Seema Deo News : मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांचे (Seema Deo Passed Away) गुरुवारी (24 ऑगस्ट 2023) वृद्धपकाळाने निधन झाले. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या अल्झायमर या आजाराने ग्रस्त होत्या. नेमका काय आहे हा आजार? काय आहेत या आजाराची लक्षणे व कारणे; या लेखाच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया…
अल्झायमर एक न्यूरोलॉजिकल आजार आहे. या आजारामध्ये मेंदूच्या पेशी कमी होऊ लागतात आणि या अशा स्थितीत मेंदूची कार्यप्रणालीही सक्षम राहत नाही. उदाहरणार्थ गोष्टी समजून घेणे, लक्षात न राहणे, माणसांची ओळख विसरणे इत्यादी अडचणी निर्माण होतात.
वर्षानुवर्षे कित्येक दैनंदिन कार्य स्वतःहून करणाऱ्या व्यक्तीला या आजाराची लागण झाल्यास तो/ती अनेक गोष्टी विसरू लागतो, जसे अन्न चावून खाणे, कपडे घालणे, पैसे मोजणे, स्वच्छता राखणे, निर्णय घेण्याची क्षमता कमी होणे इत्यादी. एकूणच अल्झायमर आजार म्हणजे स्मृतीभ्रंश होणे.
अल्झायमरचे सर्वात सामान्य व प्रमुख लक्षण म्हणजे नुकतीच शिकवलेली किंवा पाहिलेली गोष्ट काही क्षणातच विसरणे. अशा रूग्णांना लगेच काहीही आठवत नाही.
अल्झायमर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णाला दैनंदिन कामांचे नियोजन करण्यात आणि ही कामे पार पाडण्यात अनेक अडचणी येतात.
अल्झायमर आजाराने ग्रस्त असलेला रुग्ण साधे-सोपे शब्दही विसरू लागतो आणि हळूहळू त्यांचे बोलणेही कमी होऊ लागते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला चेहरा धुण्यासाठी काय आवश्यक आहे, हेच त्यांना सांगण कठीण होते.
अल्झायमरच्या रुग्णाला शेजारीपाजारी तसंच स्वतःच्या कुटुंबीयांनाही ओळखणे कठीण जाते. म्हणूनच अशा रुग्णांना घराबाहेर एकटे कुठेही सोडले जात नाहीत.
अल्झायमर पीडित रुग्णांचा स्वभाव अचानक बदलतो. उदाहरणार्थ कोणत्याही कारणामुळे त्यांना रडू येते, हसू येत आणि रागही येऊ शकतो. त्यामुळे अशा रुग्णांची व्यवस्थित काळजी घेणे आवश्यक आहे.
अल्झायमर या आजाराकडे वृद्धापकाळातील आजार म्हणून पाहिले जाते. जसेजसे आपले वय वाढते, तसेतसे मेंदू देखील कमकुवत होऊ लागतो. अशा परिस्थितीत अल्झायमर आजाराचा धोका वाढू शकतो. पण क्वचित परिस्थितीत तरुणांमध्येही हा आजार आढळतो.
जर आपल्या कुटुंबीयांमधील एखादा सदस्य या आजाराने ग्रस्त असेल तर तुम्हालाही या आजाराची लागण होण्याची शक्यता असते. शक्यता असली किंवा नसली तरीही या आजाराची लक्षणे दिसल्यास याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका.
आपण उच्च कोलेस्ट्रॉल आणि उच्च रक्तदाब यासारख्या आजाराने ग्रस्त असल्यास आपल्याला लाइफस्टाइलमधील काही वाईट सवयी बदलणं गरजेचं आहे.
जर आपण दैनंदिन जीवनात आरोग्यास पोषक असणारे बदल न केल्यास अल्झायमर आजाराची लागण होऊ शकते. याव्यतिरिक्त मधुमेह, लठ्ठपणा, धूम्रपान, मद्यपान, डिप्रेशन आणि एकटेपणा यासारख्या आजारांचाही धोका वाढू शकतो.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.