Dental Implant
Dental Implantesakal

Dental Implant : आता तिसऱ्यांदा दात मिळणे झाले शक्य

आजच्या घडीला दंतरोपण शास्त्रातसुद्धा बरीच प्रगती झालेली आहे.
Published on
Summary

आता दंतशास्त्र बरेच प्रगत झाले आहे. दात नसलेल्या जागी, आधुनिक पद्धतीने म्हणजे दंतरोपण (डेन्टल इम्प्लान्ट) करून दात बसविणे सहजशक्य झाले आहे.

-डॉ. नेहा पाटील, रत्नागिरी, दंतविकार व हिरडी शल्य चिकित्सक nehathakurrr@gmail.com

मनुष्याला नैसर्गिकरित्या दोनवेळा दात (Teeth) येतात. एक म्हणजे दुधाचे दात जे १२ वर्षांपर्यंत पडून जातात व त्या जागी दुसऱ्‍यांदा दात येतात जे कायमस्वरूपी असतात; पण ते सुद्धा बऱ्‍याच वेळेस कीड लागून हलून पडून जातात किंवा काढून टाकावे लागतात. पूर्वी दात नसलेल्या जागी दात लावण्याची एकच पद्धत होती ती म्हणजे दातांची कवळी. त्यानंतर दातांचे क्राऊन, ब्रिजेस या पद्धती आल्या. ब्रिजेस बसवताना आजूबाजूचा दात घासून त्याचा आधार घेऊ दात बसविले जातात. आता दंतशास्त्र बरेच प्रगत झाले आहे. दात नसलेल्या जागी, आधुनिक पद्धतीने म्हणजे दंतरोपण (डेन्टल इम्प्लान्ट) करून दात बसविणे सहजशक्य झाले आहे.

Dental Implant
Health News : पित्ताअभावी अन्नपचन अशक्य असतं!

डेन्टल इम्प्लान्ट म्हणजे पडलेल्या/नसलेल्या दाताच्या जागी टॉटेनिअम धातूचा छोटा स्क्रू तेथील हाडाच्या खोबणीत बसविला जातो. या स्क्रूवरच नंतर साधारण तीन महिन्यांच्या कालावधीने सिरॉमिक दात बसविला जातो. इम्प्लान्ट पद्धतीने बसविलेले दात हे खऱ्या दातांसारखेच दिसतात. या पद्धतीने एक, अनेक किंवा संपूर्ण दंतपंक्ती बसविता येते. डेन्टल इम्प्लान्ट (Dental implants) हे कोणत्याही वयोगटात कधीही करता येते. मात्र, हाडांचे विकार, अनियंत्रित मधुमेह, इम्युनोकोंप्रमाईज पेशंट अशा रुग्णांमध्ये ते करणे टाळले जाते किंवा केल्यास ते न टिकण्याचे प्रमाण वाढते. तुमचे सामान्य आरोग्य चांगले असल्यास निरोगी हिरड्या असल्यास इम्प्लान्ट टिकण्याचे प्रमाण जास्त वाढते. ते करण्यापूर्वी एक विशिष्ट प्रकारच्या जबड्याचा स्कॅन करावा लागतो. त्याला सीबीसीटी स्कॅन म्हणतात. त्यावरून इम्प्लान्ट करणार त्या जागेतील हाडाची लांबी, रुंदी मोजता येते.

Dental Implant
भारतातील 'ही' पहिली बुलेट ट्रेन वाऱ्याशी करणार स्पर्धा; बंदुकीतील गोळीच्या वेगाचाही चुकवणार अंदाज!

