक संबंध झाला म्हणजे ‘कंझुमेशन ऑफ मॅरेज्’ झाले असे म्हणतो; ते लग्न असहवासित नसते. मात्र, असे झाले नाही तर त्याला ‘अनकंझूमेटेड मॅरेज’ असे म्हणतात.

वैद्यकीय दृष्ट्या आजचा विषय फार महत्त्वाचा का वाटला...! तर नवविवाहित दांपत्य आमच्याकडे येतात, त्यावेळी सेक्सुअल हिस्ट्री घेतल्या जाते. ते विचारल्यावर लक्षात येते की, काही दांपत्यांचा एकमेकांसोबत संबंधच झालेला नसतो. मग त्यामुळे त्यांना वाटते की, आपल्या जोडीदारामध्ये काही उणीव आहे. मात्र, डॉक्टरांकडे गेल्यावर कळतं की, दोघांमध्ये सहवासच झालेला नाही.

कधी-कधी तर हे असे वर्षोनवर्ष सुरू असते. स्त्री-पुरुषांना वाटत असते की, आपला सेक्स व्यवस्थित होत आहे. त्यांना हे देखील वाटत नाही की आपल्याला काही समस्या आहेत. प्रॅक्टिसदरम्यान एक दांपत्य असेही बघितले की, त्यांचा लग्नानंतर दहा वर्षे सहवासच झाला नव्हता. त्यामुळे त्यांना मुल होत नव्हते ,मग आम्ही त्यांचे समुपदेशन केले आणि त्यांच्यात सेक्स होऊ लागला.

सुरुवातीच्या भागात आपण बघितले की, सेक्स चांगला झाला तर लग्न टिकून राहते. म्हणून सुरुवातीला सेक्स व्यवस्थित होणे आवश्यक असते. पण काही लोकांना असं वाटतं की आपला सेक्स बरोबरच होत आहे. याचे एक प्रमुख कारण आहे अज्ञान. बर्‍याचदा सेक्स कसा करायचा, कोणत्या पोजिशनमध्ये करायचा याबाबत अनभिज्ञता असते.तसेच आपला सेक्स बरोबर होत आहे का, पुरुषाचं लिंग स्त्रीच्या योनीत जातेय् का याकडे देखील लक्ष नसते. पण असे सतत होत राहिले की, लिंगांची ताठरता कमी झाल्याने नपुंसकत्व आहे असे समजून लोक डॉक्टरांकडे जातात.

औषधोपचारांनी लिंगास कडकपणा येतो , परंतु संबंध होतच नाहीत व असहवासित विवाहाची समस्या कायम राहते. अयोग्य सेक्स पोजिशनमुळे वीर्य योनीबाहेरच स्खलित होते. अशा वेळी शीघ्रपतनाचा उपचार सुरू होतो. त्यामुळे देखील असहवासित विवाहाची समस्या कायमच राहते. जेंव्हा नवपरिणीत दांपत्य लैंगिक समस्या अथवा वंध्यत्व उपचारांसाठी आले की, त्यांचा संभोग बरोबर होतोय का, हे पाहणे आवश्यक असते.

पुरुषांनी योग्य पोजिशन न घेतल्याने लिंग योनीत प्रवेश करतांना स्त्रियांच्या मुत्रमार्गादरम्यान लिंगाचा स्पर्श झाल्यास वेदना होऊ शकतात. त्या वेदनांमुळे महिला लैंगिक संबंध करण्यास नकार देतात. मात्र, या मुळ प्रश्‍नाकडे दुर्लक्ष झाल्यास देखील असहवासित विवाहाची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे स्त्री-पुरुष दोघांमध्ये कुठलीही लैंगिक समस्या नसताना असहवासित विवाहाची समस्या उद्भवू शकते.

असहवासित विवाह जसे अज्ञानामूळे होतात तसेच स्त्रियांच्या अथवा पुरुषांच्या वेगवेगळ्या लैंगिक समस्यांमुळे देखील होऊ शकतात. जसं इरेक्टाईल डिसफंक्शन म्हणजे पुरुषांच्या लिंगाला ताठरता न येणे देखील एक कारण आहे. लिंगाला ताठरता आली नाही, तर लिंगाचा योनीत प्रवेश होणार नाही. त्यामुळे देखील असहवासित विवाहाची समस्या उद्भवू शकते. अनेकदा पुरुषांचे शीघ्रपतन देखील यासाठी कारणीभूत असते. ते एवढे शीघ्र असते की, योनीच्या प्रवेशाअगोदर वीर्यपात होऊन जातो. त्यानंतर लिंगाचा कडकपणा नाहीसा झाल्याने योनीत प्रवेश होत नाही. त्याच प्रकारे स्त्रीयांच्या समस्यांमुळे देखील असहवासित विवाहाची समस्या येऊ शकते.

अनेकदा पोजिशन माहित नसल्यामुळे मुलींना संबंधांच्या वेळेस वेदना होतात.काही महिलांमध्ये वजायनीसम्स नामक आजार असतो. जेंव्हा स्त्री-पुरुष समागम करतात तेव्हा समागमाच्या आधीच आपल्याला काही त्रास होईल, दुखेल अशा विचारांनी योनी व पोटाच्या स्नायु आकुंचन पावतात. त्यामुळे योनीत लिंगाचा प्रवेश होऊ शकत नाही. त्यामुळे उपचार करताना हे अज्ञानामुळे झाले की लैंगिक समस्यांमुळे हे सेक्स कौन्सिलिंग दरम्यान जाणून घेण्यास प्राधान्य दिले पाहिजे.
असहवासित विवाह टाळण्यासाठी विवाहपूर्व लैंगिक समुपदेशन करून घेणे आवश्यक आहे.

समुपदेशन करून घेतले नसेल तरी लग्नानंतर आपला सेक्स बरोबर होत आहे की नाही याचे दांपत्यांनी निरिक्षण करणे आवश्यक आहे. शंका असली तर डॉक्टरांकडे आवर्जुन गेले पाहिजे. कुठल्याही समस्या असतील तर त्यांचे निराकरण केले पाहिजे. कारण जसजशा या समस्या वाढतात‌ तसतसा मानसिक ताण वाढू लागतो. मग दडपणामुळे लैंगिक संबंध होत नाही. अशा वेळी हे दृष्टचक्र लवकरात लवकर मोडायचे असेल तर आपल्या फॅमिली डॉक्टरचा किंवा स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा. तरीही समस्या सुटत नसेल तर चांगल्या व प्रशिक्षित लैंगिक विकार तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. तेव्हाच खर्‍या अर्थाने लग्नाचा अत्युच्च आनंद प्राप्त होईल.  

नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.