Health Problems : 'ही' मुलं कुठल्या परिस्थितीत जास्त लाजतात? कोणती आहेत लक्षणे, कसा करता येईल उपाय?

मुलं समाजात वावरायला लाजतात. संभाषण कौशल्यात (Skills) कमी असल्याचा गंड निर्माण होत आहे.
Health Problems
Health Problemsesakal
Updated on

-श्रुतिका कोतकुंडे, सजग स्वास्थ्य क्लिनिक, चिपळूण

sajagclinic@gmail.com

१४ वर्षांच्या अमिताची आई तिला माझ्याकडे समुपदेशनासाठी (Counselling) घेऊन आली होती. अमिता लॉकडाउनपासून लोकसंपर्क टाळू लागली होती. ती शाळेव्यतिरिक्त बाहेर जाणं टाळत होती. तिला वाटत असे की, शेजारची मुलं व मोठे तिला हसतात. तिच्या बटबटीत चेहऱ्यावरून, नेभळट स्वभावावरून चिडवतात. तिच्या गालावरच्या मसामुळे तिला लाजल्यासारखं वाटू लागले होते. खूपशा मैत्रिणी नसलेली अमिता तिच्या एकुलत्या एक मैत्रिणीकडेही जाणे टाळू लागली. एकविसाव्या शतकात घडणाऱ्या विभक्त कुटुंबातील जेनझी मुलांमध्ये सामाजिक कौशल्य कमी होत चालली आहेत व त्यामुळे मुलांमध्ये बुजरेपणा ही समस्या दिसून येत आहे.

मुलं समाजात वावरायला लाजतात. संभाषण कौशल्यात (Skills) कमी असल्याचा गंड निर्माण होत आहे. ती उगीचच घाबरतात व त्यांना चिडवल्या जाण्याची सतत जाणीव असते. फजिती होण्याची भीती वाटते. त्यामुळे ते मूल जास्त माणसात वावरत नाही. काही मुलं घराबाहेर सर्वच सामाजिक ठिकाणी घाबरू लागतात तर काही ठराविक ठिकाणी जसे की सभा, समारंभ इत्यादी ठिकाणी जायला घाबरतात व असे प्रसंग टाळतात. त्यातील काही मुलं लहान असल्यापासून लाजवट असतात.

Health Problems
Sri M : 'परमऊर्जा समजण्यासाठी आंतरिक ऊर्जा चेतवावी'; पद्मभूषण श्री एम यांचे आवाहन

हा क्वचित स्वभाव गुण असू शकतो किंवा आई-वडिलांच्या बंधनातील संस्कारांचे फलित असू शकते. या बहुतेक मुलांना सर्वांशी बोलायला आवडेल, असे वाटते पण जमत नाही ही खंत असते. स्वभावाने लाजवट मुलं जेव्हा शाळेत जायला लागतात तेव्हा पालकांच्‍या हे लक्षात येते की, आपले मूल मिसळायला घाबरत आहे. तसेच राहत्या घरी शेजारी लहान मुलं नसली तरीही मुलांना समवयस्क मुलांची सोबत मिळत नाही आणि हा गंड वाढत जातो. शाळेत ते बराच काळ कुणाशी स्वतःहून बोलत नाहीत; परंतु घरी ते सर्वांशी बोलत असतात. शाळेत रुळायला त्यांना खूप वेळ लागतो.

पुन्हा पौगंडावस्थेत लाजवट मुलं अलिप्त वागू लागतात. कुमारवयात मुलं आपली स्वतंत्र ओळख बनवत असतात व सामाजिक माध्यमावर व वर्गात इतरांकडून चिडवले जाण्याची जाणीव वाढते. मुलं या वयात हळवी व अतिसंवेदनशील होण्याची शक्यता वाढते. असे असले तरीही ज्या समाजात मुलांना व कुमारांना मोकळेपणाने वावरण्याची मुभा असते तिथेच मुलांचा लाजवटपणा ही समस्या वाटू शकते. बंदिस्त, प्रतिगामी, कट्टर समाजामध्ये जिथे मुलांवर खूप बंधने असतात तिथे लाजरेपणा ही समस्या समजली जात नाही, हे विशेष.

निदान

लाजवट मुलांबद्दल अधिक माहिती पालक व शिक्षकांकडून घेतली जाते. ही मुलं कुठल्या परिस्थितीत जास्त लाजतात? कुठल्या परिस्थितीपासून ही सवय प्रामुख्याने जाणवू लागली? ठराविक काही कृतीने किंवा परिस्थितीमुळे लाजवटपणा वाढतो किंवा कमी होतो हे जाणून घेतले जाते. पालकांकडून व मुलांकडून सर्वसाधारण जीवनात लाजवटपणामुळे काय अडथळे निर्माण होतात, ते जाणून घेतले जाते. लाजवटपणा जर गेला तर जीवनात काय बदल होऊ शकतो, हे समजून घेतले जाते. जर मुलाची इच्छा असेल तरच मुलाला मदत करणे शक्य असते. मुलाला बदलायचं नसल्यास बदल सीमित राहतो. आई-वडिलांची समजूत काढावी लागते की, आपले मूल लाजवट आहे; पण योग्य त्या मदतीने बऱ्यापैकी सर्वसाधारण आयुष्य जगू शकेल.

Health Problems
ना वशिला, ना ओळख; थेट मदत! मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या 'या' क्रमांकावर कॉल करा; 36,182 जणांचे वाचले प्राण

उपाय

जर मुलाला बदलायची इच्छा असेल तर लाजवटपणा कमी करण्याचे प्रयत्न केले जाऊ शकतात. भीती किंवा दडपण यावर लाजरेपणा कमी करण्यासाठी ज्या गोष्टींची कमी भीती वाटते व ज्या गोष्टींची सर्वांत भीती वाटते याचा एक चढता आलेख बनवला जातो. सुरुवातीला मुलांना कमी भीतीच्या प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी तयार केले जाते. हळूहळू दडपणाच्या चढत्या क्रमाने प्रसंगांना सामोरे जायला विविध कृतींतून व समुपदेशनातून तयार केले जाते.

उदाहरण

  • मैत्रिणीबरोबर मैत्रिणीच्या घरी जाणे

  • एकटी मैत्रिणीकडे जाणे

  • कॉफी हाऊसमध्ये दोन ते तीन मैत्रिणींसोबत जाणे

  • मैत्रिणीच्या घरी आठ ते दहाजणांची पार्टी चालू असताना जाणे

  • नवीन जागी जिथे काही मैत्रिणी व अनोळखी लोक असतील अशा ठिकाणी जाणे

आणखीन एक कृतिप्रणाली करता येते ती म्हणजे ज्या गोष्टीचे भय वाटतं त्या गोष्टींची कल्पना करणे व कल्पनेत त्याला सामोरे जाण्याची युक्ती व सराव करणे. अशा छोट्या-छोट्या युक्त्या केल्याने मुलांमधला आत्मविश्वास वाढवता येतो व त्यांना ज्या प्रसंगाचे दडपण वाटते त्याला सामोरे जाण्याची मानसिक तयारी केली जाऊ शकते. अशाच विविध युक्तींतून ताण कमी करण्याचा सराव करून घेतला व समुपदेशानातून नकारात्मक स्वःप्रतिमेला मिटवून आत्मविश्वास जागा केला की, न्यूनगंड कमी होतो.

(लेखिका मनोविकार व मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.