बऱ्याच वेळेला जबड्याचे हाड कमी असेल तर तिथे कृत्रिम हाडाची पावडर किंवा तुकडा टाकून हाड वाढविता येते व इम्प्लान्ट प्रोसिजर करता येते. आजच्या घडीला दंतरोपण शास्त्रातसुद्धा बरीच प्रगती झालेली आहे. जबड्याच्या मोठ्या हाडाचा किंवा तोंडाच्या मोठ्या हाडाचा इम्प्लान्टसाठी आधार घेतला जातो. इम्प्लान्टची जी बेसिक पद्धत आहे त्यानुसार सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने इम्प्लान्ट करता येतो. बऱ्‍याच वेळेला खराब झालेला दात काढून त्या जागी लगेचच इम्प्लान्ट स्क्रू बसविता येतो. तर काही वेळेस दात काढल्यावर ३-४ महिने थांबून इम्प्लान्ट स्क्रू बसविता येतो. बऱ्‍याच वेळेला इम्प्लान्ट बसविल्यावर टाका द्यायची गरज लागत नाही. याला Flapless/Stichless Dental Implant म्हणतात. ही खूप वेदनादायक पद्धती नाही.

जबड्याचा भाग सुन्न करून काही मिनिटांमध्ये संपविता येते. इम्प्लान्ट केल्यानंतर सुद्धा त्याचा तोंडात वापर होत असताना काही वेळेस त्याला इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. अशी इन्फेक्शनसुद्धा उपचाराने बरे करता येतात; पण जर इम्प्लान्टला इन्फेक्शन होऊन इम्प्लान्ट हलू लागला. (याचे प्रमाण खूप कमी असते.) तरी घाबरण्याचे कारण नाही. तो आपल्याला काढून टाकता येतो व त्या जागी नवीन दात बसविता येतो. इम्प्लान्ट करण्यासाठी इतर दात बसविण्याच्या पद्धतीच्या तुलनेत जास्त खर्च येतो; पण इम्प्लान्टची जास्तीत जास्त वर्षे टिकण्याची क्षमता असते. कदाचित इतर पद्धतीने बसविलेले दात तेवढे टिकू शकत नाहीत. तसेच इम्प्लान्ट पद्धतीने बसवलेले दात हे नैसर्गिक दातांएवढेच मजबून असतात.

Dental Implant
10th-12th Exam : परीक्षेचा स्ट्रेस, टेन्शन, भीती कशाला?

बऱ्‍याच वेळेस आपण विचार करतो की, एक दात नसल्याने इतका काय फरक पडतोय? जेव्हा एखादा दात पडतो किंवा काढून टाकला जातो त्या भागातील हाडाचा आकार कमी होतो. आजूबाजूचे दात किंवा विरुद्ध दिशेचा दात ती रिकामी पोकळी झाकण्याचा प्रयत्न करतो. परिणामी, बाजूच्या चांगल्या दातांमध्ये अन्न अडकणे, हिरड्यांचे आजार अशा समस्या निर्माण होतात. एकदा इम्प्लान्ट केले म्हणजे झाले असे होत नाही. जशी आपण आपल्या नैसर्गिक दातांची काळजी घेतो त्याचप्रमाणे इम्प्लान्टच्या जागी व्यवस्थित ब्रशिंग व्हायला हवे.

दर सहा महिन्यांनी डॉक्टरचा सल्ला घ्यायला हवा. काही समस्या असल्यास त्या तातडीने सोडविता येतात व इम्प्लान्टचे आयुष्य वाढविता येते. चांगल्या दातांमुळे (कोणत्याही वयात मिळाले तरी) त्याचा फायदाच होतो. वृद्ध वयात अन्न चांगले चावता आल्याने इतर शारीरिक समस्या कमी होतात. तरुण वयामध्ये अन्न चावण्यासाठी, सौंदर्य खुलविण्यासाठी, आत्मविश्‍वास वाढविण्यासाठी याचा फायदा होतो. आजच्या या दंतशास्त्रातील आधुनिकतेमुळे तिसऱ्यांदा दात मिळणे शक्य झाले आहे.

(डॉ. स्वस्तिक हॉस्पिटल, रत्नागिरी येथे दंतविकार व हिरडी शल्य चिकित्सक तज्ज्ञ आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.