पुणे - आपल्याच विश्वात रमणाऱ्या ‘स्वमग्न’ मुलांनी सामान्य मुलांप्रमाणे शिक्षण पूर्ण करणे म्हणजे आव्हानात्मक बाब मानली जाते. अतिशय चंचल आणि अस्थिर असल्यामुळे या मुलांना एकाच कार्यात व्यस्त ठेवणेसुद्धा कठीण असते. अशात स्वमग्न असलेल्या २२ वर्षीय आकाश साळुंखे (नाव बदलण्यात आले आहे) या तरुणाने केवळ दहावी- बारावीचे शिक्षणच पूर्ण करत, हार्मोनिअम या वादनात विशारद मिळवले आहे. स्वमग्न मुले हे इतर मुलांप्रमाणेच कोणत्याही क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवू शकतात, हे आकाशने आपल्या यशातून सिद्ध केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून स्वमग्न मुलांसाठी कार्य करणाऱ्या ‘प्रसन्न ऑटिझम सेंटर’च्या माध्यमातून स्वमग्न मुलांना केवळ शैक्षणिकच नाही तर व्यावसायिक प्रशिक्षणदेखील देत आहे. आकाशप्रमाणे या सेंटरच्या इतर काही विद्यार्थ्यांनीदेखील नव्याने स्वतःची ओळख तयार केली आहे.
स्वमग्नता हा आजार नसून, ही एक मानसिक समस्या आहे. यावर औषध नाही. मात्र, स्वमग्न मुलांमध्ये याची तीव्रता कमी केली जाऊ शकते. यासाठी त्यांना विविध प्रकारच्या कार्यात व्यस्त ठेवणे, तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपी देणे गरजेचे आहे. यामध्ये पालकांचा सहभाग देखील तितकाच महत्त्वाचा असतो, असे प्रिझम फाउंडेशनच्या विश्वस्त व संचालिका साधना गोडबोले यांनी सांगितले.
जनजागृतीची आवश्यकता
अनेकवेळी पालकांना स्वमग्नतेबाबत पुरेशी माहिती नसते. यामुळे मुलांना वेळेत उपचार आणि थेरपी मिळत नसल्याने वयानुसार त्यांच्यातील ‘हायपर ऍक्टिव्हिटी’ वाढत जाते. कित्येक मुले हे समाजाशी जोडले जात नाहीत. ‘सेंटर फॉर डिसीज अँड प्रिवेंशन’च्या (सीडीसी) आकडेवारीनुसार प्रत्येक ५४ मधील एका मुलाला ‘ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर’ असते. यामध्ये मुलांचे प्रमाण मुलींच्या तुलनेत जास्त आहे. स्वमग्नता असलेल्या प्रत्येक मुलाची बौद्धिक क्षमता वेगवेगळी असते. तर स्वमग्न असलेल्या ३० टक्के मुलांची बौद्धिक क्षमता कमी असते. त्यामुळे स्वमग्न मुलांच्या समस्या लक्षात घेऊन, त्यानुसार विविध उपचारपद्धती वापरल्या जातात. यासाठी मुलांच्या स्वमग्नतेबाबत पालकांमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता आहे, असे बालरोगतज्ज्ञ अर्चना कदम यांनी सांगितले.
‘स्वमग्न’ मुलांची लक्षणे -
- स्वतःमध्ये कायम मग्न
- कल्पनासृष्टी जवळ जवळ नसतेच
- स्वतःच्या कोषात रहायला आवडते
- दुसऱ्यांच्या नजरेला नजर देत नाहीत
- पन्नास टक्के मुलांना कधीही बोलता येत नाही
- आवाजाला प्रतिसाद न देणे
- अतिचंचलता असणे
- इंद्रियांचा समतोल साधता येत नाही
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.